देश

भारताच्या पाठीशी अमेरिकेची ताकद; द्विपक्षीय चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - भारत आणि अमेरिकेच्या ‘व्यापक वैश्‍विक सामरिक भागीदारी’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाचा मुद्दा भारताने अमेरिकेसमोर द्विपक्षीय चर्चेत आक्रमकपणे उपस्थित केला. दहशतवादाच्या समर्थकांना जबाबदार धरण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न वाढविण्यावर सहमती व्यक्त केली. तर, दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारताला सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासन ट्रम्प यांनी या वेळी दिले. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोनदिवसीय भारत दौऱ्यातील महत्त्वाच्या टप्प्यात आज पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. त्यात महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तबही करण्यात आले. तत्पूर्वी, ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांनी आज सकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या वेळी लष्कराने दिलेली मानवंदना ट्रम्प यांनी स्वीकारली. दुपारी हैदराबाद हाउस येथे झालेल्या ट्रम्प-मोदी द्विपक्षीय चर्चेदरम्यान दोन्ही देशांचे उच्चस्तरीय अधिकारीदेखील सहभागी झाले होते. बंद दरवाजाआड दोन्ही देशांच्या वाटाघाटी झाल्या. धार्मिक स्वातंत्र्य तसेच एच १ बी व्हिसा या मुद्द्यांवरही चर्चा झाली. द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि अमेरिकेदरम्यान आरोग्य, ऊर्जा तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित तीन करारांवर सह्या झाल्या. तीन अब्ज डॉलरहून अधिक रकमेच्या संरक्षण साहित्यविषयक करारांमुळे दोन्ही देशांमधील सामरिक संबंध अधिक दृढ झाल्याचे ट्रम्प यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. 

प्रारंभी ट्रम्प यांनी भारतात झालेल्या स्वागतामुळे भारावल्याचे आणि हा दौरा आपल्यासाठी विशेष असल्याचे प्रतिपादन केले. अहमदाबादमधील मोटेरो स्टेडियममध्ये झालेले भव्य स्वागत तसेच त्यात असलेल्या सव्वा लाख लोकांच्या उपस्थितीचा उल्लेख केला. भारत आणि अमेरिकेची परंपरा एकसमान असल्याचे प्रतिपादन करताना ट्रम्प यांनी भारताला ऊर्जा क्षेत्रातील निर्यातीमध्ये ५०० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे सांगितले. द्विपक्षीय आर्थिक संबंधांबाबतही भारताशी महत्त्वाची चर्चा झाल्याचे सांगणाऱ्या ट्रम्प यांनी या वेळी भारताला दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासन दिले. तर, पंतप्रधान मोदींनी भारत आणि अमेरिकेचे संबंध फक्त सरकारी पातळीवरील नव्हे, तर दोन्ही देशांमधील नागरिकांचे लोककेंद्रित संबंध असून, ही 21व्या शतकातील सर्वांत महत्त्वाची भागीदारी आहे. म्हणूनच, दोन्ही देशांचे संबंध व्यापक वैश्‍विक सामरिक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्गार काढले. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रातील सामरिक भागीदारी सर्वाधिक महत्त्वाची आहे. अत्याधुनिक संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानामुळे भारताच्या संरक्षणसिद्धतेत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. भारतीय सैन्यदळांचा सर्वाधिक युद्धसराव अमेरिकी सैन्यासोबत झाला असून, दोन्ही सेनादळांमध्ये तांत्रिक समन्वय वाढल्याचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच, दोन्ही देशांच्या व्यापारामध्ये मागील तीन वर्षांत लक्षणीय वृद्धी झाल्याकडेही लक्ष वेधले. 

पंतप्रधान मोदी उवाच 
- ऊर्जा, संरक्षण, विमान उत्पादन तसेच उच्च शिक्षण या चार क्षेत्रांत व्यापारात ७० अब्ज डॉलरची वाढ 
- भारत आणि अमेरिकेची मैत्री लोकशाही मूल्यांवर आणि समान उद्दिष्टांवर आधारित 
- प्रशांत महासगर क्षेत्रात दोन्ही देशांचे सहकार्य महत्त्वाचे 
- अंतर्गत सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी संयुक्त लढ्यावर दोन्ही देशांची तयारी 

आम्ही धार्मिक स्वातंत्र्याबाबतही चर्चा केली. जनतेला धार्मिक स्वातंत्र्य असावे, अशीच पंतप्रधान मोदींची इच्छा आहे. त्यासाठी ते बरीच मेहनतही घेत आहेत. काही ठिकाणी वैयक्तिक हल्ले झाल्याचेही मी ऐकले आहे. पण, मी याबाबत बोलणार नाही, हा भारताचा अंतर्गत मामला आहे. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT