देश

"जामिया'तील आंदोलकांवर माथेफिरूचा गोळीबार 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रण पेटले असतानाच काही भागांमध्ये "नागरिकत्व'विरोधी आंदोलन सुरूच आहे. जामिया मिलिया विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर आज एका माथेफिरूने चक्क पिस्तुलातून गोळीबार केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. जामियातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ ते राजघाट असे मोर्चा काढण्याचे नियोजन आखले होते. प्रत्यक्ष मोर्चाला सुरुवात होण्याच्या काही मिनिटे आधीच एका माथेफिरू तरुणाने "जय श्रीराम' तसेच "यह लो आझादी'च्या घोषणात देत आंदोलकांच्या दिशेने गोळीबार केला. दुपारी सव्वाच्या सुमारास हा प्रकार घडल्याने खळबळ निर्माण झाली होती. 

हा पिस्तुलधारी तरुण जय श्रीरामच्या घोषणा देत जमावाच्या दिशेने जात असताना पोलिस मात्र हातावर हात ठेवून बघत राहिल्याचे चित्रीकरण उपलब्ध झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत असणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित तरुणाचे नाव गोपाल असे असून तो ग्रेटर नोएडातील जेवर गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी मात्र तो अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे. 

एक विद्यार्थी जखमी 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरही एका माथेफिरूने 30 जानेवारीला भरदिवसा गोळ्या झाडल्या होत्या, त्याच दिवशी त्याच दिल्लीत पोलिसांच्या देखत शांतताप्रिय आंदोलकांवर गोळ्या चालविल्या गेल्याचा "योगायोग' आम आदमी पक्षाने अधोरेखित केला आहे. गोपाल याला पकडण्याचा प्रयत्न करणारा शादाब आलम हा वृत्तपत्रविद्या-संज्ञापन विभागाचा (मासकॉम) विद्यार्थी त्याच्या पिस्तुलाची गोळी लागून जखमी झाला असून त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गोपाल गोळीबार करताना "इस देश में रहेना होगा, तो वंदे मातरम्‌ कहना होगा' असेही बरळत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

पोलिसांवर संशय 
जामिया कृती समितीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून काळ्या कायद्याविरुद्ध राजघाटापर्यंत मोर्चा आयोजित केला होता. तो सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी ही घटना घडली. माथेफिरू गोपाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला आहे. गोपाल याला या परिसरात यापूर्वी कधी पाहिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र हातात सोनेरी रंगाचे पिस्तूल घेऊन तो भरदिवसा गोळीबार करत आंदोलकांच्या दिशेने जात असताना व त्याचे चित्रीकरणही सुरू असताना दिल्ली पोलिस काय करत होते, असा सवाल उपस्थित होत आहे. 

हल्ल्याआधी फेसबुक लाईव्ह 
गोपालच्या फेसबुक अकाउंटचे नावच "रामभक्त गोपाल' असे असल्याचे समोर आले आहे. गेले काही दिवस तो अतिशय भडक व धर्मांध मेसेज देणाऱ्या फेसबुक पोस्ट करत असल्याचे दिसून आले आहे. आज दुपारी मोर्चा निघण्याच्या आधी गोपाल आंदोलकांच्या दिशेने पिस्तूल रोखून आला. त्याआधी तीनदा त्याने फेसबुक लाईव्ह करून आपला नापाक इरादा पुरेसा स्पष्ट केला होता. मात्र सोशल मीडियावर भाजपच्या विरोधातील माहितीबाबत तत्काळ कारवाई करणारे दिल्ली व उत्तर प्रदेश पोलिस गोपालच्या फेसबुकवरील धर्मांध व भडक भाषेच्या बाबतीत झोपले होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

खान यांची टीका 
या भागातील लोकप्रिय आमदार अमानतुल्ला खान यांनी, भाजप व अमित शहा यांच्या इशाऱ्यानेच गोपालने आंदोलकांवर गोळीबार केला, असा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, ""दिल्लीत विकासाच्या नावावर मते व विजयही मिळणार नाही, हे लक्षात येताच भाजपने निवडणुकीला हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचे कारस्थान रचले आहे. भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपविरोधक गद्दारांना गोळ्या मारण्याचे आवाहन केले होते, गोपाल याने त्यांच्या सूचनेचे पालनच केले आहे.'' 
 
भाजप नेते अनुराग ठाकूर यांनीच देशद्रोह्यांना गोळ्या घालण्यात यावे, असे आवाहन जमावाला केले होते, या विधानाबद्दल त्यांना अटक करण्यात यावी. 
डी. राजा, नेते भाकप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT