Hathras Stamped Updat sakal
देश

Hathras Stamped Update : भोलेबाबाच्या बचावासाठी योगींच्या राजकारणाची ढाल

हाथरसमधील चेंगराचेंगरीत १२१ निष्पाप भाविकांचा बळी गेला. या घटनेला एक आठवडा उलटून गेला तरी भोले बाबा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

शरत प्रधान

लखनौ : हाथरसमधील चेंगराचेंगरीत १२१ निष्पाप भाविकांचा बळी गेला. या घटनेला एक आठवडा उलटून गेला तरी भोले बाबा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ‘ उत्तर प्रदेशमधील दलित आणि हिंदुत्वाच्या राजकारणामुळेच कायद्यापासून त्याला अभय मिळत आहे. स्वयंघोषित जगद्गुरू साकार विश्‍वहरी म्हणजेच अनुयायींचा भोलेबाबा हा या घटनेत भासविले जाते, तसा अजिबात निर्दोष नाही, हे स्पष्टच आहे. तरीही, या बाबाच्या विरोधात उत्तर प्रदेशातील सत्ताधारी किंवा प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उघडपणे समोर येण्याचे धाडस करू शकत नाहीत. पोलिस हवालदार ते स्वयंघोषित बाबा आश्रमाच्या नावाखाली सुमारे १०० कोटींचे साम्राज्य बाळगून आहे.

त्याचे कारण साधे आणि सोपे आहे. ज्याच्या जीवावर गेल्या दीड दशकात भरभराट झाली, त्या दलित समाजातूनच हा बाबा पुढे आला आहे. मध्य उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांत (मैनपुरी, एटा, हाथरस, अलिगड अणि फारुखाबाद ) मोठी संख्या असलेल्या दलितांमधील अनुयायांसह एक पंथ तयार करण्यासाठी या बाबाने पोलिस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. दलितविरोधी असा शिक्का बसण्याच्या भीतीने विविध राजकीय पक्ष बाबाविरोधात आवाज उठविण्यास टाळाटाळ करीत आहेत. दुसरीकडे हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करण्याचे काम बाबा करीत असल्याचा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त केला जात आहे.

बाबाच्या धर्मांतरविरोधी मोहिमेचे समर्थन राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही केले होते. मात्र, या भागात धार्मिक परिवर्तनाची कोणतीही घटना अलीकडच्या काळात नोंदवली गेलेली नाही. तरीही, या दोन कारणांमुळे पोलिसांनी आतापर्यंत बाबाविरुद्ध साधी ‘एफआयआर’ही नोंदवलेली नाही. त्याऐवजी सत्संगच्या आयोजकांवरच गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. मैनपुरीमधील आलिशान आश्रमात लपून बसलेल्या भोलेबाबाने एक निवेदन प्रसिद्ध करून ज्यावेळी चेंगराचेंगरी झाली तेव्हा तो स्वतः सत्संगला उपस्थित नव्हता असा दावा केला आहे. खरे पाहता सत्संगाच्या ठिकाणी केलेल्या अपुऱ्या व्यवस्थेसाठी तो थेट जबाबदार आहे. सत्संगासाठी ८० हजार लोकांसाठी त्याने परवानगी मागितली होती. स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली. मात्र त्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त किंवा वैद्यकीय मदतीसाठी आवश्यक व्यवस्था करण्याची तसदी संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही. कार्यक्रमस्थळी वैद्यकीय मदत आणि पोलिस तैनातीसाठी आवश्यक शुल्क भरण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने भोलेबाबाला करायला हवी होती. परंतु बाबांच्या तावडीमुळे कोणीही त्यांना आवश्यक पैसे देण्यास सांगण्याची पर्वा केली नाही. पण बाबाचा दरारा एवढा आहे, की त्याला तशी सूचना कोणीही धजावले नाही.

भोलेबाबाला सर्व नियमांची पूर्ण माहिती होती. सत्संगासारख्या कार्यक्रमांचे आयोजन स्वतः भोलेबाबा करतो आणि तेथील सर्व व्यवस्‍था त्याचे खासगी पथक करीत असल्याने आवश्‍यक औपचारिकता पाळली जात नाही. हाथरसमधील सत्संगाच्या आयोजनात प्रवेशद्वार किंवा बाहेर पडण्यासाठी बॅरिकेड उभारले नाहीत किंवा कार्यक्रमाला क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जमलेल्या गर्दीचे नियमन करण्याची गरजही त्यांना वाटली नाही. पैसे वाचविण्यासाठी पुरेसे पंखेही लावण्यात आले नव्हते. मंडपातील प्रचंड उकाड्यापासून बचावासाठी अनुयायांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता काही जणांना चक्कर आली. त्यांच्या मागे मोठा लोंढा बाहेर पडू लागला, तेव्हा ढकलाढकली होऊन अनेक जण खाली पडले. उकाड्यामुळे लोक चक्कर येऊन खाली पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर भोलेबाबाने कार्यक्रम आवरता घेतला. सत्‍संग समाप्त झाल्याचे जाहीर करून त्याचा मोटारीचा ताफा घाईघाईत बाहेर पडला. बाबा बाहेर पडत असल्याचे पाहून काही अनुयायी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी मागून धावू लागले. त्यावेळी अनेकजण एकमेकांच्या अंगावर पडले चेंगराचेंगरी झाली. पावसामुळे बाहेरचे मैदान निसरडे झाल्याने परिस्थिती अधिकच चिघळली होती. तेथे तैनात असलेले मूठभर पोलिस मदत करण्यास अपुरे होते. स्वाभाविकपणे परिस्थिती बिघडली आणि त्याची परिणती १२१ जणांच्या मृत्यूत झाली. यामध्ये तब्बल ११३ महिलांचा समावेश होता. ज्या बाबावर बलात्कारासह गुन्हेगारी आरोप आहेत, अशा बाबाला हे भोळे अनुयायी श्रीकृष्णाचा अवतार मानतात.

योगींचा बुलडोझर कुठे?

दुर्घटनेला भोलेबाबा तसेच जिल्हा प्रशासनाची हलगर्जी वृत्ती कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेच्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी या घटनेत निष्काळजीपणा दिसला तरी भोलेबाबाविरुद्ध अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. निष्पापांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला या बाबाच्या संपत्तीवर योगींचा प्रसिद्ध ‘बुलडोझर’ चालविला जाईल की नाही हा सवाल आहे.

‘एसआयटी’ची चाल

हाथरसमधील सत्संगातील दुर्घटनेच्या तपासासाठी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) अहवाल मंगळवारी जाहीर झाला त्यात भोलेबाबाला क्लीन चीट’ देण्यात आली आहे. बाबाच्या बचावासाठी नियमबाह्य मार्गाने तपास झाल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. ‘एसआयटी’ने सर्व जबाबदारी आयोजकांवर ढकलली आहे. अशा घटनांचा तपास ज्या पद्धतीने केला जातो, त्याला या प्रकरणात बगल दिली आहे. त्यामुळेच बाबाची बचावासाठी राजकीय वजन वापरण्यात येत असल्याच्या संशयाला बळ मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

माेठी बातमी! 'राज्यामध्ये दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद'; ई-केवायसीअभावी पुरवठा विभागाकडून कारवाई

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

SCROLL FOR NEXT