माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन व माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या नेत्यांच्या कार्याची उजळणी आज होत आहे. त्याचवेळी उच्च पदांवर राहूनही अत्यंत साधे जीवन जगलेल्या माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांच्या साधेपणाची ही आठवण.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या मानांकनात पहिल्या दहा राष्ट्रांत भारताची अर्थव्यवस्था पोहोचलेली असताना इथले अनेक उद्योजक, राजकीय घराण्यांच्या व त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांच्यासुद्धा संपत्तीत वाढ होताना दिसत आहे. सध्या आपण हा काळ पाहत असलो तरी आपल्या देशात असे काही राजकीय नेते आहेत की ज्यांनी सर्वोच्च शिखर स्थानी पोहोचूनही अत्यंत गरिबीत व साधेपणाने आपले आयुष्य व्यतित केले.
भारताचे असेच एक माजी काळजीवाहू पंतप्रधान व स्वातंत्र्यसेनानी होऊन गेले. त्यांनीही अतिशय गरीबीत व साधेपणाचे आयुष्य जगले. कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यातही पैसे नसल्याने ते घराचे भाडेही चुकवू शकले नव्हते, असे सांगितले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. पण ते घडले आहे. दोन वेळा काळजीवाहू पंतप्रधानपद भूषविलेल्या दिवंगत गुलजारीलाल नंदा या नेत्याची ही कथा.
नंदा यांनी दोन वेळा काळजीवाहू पंतप्रधानपदाबरोबरच खूप वर्षे केंद्रीय मंत्रिपदे व इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. एवढे असूनही कारकीर्दीच्या शेवटच्या काळात त्यांच्याकडे नवी दिल्लीत स्वतःचे घर नव्हते. तसेच घराचे भाडे चुकवायलाही पैसे नव्हते. नंदा यांनी घरमालकाना कांही दिवसांची सवलत मागितली.
तसेच शेजाऱ्यांनीही घरमालकांना तशी विनंती केल्याने त्यांना कांही दिवसांचा वेळ मिळाला. त्यानंतर मात्र घरमालकाने त्यांना घराच्या बाहेर काढले. ही बातमी स्थानिक दैनिकात प्रसिध्द झाल्यानंतर तत्कालिन केंद्र सरकारच्या वतीने त्यांच्या घरी अधिकारी व वाहनांचा ताफा पाठविण्यात आला. एवढा मोठा ताफा घरी आल्यानंतर त्यांच्या घरमालकाला आपण ज्यांना घराबाहेर काढले ते माजी पंतप्रधान असल्याचे कळाले. मग त्याने त्यांची पाया पडून माफी मागितली.
शेवटच्या श्वासापर्यंत जगले साधे जीवन
आपल्या समाजवादी व वैयक्तिक मूल्यांशी त्यांनी आपली बांधिलकी जोपासली. त्यांच्या नातवाने चित्रे काढण्यासाठी कार्यालयातील कागदांचा केलेला वापर त्यांना आवडला नव्हता. भांडवलशाहीला विरोध ही भूमिका राहिल्याने त्यांनी मालमत्ता तयार केली नाही. त्यांना स्वातंत्र्यसेनानी म्हणून मिळालेली पाचशे रुपयांची पेन्शनही त्यांनी नाकारली.
नंतर मित्रांच्या आग्रहाखातर ती पेन्शन स्वीकारली. अत्यंत साधे जीवन जगलेल्या या नेत्याने शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य माणसाचे जीवन जगले. त्यांना अटलबिहारी वाजपेयी व देवेगौडा यांच्या प्रयत्नांनी भारतरत्न पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.