नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज ३ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ) जाहीर केला. मुलांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केले. या आराखड्यात बाल्यावस्थेतील काळजी आणि शिक्षण या दोन घटकांवर भर देण्यात आला आहे.
मंत्री प्रधान म्हणाले की, ‘‘ नवे शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने टाकण्यात आलेले राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षणविषयक राष्ट्रीय परिषदेने (एनसीईआरटी) देखील पुढील वसंत पंचमीपर्यंत हा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके पूर्ण करावीत असे आवाहन मी करत आहे. ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२०२२’ मध्ये चार घटकांचा समावेश करण्यात आला असून त्यात शालेय शिक्षण, बाल्यावस्थेतील काळजी अन् शिक्षण, शिक्षकांचे शिक्षण आणि प्रौढ शिक्षण यांचा समावेश आहे.
जगभरात शिक्षण, न्युरोसायन्स आणि अर्थशास्त्रामध्ये होत असलेल्या संशोधनाचा विचार करता एक बाब स्पष्ट होते की, उच्चदर्जाचे मोफत शिक्षण आणि बाल्यावस्थेतील काळजी यात गुंतवणूक करणे हा एक सर्वोत्तम मार्ग असतो. कोणताही देश स्वतःच्या भवितव्यासाठी याच मार्गाचा अंगीकार करेल. पहिल्या आठ वर्षांमध्ये मुलाच्या मेंदूचा सर्वाधिक वेगाने विकास होतो. त्यामुळे हा काळ महत्त्वपूर्ण असतो.’’
‘पंचकोश’ संकल्पनेचा समावेश
मुलांच्या शिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या या आराखड्यामध्ये ‘पंचकोश’ संकल्पनेचा समावेश करण्यात आला असून त्यातील पाच घटकांमध्ये शारीरिक विकास, प्राणिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास आणि चैतसिक विकास (आध्यात्मिक प्रगती) यांचा समावेश आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून मानवी शरीर आणि मन या दोहोंचा विचार करण्यात आला आहे. या ‘पवित्र’ शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असेही ‘एनसीएफ’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘विद्याप्रवेश’ शाळा समजविणार
इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्यांसाठी ‘एनसीईआरटी’ने ‘विद्याप्रवेश’ ही अभिनव संकल्पना तयार केली आहे. ‘विद्याप्रवेश’च्या पहिल्या तीन महिन्यांत चार तास मुलांना शालेय वातावरणात रूळण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच शाळेत वर्तन कसे असावे हे देखील शिकविण्यात येईल. नैतिक मूल्ये, सांस्कृतिक वैविध्य, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाची देखील त्यांना ओळख करून देण्यात येईल. नव्या आराखड्यामध्ये प्रामुख्यानेच याच घटकांवर भर देण्यात आला आहे.
असेही पंचकोश
योगशास्त्रानुसार मानवी शरीरामध्ये पाचकोश आहेत त्यांना ‘पंचकोश’ असे म्हटले जाते.
अन्नमय कोश ः अन्न तथा भोजनापासून निर्मिती
प्राणमय कोश ः प्राणवायूपासून निर्मिती, प्राणायामाच्या माध्यमातून प्राणमय कोश निरोगी ठेवता येतो
मनोमय कोश ः मनापासून निर्मिती, इंद्रियांकडून ग्रहण ज्ञानाद्वारे विचार तयार होतात
विज्ञानमय कोश ः अंतर्ज्ञान तसेच सहजज्ञानापासून निर्मिती
आनंदमय कोश ः आनंदानुभूती पासून निर्मिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.