Uttarkashi Tunnel Rescue: ‘‘तुम्ही निराश होऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत,’’ अशा शब्दांत मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन करून उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांना धीर दिला जात आहे. मजुरांशी सकारात्मक संवाद साधण्यासाठीही मानसोपचारतज्ज्ञ कुटुंबीयांना मार्गदर्शन करत आहेत.
बोगद्याच्या कोसळलेल्या ढिगाऱ्यापलीकडील दोन किलोमीटरच्या पट्ट्यात हे मजूर अडकले असून एका पाईपमधून पाठविलेल्या माईकद्वारे मजुरांशी संवाद साधला जात आहे. खोदकामातील अडथळ्यांमुळे बचाव मोहीम लांबत आहे. त्यामुळे, मजुरांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ त्यांचे समुपदेशन करत असल्याची माहिती साबा अहमद या मजुराचा भाऊ नैय्यर अहमदने ‘पीटीआय’शी बोलताना दिली.
साबा बरोबरच इतर सर्व मजुरांशी घटनास्थळी उपस्थित असलेले डॉक्टरांचे पथक सकाळी नऊ ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान दिवसातून दोन वेळा संवाद साधत आहे. त्याचप्रमाणे, मजुरांच्या कुटुंबीयांना दिवसभरातून केव्हाही त्यांच्याशी संवाद साधण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रशासनाने बोगद्याबाहेर मजुरांच्या कुटुंबीयांसाठीही मदत छावणी उभारली आहे.
डॉ. प्रेम पोखरियाल म्हणाले, की या मजुरांना सुरुवातीला ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्स दिले जात होते. मात्र, आता त्यांना व्यवस्थित आहार दिला जात आहे. त्यात उकडलेली अंडी, चहा, डाळभात, चपातीभाजी आदींचा समावेश आहे. तसेच त्यांना टूथपेस्ट, ब्रश, टॉवेल, चित्रपट पाहण्यासाठी, व्हिडिओ गेम खेळण्यासाठी मोबाईल दिले जात आहेत.(Latest Marathi News)
टेकडीवरून ३१ मीटरपर्यंत खोदकाम
सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी टेकडीवरून उभ्या रेषेत खोदकाम करण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत ३१ मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. एकूण ८६ मीटर खोदकाम करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे, जमिनीशी समांतर सुरू असलेले खोदकाम अडथळ्यांमुळे थांबल्याने उर्वरित खोदकाम हाताने करण्यासाठी खाण कामगारांचे एक पथक सोमवारी घटनास्थळी दाखल झाले.
या बचावमोहिमेत सहभागी झालेले ले.जनरल हरपाल सिंह (निवृत्त) म्हणाले, की टेकडीवरून उभ्या दिशेने खोदकाम सुरू केल्यानंतर खडक व मातीची रचना जाणून घेण्यासाठी तसेच मार्गात कोणता अडथळा तर नाही ना, हे तपासण्यासाठी २०० मि.मी. रुंदीचे पाईप टाकण्यात आले. ते ७० मीटरपर्यंत पोचले. यानंतर ८०० मि.मी. व्यासाचे पाईप टप्प्याटप्प्याने अर्धा ते एक मीटर हळूहळू टाकले जातील.(Latest Marathi News)
घटनास्थळावर वैद्यकीय पथक उपस्थित असून बचावकार्य सुरू असेपर्यंत गरज भासल्यास उत्तरकाशी आणखी १० डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवले आहे. मानसोपचारतज्ज्ञ व डॉक्टर मजुरांच्या कुटुंबीयांच्याही सातत्याने संपर्कात असून मजुरांच्या मनावर नकारात्मक परिणाम होईल, असे न बोलण्यासाठीही कुटुंबीयांचे समुपदेशन केले जात आहे.- डॉ. विमलेश जोशी,नोडाल अधिकारी
मी बोगद्यात अडकलेल्या भावाशी दिवसातून दोनदा संवाद साधतो. त्याचप्रमाणे, बिहारच्या भोजपूरमध्ये असलेली भावाची पत्नी व तीन मुलांचाही त्याच्याशी संवाद घडवून आणतो. आम्ही त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. बचावकार्यातील अडथळ्यांबद्दल त्याच्याशी कधीही बोलत नाही तर तुम्हाला लवकरच बाहेर काढले जाईल, असे सांगतो. बोगद्यातील सर्व मजुरांची प्रकृती चांगली असून त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात आहेत. (Latest Marathi News)
- नैय्यर अहमद, बोगद्यात अडकलेल्या मजुराचा भाऊ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.