देश

#Jaganelive भंगार वेचून ‘त्या’ शिवताहेत फाटका संसार !

संजय सूर्यवंशी

कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं आहे. पहाटे चार वाजता उठणं, दिवसभर कष्ट करणं आणि संध्याकाळी चारच्या आत घरात येणं हे त्यांचं जीवनचक्र बनलं आहे. ते अव्याहतपणे फिरतंच आहे.

‘‘भाऊ, आमचं घर या मोडक्‍या बाजारावर चालतं बगा... न चुकता पहाटे सव्वाचार वाजता घरातून बाहेर पडायचं... काचा, बाटल्या, भंगाराचं लोखंड, मिळंल ते दिवसभर गोळा करायचं... संध्याकाळी शे-दीडशे रुपये घेऊन घराकडं यायचं... ३५ वर्सं हा नेम काय चुकला नाही बगा... भंगार गोळा करणं हेच आमच्या नशिबी हाय...’’ बेळगावातल्या रेखा मोहन खोरागडे या भंगार गोळा करणाऱ्या डोंबारी समाजातील महिलेनं ‘सकाळ’सोबत बोलताना मांडलेली ही व्यथा तिच्यासारख्या शेकडो महिलांची व्यथा सांगणारी आहे.

बेळगावच्या पश्‍चिमेला असलेल्या ज्योतीनगर परिसरात या डोंबारी समाजाची सुमारे ४०० घरं आहेत. या वस्तीतले पुरुष जातात मिळेल ते मोलमजुरीला आणि महिला भंगार वेचण्याच्या कामाला. प्लास्टिकच्या बाटल्या, पुठ्ठे, लोखंड, प्लास्टिक, 

कागदे जे काही मिळेल ते घेऊन या महिला शहरातील ३० ते ३५ भंगार अड्ड्यांवर जाऊन विकतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचं घर चालतं. 

पहाटे चारच्या दरम्यान भंगार गोळा करायला बाहेर पडलेल्या सुमारे ४०० महिला संध्याकाळी चारच्या आत घरात येतात. चारच्या आत घरी येणं हा एक अलिखित नियमच आहे. त्याचं ऐतिहासिक कारण सांगताना निवृत्त शिक्षक भिकाजी धनाजी भोसले म्हणाले, ‘‘शिवरायांच्या काळात डोंबारी समाजात सर्जा अन्‌ कस्तुरा हे शूर जोडपं होतं. अर्जुन गडाचा गडकरी अहंमद खान याने कस्तुरा डोंबारणीचा खेळ पाहिला अन्‌ त्याने तिला पळवूनच नेण्याचा प्रयत्न केला; परंतु कस्तुरा त्याच्या तावडीतून सुटून आली. तेव्हापासून डोंबारी महिला सूर्यास्तापूर्वी म्हणजे चारच्या आत घरात परततात. त्यातूनही एखादी महिला वेळेत घरी आली नाही, तर तिला समाजाबाहेर काढण्याचा अधिकार आजही आहे. अलीकडे शिकलेल्या मुली या रूढींना फारसे महत्त्व देत नाहीत.’’ 

सोळाव्या शतकातील या लढवय्या समाजाला इंग्रजांनी गुन्हेगार ठरवले. तेव्हाचा शिक्का पुसणे त्यांना अजूही अवघड जात आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीने याच समाजातील एका तरुणाला ताब्यात घेतले होते. नंतर तो निर्दोष निघाला! अर्धवट शिक्षण झालेले अनेक तरुण मोलमजुरीला, अंगमेहनतीच्या कामावर जातात. अर्थात त्यांच्या कुटुंबाला खरा आधार आहे तो भंगार वेचणाऱ्या महिलांचा. कारण त्यांना रोजचे ताजे पैसे मिळतात.

रोज घाणीत, कचऱ्यात काम करत असल्याने या महिला अंगदाह, डोकेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, दातदुखी आदी आजारांच्या तक्रारी करतात. रोटीबेटीसारखे व्यवहार जातपंचायतीच्या नियमाने चालायचे. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांची मुले शिकू लागली आहेत. हे भंगार वेचण्याचे काम करायचे नाही, असा निश्‍चय करू लागली आहेत. अर्थात आम्हाला हातपाय चालत आहेत, तोपर्यंत हे काम करावेच लागणार आहे, असे या महिला बोलून दाखवत आहेत. या समाजातील काही मुले उच्चशिक्षित झाली आहेत. कष्ट, गरिबीचे हे चक्र भेदण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

नवी पहाट उगवते आहे...
डोंबारी समाजातील तरुण पिढीला आता गावकी स्वीकारत आहे. त्यांना ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष आदी पदे मिळत आहेत. बचतीची सवय लागावी म्हणून डोंबारी समाजासाठी सहकारी पतसंस्था स्थापन केली गेली आहे. या पतसंस्थेचा आर्थिक व्यवहारही चांगला आहे. तरुण-तरुणी शिकत आहेत. आधुनिक पेहराव परिधान करत आहेत.  नको असलेल्या जुन्या परंपरा झिडकारू पाहत आहेत.

पहाटे चार वाजता उठायचे, रिक्षा थांब्यावर यायचे अन्‌ येथून शहरात भंगार गोळा करण्यासाठी जायचे. ३५ वर्सं झाली, आपला नेम काय चुकला नाय... पोरं मोठी झाली... माझा राजेश आता ३५ वर्सांचा झालाय... कुठं झाडं तोडायला जा, सेंट्रिंगचं काम कर, असं करून तो जगतोय... पण आम्हाला जगायला भंगार गोळा करणं हेच नशिबी हाय... हातपाय चालतात... तोपर्यंत हे करत राहणार....
- श्रीमती रेखा खोरागडे,
भंगार वेचक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT