Manipur Violence Esakal
देश

Manipur Violence : मणिपूरमध्ये भाजप नेत्यांच्या घरे, कार्यालयांवर हल्ले; पोलिस ठाण्यातून शस्त्रे लुटण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

मणिपूरमधील हिंसाचाराची धग आता भाजप नेत्यांच्या घरांमध्ये पोचली

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ- कोलकता : मणिपूरमधील हिंसाचाराची धग आता भाजप नेत्यांच्या घरांमध्ये पोचली असून सुरक्षा दलांनाही याचा दाह सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजधानीमध्ये शनिवारी रात्री सुरक्षा दले आणि आंदोलक यांच्यात जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन नागरिक जखमी झाले असून काही माथेफिरूंनी भाजप नेत्यांची घरे आणि पक्ष कार्यालयांना आगी लावण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

विष्णूपूर जिल्ह्यात क्वाकता आणि चुराचंद्रपूर जिल्ह्यात कांगवाई येथे स्वयंचलित बंदुकीतून गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम इंफाळमधील इरिंगबाम पोलिस ठाण्यातून काही आंदोलकांनी शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या खबरदारीमुळे एकही शस्त्र त्यांच्या हाती लागू शकले नाही.

आंदोलकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर शीघ्र कृती दलाचे जवान रात्रभर प्रयत्न करत होते. रात्री येथे एक हजार जणांचा समुदाय जमला होता त्याने पॅलेस कंपाउंडजवळील इमारतीला आग लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करावा लागला तसेच त्यांनी काही रबर बुलेट झाडल्याचे समजते.

भाजप कार्यालयास घेराओ

काही आंदोलकांनी आमदार विश्वजितसिंह यांच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न केला असता शीघ्र कृती दलाच्या जवानांनी त्यांना पांगविले. येथील सिंजेमायी परिसरातील भाजपच्या कार्यालयाला शनिवारी रात्री जमावाने घेराओ घातला होता पण या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी बंदोबस्त असल्याने तो या कार्यालयाला क्षती पोचू शकला नाही.

पोलिसांकडून लाठीमार

भाजप महिला आघाडीच्या नेत्या शारदा देवी यांच्या पोरामपेट भागातील घराची जमावाने तोडफोड केली. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याआधी आंदोलकांनी रस्त्यांवर अडथळे उभारत सुरक्षा दलांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी शुक्रवारी दुपारी सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य करण्यात आले.

केंद्रीयमंत्री आर. के.रंजनसिंह यांच्या घरावर आंदोलकांनी हल्ला करत त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या शेजारी असलेल्या एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या मालकीच्या वेअर हाउसला मात्र आग लावण्यात आली होती.

मिझोरामने मागितली आर्थिक मदत

ऐजॉल ः हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून येथे वास्तव्यास आलेल्या अकरा हजार निर्वासितांना मदत साहित्य पुरविण्यासाठी तातडीने आम्हाला आर्थिक निधी दिला जावा. अशी मागणी मिझोराम सरकारने केंद्राकडे केली आहे.

राज्य सरकारने दहा कोटी रुपये तातडीने दिले जावेत असे म्हटले आहे. मिझोरामच्या अनेक भागांमध्ये उभारण्यात आलेल्या मदत छावण्यांमध्ये सध्या या निर्वासितांचे वास्तव्य आहे. राज्याचे पर्यटनमंत्री रॉयते यांनी केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला यांना याबाबत पत्र लिहिले आहे.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांवर नाराज

मणिपूर हा या देशाचा भाग असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त करायला हवी होती, असे मत तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या ओकराम इबोबी सिंह यांनी मांडले. सिंह यांच्या नेतृत्वाखालील दहा सदस्यांचे एक शिष्टमंडळ सध्या दिल्लीत आले असून या शिष्टमंडळाने १२ जून रोजीच पंतप्रधानांची भेटीसाठी वेळ मागितली होती पण त्यांना अद्याप ती मिळालेली नाही.

या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेस, संयुक्त जनता दल, भाकप, माकप, आरएसपी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, तृणमूल काँग्रेस, ठाकरे गट, आम आदमी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मणिपूर प्रमुखांचा समावेश आहे. या सर्वपक्षीय नेत्यांनी आज काँग्रेसच्या मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

‘भाजपशी युतीचा फेरविचार करू’

येत्या काळामध्ये राज्यातील परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही भाजपसोबतच्या आघाडीचा फेरविचार करू असा इशारा ‘नॅशनल पीपल्स पार्टी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष वाय. जॉयकुमारसिंह यांनी दिला आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आम्ही गप्प राहू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.

सध्या राज्यामध्ये ३५५ वे कलम लागू आहे त्यामुळे येथील लोकांचे संरक्षण करणे ही राज्याप्रमाणेच केंद्राची देखील जबाबदारी आहे पण प्रत्यक्षात हिंसाचार संपविण्यासाठी कोणतीही योग्य उपाययोजना आखण्यात आली नसल्याचे दिसून येते असे त्यांनी सांगितले.

केंद्रीयमंत्री आणि अन्य नेत्यांच्या घरांवर हल्ले होऊ लागले आहेत. गृहमंत्री शहा यांच्या दौऱ्यानंतर देखील परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाही. पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली असून लोक आम्हाला प्रश्न विचारू लागले आहेत. राज्यावर केंद्राचे नियंत्रण आहे की राज्य सरकारचे हेच समजत नाही असेही जॉयकुमार यांनी सांगितले.

तब्बल २२ वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा भीषण हिंसाचार मणिपूरमध्ये झाला तेव्हा सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीला आले होते. त्यावेळी वाजपेयी पंतप्रधान होते, संबंधित शिष्टमंडळाने भेट मागताच ते त्यांना सहा दिवसांच्या आत भेटले होते. आता तर पंतप्रधान कार्यालयाने याबाबत अवाक्षरही काढलेले नाही. त्यावेळी वाजपेयींना लोकांना शांततेचे आवाहन केले होते.

- जयराम रमेश,सरचिटणीस काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT