मित्रांनो, या वेळी एका आगळ्या-वेगळ्या पुस्तकाची आपण ओळख करून घेणार आहोत. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी ज्याप्रमाणे चांगले विचार, आत्मविश्वास आणि जिद्द हे गुण आवश्यक आहेत, तितकीच आणखी एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे देहबोली. ऐकायला थोडे गमतीशीर वाटत असले, तरी तुमची देहबोली तुमच्या मनात येणाऱ्या विचारांची शारीरिक अभिव्यक्ती असते.
त्यामुळे प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी आकर्षक आणि योग्य देहबोली अत्यंत आवश्यक आहे. ही देहबोली कशी असावी आणि समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीवरून त्या व्यक्तीच्या मनातील भावना कशा ओळखाव्यात याचे मार्गदर्शन ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी बॉडी लँग्वेज अर्थात देहबोली’ या कौलाचार्य जगदीश शर्मा लिखित आणि सुधीर सेवेकर अनुवादित पुस्तकात करण्यात आले आहे.
आपण संवाद साधताना शब्दांप्रमाणे चेहऱ्यावरील आणि डोळ्यांतील भाव यातूनही नकळतपणे अभिव्यक्त होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या हालचालीच्या माध्यमातून संवाद साधत असतो. बरेचदा शब्द जरी नेमका भाव व्यक्त करू शकले नाहीत, तरीही त्या हालचाली आपल्या मनातील भाव नेमकेपणे व्यक्त करतात.
त्याचप्रमाणे समोरची व्यक्ती आपल्याशी संवाद साधत असताना काही गोष्टी शब्दात व्यक्त करत नसली किंवा आपल्यापासून काही लपवत असली तरीदेखील तिची देहबोली, तिचे हावभाव हे बऱ्याचदा त्या व्यक्तीच्या मनातील नेमक्या भावना व्यक्त करत असतात. हालचालीच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या या भावना कशा ओळखायच्या? याचे मार्गदर्शन लेखकाने या पुस्तकात केले आहे.
आपण संवाद साधताना आपसूकच काही हालचाली अशा करतो ज्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडण्याऐवजी आपल्याबद्दल नकारात्मक भावनाही निर्माण होऊ शकते. अशा नेमक्या कोणत्या हालचाली आहेत? आणि कोणत्या हालचाली प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या निदर्शक आहेत? याचे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.
या पुस्तकात लेखकाने एखाद्या व्यक्तीची चालण्याची पद्धत, हस्तांदोलन करण्याची पद्धत यावरून त्या व्यक्तीच्या मनात नेमक्या कशा पद्धतीच्या भावना असाव्यात? याबद्दलच्या काही शक्यता व्यक्त केल्या आहेत. ज्या आपल्याबद्दल आणि समोरच्या व्यक्तीबद्दलही बऱ्याचदा लागू पडल्याचे आपल्या लक्षात येईल. इतकेच नव्हे, तर माणसांच्या मोबाईल वापरण्याच्या पद्धतीवरूनदेखील त्यांचा स्वभाव कसा असू शकतो, याचे अंदाज लेखकाने व्यक्त केले आहेत.
लेखकाने मांडलेली निरीक्षणे आणि बांधलेले अंदाज हे बहुतांशी लागू होत असल्याचे आपल्याला जाणवते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असताना, आपली देहबोली कशी असायला हवी? याचे मार्गदर्शनही या पुस्तकातून मिळते.
पहिल्यांदाच मुलाखत देणाऱ्या युवकांसाठी तसेच महाविद्यालयांमध्ये अथवा अन्यत्र प्रेझेंटेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीदेखील हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात काही शंका नाही. हे पुस्तक वाचून ज्या प्रमाणे मुलाखत, सादरीकरण, प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठी-भेटी या प्रसंगी औपचारिक संवाद साधत असताना आपली देहबोली कशी असावी?
याबद्दल माहिती मिळते, त्याचप्रमाणे मित्र-मैत्रिणींशी अनौपचारिक संवाद साधत असतानादेखील आपली देहबोली प्रभावी ठेवण्यासाठी यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही संवादांमध्ये देहबोली प्रभावी ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.
(संकलन - रोहित वाळिंबे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.