कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘बंगाल ग्लोबल बिझनेस समीट’च्या निमित्ताने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज्यातील उद्योगपतींना तपास संस्थांचा त्रास होता कामा नये याची काळजी आपण घ्यावी, तसे केंद्र सरकारलाही कळवा अशी विनंती त्यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांना केली आहे.
‘‘राज्यपालांनी तपास संस्थांच्या कारवायांचा मुद्दा केंद्र सरकारच्या कानी घालावा कारण उद्योगपती त्यावर काहीही स्पष्टपणे बोलणार नाहीत. आम्हाला केंद्रीय संस्थांकडून मदतीची अपेक्षा आहे त्यामुळे त्यांचा उद्योजकांना त्रास होता कामा नये याची काळजी घेण्यात यावी.’’ असेही ममतांनी नमूद केले. विशेष म्हणजे ममतांनीही याआधी केंद्रीय तपास संस्थांच्या कारवायांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.
राज्य सरकारवर सातत्याने टीका करणारे राज्यपाल धनकर यांनी या संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर या सहाव्या दोन दिवसीय उद्योग संमेलनास आजपासून सुरूवात झाली. या संमेलनामध्ये ४९ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून भारतातील दिग्गज उद्योगपतींनी या संमेलनाला हजेरी लावली आहे. यामध्ये गौतम अदानी, ‘जेएसडब्लू’चे अध्यक्ष सज्जान जिंदाल आदींचा समावेश आहे.
आठ आधारस्तभांवर काम
राज्यामध्ये वेळोवेळी होणारे संप आणि आंदोलने यांच्यामुळे वाया जाणारे मनुष्य दिवस आता शून्यावर आणण्यात आले असून राज्यामध्ये डाव्या राजवटीचे सरकार असताना दरवर्षी हे प्रमाण ७५ लाख एवढे होते त्यामुळे उद्योगपतींनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन ममतांनी केले. राज्य सरकार विकासाच्या आठ प्रमुख आधारस्तंभांवर काम करणार असून त्यामध्ये पायाभूत सेवा, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, कौशल्य विकास आणि उद्योगस्नेही वातावरण आदींचा समावेश आहे. राज्यामध्ये डाव्या आघाडीचे सरकार असताना आम्ही दरवर्षी ७५ लाख मनुष्य दिवस वाया घालवीत होतो. आता कोठेही तशी स्थिती पाहायला मिळत नाही असे सांगतानाच ममतांनी जंगलमहालमध्ये ७२ हजार कोटी रुपयांची औद्योगिक वसाहत उभारण्याची घोषणा केली आहे.
अदानी गुंतविणार दहा हजार कोटी
येत्या काही दशकांमध्ये अदानी उद्योगसमूह पश्चिम बंगालमध्ये दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा या उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आज केली. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा या ठिकाणी उभारण्यात येणार असून त्यामध्ये डेटा सेंटर, समुद्राखालून केबलचे विस्तारीकरण आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. याचा मोठा लाभ डिजिटल संशोधनाच्या क्षेत्रातील सेंटर्स ऑफ एक्सलन्स, वेअरहाउस आणि लॉजिस्टिक पार्क यांनाही होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या अदानी विलमार कंपनीचा हल्दिया येथे खाद्य तेलाचा प्रकल्प आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.