मंगेश वैशंपायन
नवी दिल्ली - भारताच्या 16 व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड हे अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजयी झालेत. 71 वर्षीय धनखड यांना पाहिल्या पसंतीची तब्बल 528 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना 182 मते मिळाली. 15 मते बाद झाली. लोकसभा महासचिव उत्पलकुमार सिंग यांनी आज रात्री 7 वाजून 50 मिनीटांनी धनखड यांच्या विजयाची घोषणा अधिकृतरीत्या केली. त्यांच्या विजयामुळे लोकसभा व राज्यसभेचे पीठासीन अधिकारी एकाच राज्यातील (राजस्थान) असल्याचा, उंबराच्या फलासारखा दुर्मीळ योगायोग जुळून आला आहे. वर्तमान लोकसभा सभापती ओम बिर्ला हे कोटाचे खासदार असून धनखड यापूर्वी झुनझुनूतून संसदेवर (लोकसभा) निवडून आले होते. 1974 पासून सुरू असलेल्या धनखड यांच्या सार्वजनिक जीवनाची यात्रा उपराष्ट्रपतीपदापर्यंत येऊन ठेपली. धनकड यांच्या रूपाने आणखी एका ओबीसी नेत्याला उपराष्ट्रपतीपदाचा मान मिळाला आहे. (Vice President Election news in Marathi)
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक दर 5 वर्षांनी होते. या निवडणुकीसाठी फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदाारांनाच मतदानाचा अधिकार असतो. सध्या संसदेची एकूण खासदारसंख्या 788 आहे. मात्र राज्यसभेतील 8 राष्ट्रपतीनियुक्त सरकारची पदे मोदी सराकरने न भरल्याने प्रत्यक्ष मतदारांची संख्या 780 होती. त्यापैकी 725 खासदारांनी (99.94% ) मतदान केले. 55 खासदारांनी मतदान केले नाही. यात तृणमूल काॅंग्रेसच्या 34, शिवसेना व स. पा. च्या प्रत्येकी 2, बसपाचे खासदारांचा समावेश आहे. मतदानही धड न करता आलेल्या किमान 15 खासदारांची नावे लगेच समजू शकली नाहीत.
येत्या 11 ऑगस्ट रोजी (बुधवारी) उपराष्ट्रपती धनखड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ घेतील. त्यानंतर ते राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील.
उपराष्ट्रपतीपदासाठी आज सकाळी 10 पासून मतदानास सुरवात झाली. सायंकाळी 5 पर्यंत मतदान चालले मात्र बहुतेक खासदारांनी त्याआधीच मतदान केले. दुपारी अकरानंतर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. यासाठी संसदेतील दालन क्र.63 मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यसभेच्या लाल रंगाच्या धर्तीवर येथे लाल गालिचा अंथरण्यात आला होता. त्याबाहेरच्या गॅलरीत पांढर्या रंगाचे पडदे लावण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी सुरवातीला मतदान करणार्यांत सहभागी होते. त्यानंतर माजी पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग, काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आदी दिग्गजांनी टप्प्याटप्प्याने मतदान केले. काॅंग्रेस नेते राहूल गांधी मतदानास आले तेव्हा आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती प्रवीण पवार मतदान करत होत्या. त्यांच्यानंतर गांधी व त्यानंतर रजनी पाटील आदींनी मतदान केले.
या निवडणुकीत धनखड यांचे पारडे अर्थातच जड होते. भाजपकडे स्वतःची 303 अधिक राज्यसभेतील 91 अशी 394 मते असल्याने तेथेच धनखड यांचा विजय निश्चित झाला होता. प्रश्न होता तो धनखड यांचा निर्भेळ व घसघशीत विजय होणार का. त्याचे उत्तर निकालांतून संध्याकाळी मिळाले. याशिवाय बीजू जनता दल, अण्णाद्रमुक, वायएसआर काॅंग्रेस व अनेक अपक्षांचाही पाठिंबा धनखड यांना मिळणार हेही उघड होते. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेले धनखड यांची `बदली` होताच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काॅंग्रेसने आपल्या खासदारांना या निवडणुकीतील मतदान `एेच्छिक` करून धनखड यांचा मार्ग आणखी प्रशस्त केला होता. आजच्या मतदानात तृणमूलच्या लाॅकेट चतर्जी यांच्यासह किमान 34 खासदारांनी मतदान केले.
दरम्यान धनगड विजयी होताच त्यांच्या दिल्लीतील 11 अकबर रोड या तात्पुरता निवासस्थानी एकच जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांनी यांचे अभिनंदन केले हा संपूर्ण परिसर लावण्यात आला होता.
अशी झाली निवडणूक...
भारताच्या उपराष्ट्रपतीपदाबाबतचे नियम राज्यघटनेने कलम 63 ते 71 दरम्यान स्पष्ट केले आहेत. हे देशातील क्रमांक दोनचे सर्वोच्च पद आहे. भाररताचे ुपराष्ट्रपती राज्यसभेचेही पदसिध्द अध्यक्ष असतात. आधीच्या ुपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपल्यावर 60 दिवसांच्या आत मतदान घेणे अनिवार्य असते. या निवडणुकीसाठी प्राधान्यक्रमाने म्हणजे पहिल्या व दुसऱया क्रमांकाच्या पसंतीचे मत, या पध्दतीने मतदान करावे लागते. हे मतदान मतपत्रिकांद्वारे होते. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवाड्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयास असतो.
नायडूंचा निरोप समारंभ सोमवारी
वर्तमान उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 आॅगस्ट रोजी समाप्त होत आहे. 8 आॅगस्ट रोजी (सोमवारी) नायडू यांना राज्यसभा निरोप देईल. यावेळी सर्वपक्षीय नेते भाषणे करतात. त्यामुळे त्या दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज रद्द करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी या पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरू झाल्यानंतर तब्बल जवळपास महिनाभराने प्रथमच राज्यसभेत येण्याची शक्यता आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.