live Updates news in marathi esakal
देश

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 14 September 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सूरज यादव

Pune Live :  ओबीसी वर्गात एकाही बनावट व्यक्तीचा समावेश केला जाणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी वर्गात एकाही बनावट व्यक्तीचा समावेश केला जाणार नाही. बनावट म्हणजे जे ओबीसी नाहीत ते. जीआरमध्ये याची काळजी घेण्यात आली आहे. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

PM Narendra MOdi Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोलकातामध्ये जोरदार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथे पोहोचले; त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी उद्या कोलकाता येथे १६ व्या संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-२०२५ चे उद्घाटन करतील.

Maharashtra Live : ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आणखी एकाने जीवन संपविले

धाराशिव जिल्ह्यामध्ये ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ओबीसी आरक्षण जाणार म्हणून या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केली.

IND vs PAK Live : भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी निदर्शने

दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे भारत-पाकिस्तान सामन्याविरुद्ध आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. नंतर पोलिसांनी त्यांना पांगवले.

IND vs PAK: भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला

भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्याच्या निषेधार्थ शिवसेनेने पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला आहे.

Mumbai News: काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून दहिसर परिसरात गुंडागर्दी

महिला पोलिसांचा विनयभंग आणि दहिसर परिसरात भाईगिरी करणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. आशिष मिश्रा असे राष्ट्रीय प्रवक्त्याचे नाव असून त्याने दहिसर पोलीस ठाण्यात जाऊन महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करून विनयभंग केला याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आशिष मिश्रा याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे असून खंडणी आणि धमकीच्या प्रकरणात देखील अनेक अर्ज प्राप्त आहेत. या अर्जाप्रकरणी देखील दहिसर पोलीस तपास करत आहेत.

 Rain News: मंगरूळ, घनसावंगी गावात पूरस्थिती

गोदावरी नदी पात्रात जायकवाडी धरण क्षेत्र व बाजूच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-पात्रातील पाणी वाढून मंगरूळ गावात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली. शिवणगाव बंधाऱ्यातील पाणी गावात शिरल्याने अनेकांचे गोठे पाण्याखाली गेले व जनावरांचा चारा, वैरण, कडबा, भुस्कट, खत, अन्नधान्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Raigad News: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

पहलगाम येथे गेलेल्या भारतीय पर्यटकांवर गेल्या वर्षभरापूर्वीच पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करून अनेक महिलांचे सिंन्दुर पुसले त्यामुळे पाकिस्तानाला योग्य धडा शिकवावा अशी भूमिका भारतीयांची असतानाही आज पाकिस्तान बरोबर भारताचा क्रिकेट सामना होत असून त्याला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

Nashik News: सुरगाण्यात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान ICH महोत्सव

पर्यटकांना इथे भेटतील बोहाडा शिल्पकार, पारंपरिक वाद्यकार, आणि आदिवासी कथा सांगणारे परंपरा धारक! त्यांचं जग, त्यांची कहाणी — आणि त्यांचं जगणं... हे सगळं प्रत्यक्ष पाहण्याची संधी तुम्हाला इथे मिळणार आहे.

Sangli News: तासगांव तालुक्यातील पेड गावात बिबट्या कोंबड्या खायला गेला आणि खुराड्यात अडकला

पेड येथे वस्तीभाग असणाऱ्या विठ्ठलनगर येथील शिवाजी बापूसो शेंडगे यांच्या घराजवळ शनिवारी रात्री दहाच्या सुमारास बिबट्या आला. शेंडगे यांच्या घरासमोर असलेल्या खुराड्यात कोंबड्या खाण्यासाठी शिरला आणि तो खुराड्यात अडकला.

ठाकरे गटाच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले - चंद्रशेखर बावनकुळे 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ठाकरे गटाच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले, जे देशद्रोही कृत्य आहे. नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्राला जागतिक स्तरावर प्रोत्साहन दिले असून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. मात्र उद्धव ठाकरे क्रिकेटसारख्या खेळालाही राजकारणात ओढून नेत आहेत. ऑपरेशन सिद्धूर दरम्यान उद्धव ठाकरे देशाबाहेर पर्यटनावर होते, जेव्हा देशात हल्ला झाला तेव्हा त्यांनी त्वरित परत यायला हवे होते, पण त्यांनी परतण्याचे टाळले. त्यामुळे त्यांच्या मनात हिंदू आणि देशाप्रती खरी भावना नाही, असे दिसते. पहलगाम घटनेनंतर ते लंडनमध्ये राहिले होते. बावनकुळे यांनी असा सवाल उपस्थित केला की, ठाकरे यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे का फडकवले गेले आणि त्याबाबत त्यांनी उत्तर द्यावे.

Nagpur Live: भारत-पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटचा मोर्चा

दुबईत होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ नागपूर शहरात शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे जोरदार मोर्चा काढण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे अयोग्य असल्याचे सांगत महिला मोर्चा रस्त्यावर उतरला. आंदोलनकर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना कुंकू पाठवण्याचा अनोखा उपक्रम राबवला. या वेळी राष्ट्रभावना आणि शहीदांचा अपमान केल्याचा आरोप करत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या.

Eknath Shinde LIVE : शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो हे मी दाखवून दिले - एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात स्वतःच्या आयुष्याचा प्रवास आणि कार्यकिर्दीतील अनुभव सांगितले. ते म्हणाले की, “शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो हे मी दाखवून दिले.” दुसऱ्याला मदत करण्याची ताकद असावी लागते, आणि तीच ताकद डॉक्टरांमध्ये असते असे ते म्हणाले. आपल्या मुलाने आईच्या जिद्दीमुळे एमबीबीएस ते एमएस ऑर्थोपेडिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला.

आपल्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक मोठे निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. समृद्धी महामार्गामुळे नागपूर–मुंबईचे 28 तासांचे अंतर 7 तासांवर आले, पुणे–मुंबई महामार्गावरील घाटात सर्वात मोठा बोगदा तयार झाला, पोस्टल रोड, मेट्रो कारशेड यासह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. याशिवाय लाडकी बहिणी योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी यांसारख्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या.

कोविड काळात स्वतः पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचे त्यांनी आठवले. आपल्या नेतृत्वाखालील कामगिरीमुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने प्रचंड विश्वास दाखवून लँडस्लाईड विजय दिला, असे शिंदे यांनी नमूद केले.

Nashik Live: मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून राडा

नाशिकमध्ये झालेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. सभागृहातच व्यासपीठावर दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. सत्ताधारी गटाचा दावा आहे की खासगी विद्यापीठ हेच संस्थेसाठी फायदेशीर ठरणार आहे, तर विरोधकांचा ठाम आग्रह आहे की क्लस्टर विद्यापीठच लोकशाही पद्धती जिवंत ठेवेल. खासगी विद्यापीठ निर्मितीला विरोधकांनी पूर्णपणे विरोध दर्शवला असून याच मुद्द्यावरून सभेचे वातावरण तापले.

IND vs PAK Match Live: भारत - पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; कांदिवलीत फोडले टीव्ही

आज होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कांदिवली पूर्व भागात शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्या नेतृत्वाखाली एलईडी टीव्ही फोडून निषेध करण्यात आला.

Mumbai Live: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत घेणार शपथ; फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून त्यांचे मुंबईत स्वागत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे मुंबईमध्ये स्वागत केले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सोमवारी मुंबईतील राजभवनात ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतील.

Live : उच्च पातळी बंधाऱ्याची दरवाजे उघडली

गोदावरी नदीपात्रात जायकवाडी प्रकल्‍प (नाथसागर जलाशय) मधून सांडव्याद्वारे एकूण 18 (नियमित) व 09 (आपत्कालीन) गेटमधून 103752 + 9432 = 113184 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने मंगरूळ ता.घनसावंगी उच्च पातळी बंधारा 100 टक्के पाणीसाठा असून एकूण विसर्ग 14000 क्युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे

Jalgaon Live : हॉटेलमध्ये गर्दीच्या वेळी फ्रीजचा स्फोट 

जळगावच्या भडगाव येथील अतिशय गजबजलेल्या पारोळा चौफुली वरील मिलन टी चहाच्या हॉटेलमध्ये दुपारी दीडच्या सुमारास ग्राहकांची गर्दी असतांना चहाच्या दुकानात असलेल्या डी फ्रिजचा अचानक स्फोट झाल्याने हॉटेल च्या मालकासह नऊ ते दहा जण जखमी झाले आहेत जखमींना पाचोरा येथील खाजगी व ग्रामीण रुग्णालयात तर काहींना जळगाव येथे खाजगी रुग्णालयात तर एकास पाचोरा येथून डायरेक्ट धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे . व्यवसायात डि.फ्रिजचा वापर कर्त्यांमध्ये या स्फोटामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Live : सातपूरमध्ये विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू

शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगरावर शनिवारी (ता. १३) सकाळी एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक चौकशीत बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Solapur Live: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

- सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

- होडगी रोडवरील सुझुकी आणि बजाज शोरूमला लागली आग

- आगीचे कारण अद्याप अस्पष्ट मात्र आग वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे

- अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल

- अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू

सध्या तरी पाकिस्तानसोबत क्रिकेट आणि व्यापार नको : हरभजन सिंह

आशिया कप सुरू झाला असला तरी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील क्रिकेट सामन्याबाबत हरभजन सिंह यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे. सध्या पाकिस्तानसोबत क्रिकेट तसेच व्यापार ठेवू नये, असे त्यांचे मत आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध सुरळीत होईपर्यंत सामना खेळू नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

Dhule Live : धुळे जिल्ह्यातील जलसाठा भरला; पाण्याचे संकट टळले

धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये 73 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली असून, बारा मध्यम प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मध्यम प्रकल्पांत 73 टक्के तर लघु प्रकल्पांत तब्बल 76 टक्के जलसाठा झाल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.

Pune Live : पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन — "माझं कुंकू, माझा देश"

दहशतवादी हल्ल्यांत माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारविरोधात शिवसेना महिला आघाडीने संताप व्यक्त केला आहे. याच निषेधार्थ "माझं कुंकू, माझा देश" या नावाने राज्यव्यापी आंदोलन राबवण्यात येत आहे.

Pune Live : जेजुरी पोलिसांचा थरारक सिनेस्टाईल पाठलाग; ड्रोनच्या मदतीने चोर पकडले!

पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलिसांनी सिनेस्टाईल थरार निर्माण करत चोरांचा थरारक पाठलाग केला. दौंडज गावात भरदिवसा दरोडा टाकून पळालेल्या तीन चोरांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद केले. नीरा रेल्वे गेटवर काही तरुणांनी चोरांना अडवलं, मात्र चोरांनी रिव्हॉल्वर दाखवत पळ काढला. यावेळी एक चोर पकडला गेला, तर उरलेले दोघेजण ऊसाच्या शेतात लपले होते. पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने शोध घेत अखेर त्यांनाही अटक केली.

Amaravati Live : अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

  • अमरावती येथील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप 25 ऑगस्ट पासून सुरू आहे,गेल्या 20 दिवसापासून या संपावर अद्याप तोडगा निघाला नाही...

  • त्यामुळे दीडशे ते दोनशे शस्त्रक्रिया रखडल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गैरसोय होत आहे.

  • शस्त्रक्रिया होत नसल्याने या रुग्णालयातील 150 पेक्षा जास्त बेड रिकामे आहे,

  • थकीत असलेल डॉक्टरांचे मानधन, तसेच मानधनात वाढ या मागणीसाठी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरांनी संप पुकारला आहे

Mumbai Live : विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

  • विरार रेल्वेस्थानकातून दादरकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका माथेफिरू तरुणाने महिला डब्यातील प्रवाशांना अश्लील शिवीगाळ तसेच हावभाव करून धुडगूस घातल्याने महीला प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते.

  • या माथेफिरूने ट्रेनच्या मालवाहू डब्यातून महिला डब्याच्या खिडकीवर आणि पत्र्यावर लाथा बुक्क्या मारून अक्षरशः दहशत निर्माण केली होती.

  • यावेळी मदतीसाठी महिला प्रवाशांनी रेल्वेच्या हेल्पलाइनवर फोन करूनही त्यांना मदत मिळाली नाही.

  • त्यामुळे लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Dharashiv Live : धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

  • जीव धोक्यात घालून नदीकाठावर पर्यटकांची रिलबाजी

  • चिमुकल्याना घेऊन उत्साही पर्यटकांचा फोटो सेशन

  • तेरणा धरण अगोदरच 100% क्षमतेने भरलं, रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीत पाण्याचा विसर्ग वाढला

  • प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, मात्र उत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी नदीकाठी सुरक्षा व्यवस्था नाही

Ajit Pawar Live : खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं

खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं की न बघावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीना काही भूमिका घेण्याचं निमित्त विरोधक पाहात असतात.

फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आवाहन आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर दिली आहे.

Sanjay Raut Live : भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

आजच्या मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग झालं आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.

मोदी-शाहांची ही राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे.

पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या देशातील महिलांच्या कपाळावरचा सिंदूर पुसला गेला.

मोदींनी छाती पिटण्याचा कार्यक्रम केला. भारताने याआधी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेतली आहे. पण जय शहा यांचा त्यात इन्ट्रेस्ट आहे.

मोदींना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजप के पापा वॉर रुकवा सकते है, मगर मॅच नही रोक सकते है.

ट्रम्प के दबाव मै, हिंदुस्तान पाकिस्तान का वॉर भी रोक सकते है, हा नक्की असा कोणता पैशाचा खेळ आहे?

असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

LiveUpdate: अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन’चा दशकपूर्ती सोहळा

पुण्यात नाम फाउंडेशनचा सोहळा

गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा पार पडतोय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा

२०१५ साली नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज फाउंडेशनची दशकपूर्ती होत आहे

यानिमित्ताने पुण्यात कार्यक्रमाचा आयोजन

LiveUpdate:  धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्रभर जोरदार पाऊस

कळंब, धाराशिव, उमरगा लोहारा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

कळंब तालुक्यातील शेलगाव जहागिरी गावातील आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान

झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन आणि ऊस पिकाचे मोठे नुकसान

शेलगाव गावालगत असलेला पूल मुसळधार पावसाच्या पाण्याने गेला वाहून

बहुतांशी नद्यानाल्याना पाणी आल्यानं शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची होतय शेतकऱ्यांमधून मागणी

Tuljabhawani Temple LiveUpdate : तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होणार

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ होत आहे.आज रात्रीपासून देवीच्या मंचकी निद्रेला सुरुवात होईल.

देवीच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्यासाठी शहरासह पंचक्रोशीतील महिला मंदिरात दाखल होतात.

आराध्याच्या मेळ्यात कापूस पिंजला जातो. तर तुळजापुरातील सेवेकरी पलंगे कुटुंबीय देवीच्या पलंगाची स्वच्छता करतात.

मंचकी निद्रा संपवून देवी 22 सप्टेंबर रोजी सिंहासनावर विराजमान होईल. त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल.

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी ही एकमेव चल मूर्ती असून वर्षभरात 21 दिवस पलंगावर असते.

Beed LiveUpdate: बीड शहरात गुंडाचा नंगा नाच, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचंही उल्लंघन

बीड शहरातील सराईत गुन्हेगार शेख नवीद शेख चॉंद या गुंडावर बीड पोलिसांनी MPDA अंतर्गत 3 जुन 2025 रोजी कारवाई केली होती.

त्याच्यावर पेठ बीड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या कारवाईनंतर हायकोर्टात त्याने जमीन अर्ज केला होता दोन दिवसांपूर्वी शेख नवीद याला जामीन मंजूर झाला. यानंतर तो बाहेर आल्यानंतर काल सायंकाळी 5 वाजता बीड शहरातील मोमीनपुरा भागात फटाक्यांची आतिषबाजी करत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.

Maharashtra Live : मराठा अन् बंजारा समाजानंतर वंजारी समाजही आरक्षणासाठी आक्रमक

मराठा समाजानंतर बंजारा समाज रस्त्यावरती लढाई लढायला उतरला आहे

आता अशा वंजारी समाज ही आक्रमक होताना पाहायला मिळत आहे

वंजारी समाजाचे नेते जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी नवी मागणी करत आता सरकार समोर नवा पेज उभा केला आहे

वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बाळासाहेब सानप यांनी केली आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वंजारी समाज बांधव निवेदन देणार आहेत वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू आता माघार नाही

अशी देखील भूमिका बाळासाहेब सानप यांनी घेतली आहे त्यांच्यासोबत बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी.

Nagpur Live : पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

मोबाइल डेटा सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती...

दिवसभर चौकशी केल्यानंतर त्या दोघांची सुटका झाली

पहलगाम हल्ला नंतर भारताने ऑपरेशन सिंदूर फत्ते केल्यानंतर पाकिस्तान मधील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या भारतीय नागरिकांवर सुरक्षा यंत्रणांनी नजर रोखून धरली

यातच कामठीतील एक शिक्षक आणि एक व्यापारी पाकिस्तान मधील सोशल मीडियाच्या ग्रुपवर सक्रिय असल्याचा लक्षात येताच दहशतवाद विरोधी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतल होते...

दोघांचे मोबाईल मधील डाटा जप्त करून दिवसभर चौकशी केल्यानंतर त्यांचे सुटका करण्यात आली

कामठीतून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्हीही संशयित मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील काही व्यक्तींशी संपर्कात असल्याची एटीएसला माहिती मिळाली होती.

Nagpur News Updates : पाकिस्तानी ग्रुपवर चॅट, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करणाऱ्या नागपूरमधील दोघांची एटीएसकडून सखोल चौकशी करण्यात आली. त्यांचा मोबाइल डेटा सुद्धा जप्त करण्यात आला आहे. दिवसभर चौकशी केल्यानंतर त्या दोघांची सुटका झाली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर फत्ते केल्यानंतर पाकिस्तान मधील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या भारतीय नागरिकांवर सुरक्षा यंत्रणांनी नजर रोखून धरली. यातच कामठीतील एक शिक्षक आणि एक व्यापारी पाकिस्तानमधील सोशल मीडियाच्या ग्रुपवर सक्रिय असल्याचं लक्षात येताच दहशतवाद विरोधी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतल होते.

Ayush Kokmar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

पुण्यात टोळीयुद्धातून हत्या झालेल्या आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आलीय. हे चौघेही आंदेकर कुटुंबातीलच आहेत. त्यांना पुणे पोलिसांनी गुजरातमधून अटक केलीय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई केली. शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Vidarbha Rain News : विदर्भात दोन दिवस मुसळधार, २२ सप्टेंबरपर्यंत पावसाचं सावट

विदर्भात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचं सावट राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार, सप्टेंबर मध्ये पुन्हा मान्सून सक्रियते नंतर पुढच्या आठवड्यात 18 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. - रविवार आणि सोमवारी विदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली... - गेल्या पाच दिवसापासून विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसत आहेत.

Pune Live Updates : अजित पवार हडपसरमधील विकास कामांच्या पाहणीला

उपमुख्यमंत्री अजित पवार करणार हडपसर मधील विकास कामांची करण्यासाठी पोहचले. खराडी केशेवनगर पूल पाहणी ते करणार आहेत. मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळ वाहतूक कोंडी पाहणी करतील. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परिवार मिलन अभियाना सुरुवात करणार मुंढवा पूल पाहणी करण्यासाठी अजित पवार पोहचले आहेत.

Marathi Sahitya Sammelan : पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड रविवारी (ता. १४) होणार असून, संमेलनाच्या तारखा व रूपरेषाही जाहीर होणार आहे. एकेकाळच्या मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात होत असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ 'पानिपत'कार विश्वास पाटील यांच्या गळ्यात पडण्याचा योग जुळून येण्याची शक्यता दाट आहे.

Maharashtra Weather Updates : राज्यात वादळी पावसाची शक्यता, अनेक भागात मुसळधार

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असून, कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. अनेक ठिकाणी पारा तिशीपार असून, शनिवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎‎‎ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे १६० मिलिमीटर आणि पालम येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: सूर्यकुमार - शुभमन गिलला सूर सापडला, पण पहिल्या T20I सामन्यावर पावसाचे पाणी, मॅच रद्द

Latest Marathi News Live Update : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपचे शक्तिप्रदर्शन !

तिच्याशिवाय पर्याय नाही! दिग्दर्शकासोबत भांडली, तडकाफडकी मालिका सोडली; आता त्याच शोमध्ये परतणार अभिनेत्री

Mumbai Traffic: मुंबईकरांनो आनंदाची बातमी! जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सुस्साट होणार, मार्गावरील मोठा अडथळा पालिकेने दूर केला

IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...

SCROLL FOR NEXT