Manohar Parrikar
Manohar Parrikar 
देश

जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र : अवधूत पर्रीकर

सकाळवृत्तसेवा

लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नसे. जबरदस्त चिकाटी, एकाग्रता त्याच्या अंगी लहानपणापासूनच होती. आमचा योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याला कारण दुर्गानंद नाडकर्णी होते. यापूर्वी संघाचे अनेक लोक भेटले होते, पण त्यावेळी नाडकर्णी यांचा एखादा विषय पटवून देण्याच्या हातोटीने आमच्या बालमनावर भुरळ घातली.
- अवधूत पर्रीकर

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.’ ही म्हण मनोहरच्याबाबतीत तंतोतंत जुळली होती. लहानपणीच तो पुढे कोणीतरी मोठा होणार, हे आम्हा सर्वांनाच वाटायचे. जबरदस्त इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी, चिकाटी आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची हातोटी या गुणांवर त्याने देशाचे संरक्षणमंत्रिपद व गोव्याचे मुख्यमंत्रिपद भूषविले. मनोहरला भरपूर वाचनाची आवड होती. त्याचे मन चलबिचल झाले तर तो वाचनात आपले मन गुंतवायचा. त्यातूनच त्याला अपार आनंद मिळायचा. त्याच्यातील हे सर्व गुण आमची आई आणि मामा मुकुंद कामत धाकणकर यांच्याकडून मिळाले होते. आमचे मामा क्रांतिकारी होते. अनेकवेळा त्यांना पोर्तुगीजांनी आग्वाद तुरुंगातही डांबले होते. नंतर ते आंगोला (पोर्तुगाल) येथे गेले आणि तेथेच स्थायिक झाले.

लहानपणापासून मनोहरला खूप कष्ट करण्याची सवय होती. आईला तो घरकामात मदत करायचा. शाळेच्या सुट्या सुरू झाल्या की, आम्ही वडिलांना दुकानावर मदत करायचो. माझे आणि त्याचे प्राथमिक शिक्षण पर्रा-म्हापसा येथे झाले व नंतर म्हापसा स्कूल, मडगाव येथील लॉयोला हायस्कूलमध्ये. न्यू गोवा हायस्कूलमधून मनोहर दहावी उत्तीर्ण झाला. नंतर सेंट झेविअर आणि शेवटी पवई आयआयटीमधून धातुशास्त्र (मेटरलर्जी) अभियांत्रिकीची पदवी त्याने संपादन केली. त्याला खडकपूर-उत्तर प्रदेश या आयआयटीमध्ये मेकॅनिकल अभियंता शाखेत प्रवेश मिळाला होता, पण त्याने समाजसेवेची ओढ आणि गोव्यापासून जवळ म्हणून पवईतील आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. शिक्षणात तो पुस्तकातील किडा वगैरे नव्हता, सामान्य होता पण आपल्याला काय मिळवायचे आहे, याची त्याला जाण लहानपणापासूनच होती.

त्यात त्याची निरीक्षणशक्ती जबरदस्त. इयत्ता दुसरीत असताना त्याने वर्तमानपत्रे वाचायला सुरवात केली होती. यावरून त्याला वाचनाची केवढी आवड होती, हे दिसून
येते. त्याच्या लहानपणीची एक घटना सांगतो. आम्ही सर्व भावंडे आणि शेजारी खेळत होतो. त्यावेळी मनोहर खेळता-खेळता बाजूला असलेल्या एका खड्ड्यात पडला. लहान असल्याने त्याला खड्ड्यातून बाहेर येता येईना. त्याला वर कसे काढायचे, हे आम्हालाही कळत नव्हते. त्यावेळी मनोहरनेच आम्हाला सांगितले, जवळच गवताची रास आहे, ते गवत आणा व खड्ड्यात टाका. आम्ही त्याच्या सांगण्यावरून तसे केले, त्यानंतर तो गवतावर पाय देऊन आरामात खड्ड्यातून वर आला. यावरून आम्हाला त्याच्या तल्लख बुद्धिमत्तेची कल्पना आली. तो तल्लख मेंदू घेऊन जन्माला आला, हे एकंदरीत त्याच्या एकापेक्षा एक कारनाम्यांवरून दिसत होते, जाणवत होते. 

लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती पूर्ण केल्याशिवाय सोडत नसे. जबरदस्त चिकाटी, एकाग्रता त्याच्या अंगी लहानपणापासूनच होती. आमचा योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला. त्याला कारण दुर्गानंद नाडकर्णी होते. यापूर्वी संघाचे अनेक लोक भेटले होते, पण त्यावेळी नाडकर्णी यांचा एखादा विषय पटवून देण्याच्या हातोटीने आमच्या बालमनावर भुरळ घातली. संघाच्या शाखेवरच आम्हाला समाज, देश यांच्याशी बांधील आहोत याचे बाळकडू मिळाले. मनोहरचे नेतृत्वगुण संघाच्या शाखेतून विकसीत झाले. संघाच्या माध्यमातून सुरवातीला जनसंघ आणि नंतर भाजप असा त्याचा प्रवास झाला. भाजपची विचारसरणी गोव्याच्या जनमानसांत रुजविण्यासाठी त्याने जिवाचे रान केले. त्यावेळी त्याला राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारखे मित्र भेटले. तो सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये सहज मिसळायचा. त्याला कोणाशी कसे वागावे याची जाण होती. त्याने पहिली निवडणूक लोकसभेसाठी लढवली पण त्यात तो पराभूत झाला.

मनोहरला वाचनाचे वेड. वाचन विरंगुळा म्हणून न करता ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून तो करायचा. एखादे पुस्तक आवडल्यास ते रात्री जागून वाचायचा. अखेरपर्यंत वाचनाची त्याची सवय कायम होती. लहानपणी त्याला ‘चांदोबा’चे अंक वाचायची आवड होती. माझा भाऊ शिक्षणात खूप हुशार नव्हता. पण, विज्ञान, गणित यात त्याची गती चांगली होती. त्याची विचार करण्याची कुवत चांगली होती. त्याला हे गुण मामांकडून मिळाले. राजकारण हा व्यवसाय म्हणून तो पाहत नव्हता तर तो समाजसेवा म्हणून पाहायचा. समाजात सकारात्मक बदल व्हावेत, हा त्याचा उद्देश असायचा.

त्याची प्रशासनावर चांगली पकड होती. तो स्वतः खूप मेहनत करायचा व दुसऱ्याकडूनही ती तशीच अपेक्षा ठेवायचा. दुसऱ्यांना न दुखवता त्यांच्याकडून कसे काम करून घ्यायचे, याची त्याला जाण होती. त्यामुळे सरकारी कर्मचारी त्याच्यावर खूष असायचे. मनोहरच्या हाताखाली काम करायला आवडते, असे ते खासगीत अभिमानाने सांगायचे. मनोहरच्या पत्रिकेत राजयोग होता, असे आमच्या नात्यातील एका ज्योतिषाने त्याचा हात पाहून सांगितले होते. त्यावेळी आम्ही त्यांची टर उडवायचो. कारण मुळात आमच्या घराण्यात कोणीही राजकारणी नव्हता. आमचे वडील म्हापशात भुसारी दुकान चालवायचे. राजकारणाचा आम्हाला गंधही नव्हता, त्यामुळे हे अशक्‍य वाटायचे. एकंदर चित्र पहिले तर त्या ज्योतिषाची भविष्यवाणी खरी झाली होती. हातात घेतलेले काम मनापासून करायचे आणि ते परफेक्‍ट करायचे, मग त्यासाठी कितीही त्रास सहन करावा लागला तरी त्याचे मनोहरला काहीच वाटत नव्हते, ही मनोहरची खासियत होती. कठोर मेहनत करणे हा त्याचा गुण वाखाणण्यासारखा होता. संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्याच्या स्वभावात बदल झाला नव्हता. आमच्यातून तो अचानकपणे गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या आठवणी आमच्या हृदयात कायम राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT