opposition parties
opposition parties 
देश

सत्ताधाऱ्यांकडून हौतात्म्यांचे राजकारण; विरोधकांचा हल्लाबोल

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी जवानांच्या हौतात्म्याचे राजकारण चालविल्याचा हल्ला विरोधी पक्षांनी भाजपवर चढवला आहे. दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी सैन्य दलाला एकमुखाने पाठिंबा देणार; मात्र पुलवामातील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वर्तन निराशाजनक ठरविणारे संयुक्त निवेदन आज कॉंग्रेससह 21 विरोधी पक्षांनी आजच्या बैठकीनंतर जाहीर केले. 

जैशे महंमदच्या छावण्यांवर भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांनंतर भारत - पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेससह 21 विरोधी पक्षांची आज बैठक झाली. निवडणुका तोंडावर असताना सत्ताधाऱ्यांकडून तापविले जात असलेले वातावरण, तणावाचा प्रचारासाठी गैरफायदा घेतला जाण्याची शक्‍यता आणि याचा निकालावर होणारा परिणाम याबाबतची चिंता तीन तास चाललेल्या या बैठकीच्या केंद्रस्थानी होती. सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराला प्रत्युत्तरासाठीची रणनिती तातडीने ठरविली जावी, अशी सूचनाही काही पक्षांकडून झाली. मात्र काही वरिष्ठ नेत्यांनी सध्याच्या तप्त वातावरणात विरोधकांनी काही बोलल्यास त्याचा चुकीचा संदेश जाण्याची शक्‍यता वर्तवून नाराज पक्षनेत्यांना अनावश्‍यक वक्तव्ये टाळण्याच्या सूचना दिल्याचे समजते.

अखेरीस संयुक्त निवेदनातून सैन्यदलांना पाठिंबा देण्याचे आणि सत्ताधारी भाजपला इशारा देण्याचे ठरल्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांच्या संमतीने संयुक्त निवेदन तयार करण्यात आले. पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीमध्ये शिरून केलेला हल्ला आणि वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पकडल्याच्या बातमीचीही चिंता बैठकीत होती. त्यामुळे लढाऊ वैमानिकाच्या हानीस पंतप्रधानांनाच जबाबदार धरले जाईल, अशी संतप्त भावना काही विरोधी पक्षनेत्यांनी या बैठकीत बोलून दाखविल्याचे समजते. पुढील आठवड्यात पुन्हा विरोधकांची बैठक बोलावण्याचेही आज ठरल्याचे कळते. 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बसप नेते सतीशचंद्र मिश्रा यांच्यासह शरद यादव, सीताराम येचुरी, शिबू सोरेन, राजू शेट्टी आदी 21 पक्षांचे नेते बैठकीत होते. प्रारंभी पुलवामातील हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन दहशतवादाविरुद्धच्या निर्णायक लढाईमध्ये सैन्यदळांसोबत एकजुटीने उभे राहण्याचा संकल्प व्यक्त करणारे निवेदन जारी करण्यात आले. बैठकीनंतर राहुल गांधींनी हे निवेदन वाचून दाखविले. 
विरोधी पक्षाचे निवेदन 

26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या छावण्यांवर केलेल्या हल्ल्यांची प्रशंसा विरोधकांनी केली. मात्र सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून जवानांच्या हौतात्म्याचा राजकारणासाठी होणाऱ्या वापराबद्दलही चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय सुरक्षा ही राजकीय पक्षांच्या स्वार्थापेक्षा सर्वोच्च आहे. त्यात राजकीय उद्दीष्ट साधण्याला कोणत्याही प्रकारचे स्थान नाही, असा टोला लगावतांना विरोधी पक्षांनी, पुलवामातील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली नसून पंतप्रधानांचे हे वर्तन निराशाजनक आणि लोकशाहीच्या सर्व संकेतांच्या विरुद्ध आहे, अशी कडवट शब्दात नाराजीही व्यक्त करण्यात आली. पाकिस्तानच्या दुस्साहसाचा निषेध करताना विरोधी पक्षांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या वैमानिकाच्या सुरक्षेची चिंता या निवेदनातून बोलून दाखविली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सार्वभौमत्व आणि एकतेच्या संरक्षणासाठी करावयाच्या सर्व उपायांसाठी देशाला विश्‍वासात घ्यावे, असे आवाहनही सरकारला संयुक्त निवेदनातून केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT