Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi : महाभारताचा ‘चक्रव्यूह’ आता ‘पद्मव्यूह’;राहुल यांचे भाजपवर टीकास्त्र; अदानी, अंबानी पुन्हा लक्ष्य

‘‘ महाभारतात अभिमन्यूला चक्रव्यूह रचून मारण्यात आले होते. चक्रव्यूहाचे ‘पद्मव्यूह’ हे कमळासारखे स्वरूप असते. देशात २१ व्या शतकात कमळाच्या आकाराचा नवा चक्रव्यूह असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल तसेच उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हे या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी आहेत,’’

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘ महाभारतात अभिमन्यूला चक्रव्यूह रचून मारण्यात आले होते. चक्रव्यूहाचे ‘पद्मव्यूह’ हे कमळासारखे स्वरूप असते. देशात २१ व्या शतकात कमळाच्या आकाराचा नवा चक्रव्यूह असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल तसेच उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी हे या चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी आहेत,’’ असा घणाघाती हल्ला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान केला.

राहुल यांनी अर्थसंकल्पाची खिल्ली उडविताना चौफेर टोलेबाजी केली तसेच संरक्षणमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यावरही बोचरी टीका केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे हल्ल्याच्या केंद्रस्थानी होते. याचदरम्यान अदानी आणि अंबानी या दोन्ही उद्योगपतींची सत्ताधाऱ्यांशी जवळीक असल्याचे आरोप करणाऱ्या राहुल गांधींना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेतेपद हे घटनात्मक असून संसदीय नियमांचे पालन करावे आणि सभागृहाची प्रतिष्ठा जपावी असे आवाहन वारंवार केले. यावेळी अग्नीवीरचा मुद्दा, संसदेच्या आवारात भेटीसाठी आलेल्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना कथित रोखण्याचा प्रकार यासारख्या उल्लेखांवरून पीठासीन अधिकाऱ्यांशी राहुल यांची जुगलबंदी रंगल्याचे दिसले. राहुल गांधींनी असत्य बोलू नये, संसदेचे दरवाजे कोणालाही बंद करण्यात आलेले नाहीत अशी समज लोकसभाध्यक्षांनी यावेळी त्यांना दिली तर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांच्याशीही राहुल यांची चकमक झडली.

पीठासीन अधिकाऱ्यांची समज

महाभारतातील युद्धातल्या चक्रव्यूहाचा संदर्भ देत राहुल गांधींनी सत्ताधारी भाजपवर तोफ डागली. ‘‘ चक्रव्यूहाचे दुसरे नाव पद्मव्यूह असून तो कमळाच्या आकारासारखा असतो. २१ व्या शतकात कमळाच्या आकारासारखा नवा चक्रव्यूह आहे, हे चिन्ह पंतप्रधान मोदी छातीवर मिरवतात. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूसोबत जे झाले होते ते आता महिला, कामगार, मध्यमवर्ग, शेतकरी, उद्योजक यांच्यासमवेत होत असून या आधुनिक चक्रव्यूहाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल तसेच उद्योगपती अदानी आणि अंबानी आहेत,’’ असा दावा राहुल यांनी केला. त्यावर सभागृहात नसलेल्यांची नावे घेऊ नये अशी समज पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली.

‘एमएसपीचा कायदा इंडिया करेल’

‘‘ शेतीमालाला किमान हमी भावाची (एमएसपी) कायदेशीर हमी शेतकऱ्यांना हवी आहे. यासाठीचा कायदा इंडिया आघाडी याच सभागृहात संमत करेल,’’ अशी हमी देत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. कोरोना काळात पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर थाळी वाजविणाऱ्या, मोबाइलचा टॉर्च पेटविणाऱ्या मध्यमवर्गाच्या छातीत आणि पाठीत अर्थसंकल्पामध्ये खंजीर खुपसण्यात आल्याचे शरसंधान राहुल गांधींनी केले. ‘इंडेक्सेशन’ आणि ‘कॅपिटल गेन टॅक्स’ हे ते खंजीर असल्याचे सांगताना आता मध्यमवर्ग ‘इंडिया’ आघाडीकडे येणार असल्याचा दावा राहुल गांधींनी केला.

‘ए वन, ए टू’

अदानी, अंबानी या दोन्ही उद्योगपतींचा उल्लेख करून राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. ही नावे नाही घेतली तर संपत्तीच्या एकाधिकारशाहीवर कसे बोलणार? असा उपरोधिक सवाल राहुल यांनी केला. या दोन्ही लोकांकडे विमानतळ, बंदरे, रेल्वे यासारखी दळणवळण यंत्रणा, दूरसंचार यांचा ताबा असल्याने त्यांच्याबद्दल बोलावेच लागेल असे त्यांचे म्हणणे होते. यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर दोन्ही उद्योगपतींची नावे कशी घ्यावी, ए वन, ए टू असा उल्लेख करावा काय? अशी उपरोधिक विचारणाही राहुल यांनी केली. सरकारला ए वन, ए टूचे रक्षण करायचे आहे, असा टोलाही त्यांनी संसदीय नियमावलीचा हवाला देत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना लगावला.

जातिनिहाय जनगणना करा

राहुल गांधींनी अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये जातिनिहाय जनगणनेची मागणी करताना अर्थमंत्रालयातील अर्थसंकल्प निर्मिती प्रक्रियेचा हिस्सा असलेल्या हलवा समारंभावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना चिमटा काढला. या समारंभाचे छायाचित्र सभागृहात दाखविण्याचा प्रयत्न करताना राहुल गांधींनी दावा केला की हा अर्थसंकल्प निर्मिती करणाऱ्या २० अधिकाऱ्यांमध्ये केवळ एक ओबीसी आणि १ अल्पसंख्याक आहे. अर्थसंकल्पाचा हलवा २-३ टक्के लोकांनी त्याच २-३ टक्के लोकांना वाटला. देशातील ९५ टक्के लोकांची त्यामध्ये हिस्सेदारी नाही. अर्थसंकल्पात जातिनिहाय जनगणनेचा काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. सरकारला ही जनगणना करावीच लागेल असा इशारा त्यांनी दिला. राहुल गांधींनी केलेल्या हलवा समारंभाच्या उल्लेखावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अक्षरशः डोक्याला हात लावून नाराजी व्यक्त केली.

मागासवर्गीय हे अभिमन्यू असल्याचा भ्रम पद्मव्यूहवाल्यांना झाला आहे. परंतु ते अभिमन्यू नव्हे तर अर्जुन आहेत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावला आहे. यापुढे ते संसदेत आपल्या भाषणाच्यावेळी कधीच उपस्थित राहू शकणार नाही.

- राहुल गांधी, विरोधी पक्ष नेते

राहुल म्हणाले

  • देशाच्या संपत्तीवर केवळ दोघांचे नियंत्रण

  • तपास संस्था बळकट करण्याची केंद्राची नियत

  • कर दहशतवाद रोखण्यासाठी अर्थसंकल्पात काह नाही

  • कोरोना काळात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना संपविले

  • अर्थसंकल्पातील प्रशिक्षणार्थीची इंटर्नशिप योजना म्हणजे थट्टा

  • मागील वर्षात सत्तर वेळा प्रश्नपत्रिका फुटल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT