Tejashwi Yadav reacts after Nitish Kumar’s oath ceremony, highlighting major shifts in Bihar’s political landscape.
esakal
Nitish Kumar oath ceremony : नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन इतिहास रचला आहे. यानिमित्त पाटण्यातील गांधी मैदानावर झालेल्या भव्य शपथविधी समारंभात एनडीएने आपली ताकद दाखवून दिली आहे. नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला पंतप्रधान मोदींची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
तर आता, बिहारमधील विरोधी पक्षनेते राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यादव म्हणाले, "बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमारजी यांचे हार्दिक अभिनंदन. मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेतलेल्या बिहार सरकारच्या सर्व मंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन. आम्हाला आशा आहे की नवीन सरकार आपली आश्वासने आणि घोषणा पूर्ण करेल, लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करेल आणि बिहारच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडवून आणेल."
नितीश कुमार यांच्या पाठोपाठ सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. प्राप्त माहितीनुसार भारतीय जनता पक्षाकडे मंत्रिमंडळात १४ मंत्री आहेत, तर जेडीयूकडे आठ आहेत. एलजेपी (रामविलास) पक्षाकडे दोन आणि राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाकडे प्रत्येकी एक मंत्रीपद आहे.
शपथविधी समारंभात, पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय आणि एनडीएच्या प्रचंड विजयाबद्दल लोकांचे आभार मानले. त्यांनी व्यासपीठावरून गमछा फिरवून आणि बिहारच्या जनतेचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.