- सोनल सोनकवडे
वेळापत्रक ठरवून नियोजन झाल्यावर ठरवलेल्या अभ्यासाला सुरुवात करताना अनेक अडचणी येतात. त्यातली एक असते ती म्हणजे अनेकदा वाचायला लागल्यावर मन एकाग्र करता येत नाही. वाचता वाचता काही वेळा दुसरीकडे हरवून जातो. अशावेळी मनावर ताबा पाहिजे.
मन विचलित होता कामा नये. वाचता वाचता आपण कसली तरी स्वप्नं बघू लागतो. काहीतरीच विचार करायला लागतो. अनेकदा अभ्यासाच्या सवयी चांगल्या असल्या तरी लक्ष एकाग्र करता येत नाही. त्यासाठी योग, ध्यानधारणा, नियमित व्यायाम यांचा उपयोग होऊ शकतो.
अभ्यास करताना खूप आवाजाचा त्रास होतो अगदी त्याचप्रमाणे अभ्यासिकेतल्या अगदी शांत वातावरणात, आजूबाजूला बसलेले सगळे अभ्यास करत असताना आपण मन एकाग्र करू शकत नाही. काही वेळा अति अभ्यासाच्या ताणाने असं होतं तर काही वेळा तब्येत ठीक नसल्याने लक्ष लागत नाही. यासाठी अभ्यासाच्या काटेकोर नियोजनाबरोबरच दिवसातला अर्धा तास अभ्यास सोडून काहीतरी केलं पाहिजे. मग ते काहीही असू शकतं.
तुम्हाला ज्यातून आनंद मिळतो आणि मन आणि शरीर ताजंतवानं होतं असं काहीही करा. गाणी ऐकणं, मित्रांबरोबर गप्पा मारणं, गाडी घेऊन फिरायला जाणं, मित्र-मैत्रिणींबरोबर जेवायला जाणं यातलं काही ठरवून करायला हरकत नाही. यातून नव्याने ऊर्जा मिळते, उत्साह वाढतो. आठवड्याला एखादा सिनेमा पाहणं हाही विरामाचा मार्ग असू शकतो. जरासा कंटाळा आला की लगेच यातलं काहीतरी केलं, असं सतत करूनही चालणार नाही.
याबरोबरच इतर अनावश्यक गोष्टी टाळाव्यात. लग्न, वाढदिवस, सण-समारंभ या सगळ्याला उपस्थित राहणं हे शक्यतो कमीत कमी करावं.
मानसशास्त्रामध्ये एक ‘रिवॉर्ड-पनिशमेंट’ अशा सिद्धांत आहे. त्यानुसार मानवी मेंदू बक्षिसाच्या अर्थात रिवॉर्डच्या अपेक्षेने अधिक प्रभावीपणे काम करतो. याचा विचारही नियोजन करताना केला पाहिजे. याचं अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण मेंदूला काही सवयी लावू शकतो. या आठवड्यात ठरल्याप्रमाणे अभ्यास पूर्ण केल्यास रविवारी आवडीची गोष्ट करेन, असं मेंदूला शिकवता येतं.
आपण सहसा अभ्यास करता करता फोनवर काही पाहू लागल्यास मन त्यात गुंतत जातं आणि अभ्यास मागे पडतो. त्याऐवजी आपण फोनवर काही पाहणं हे आपल्या दिवसभराच्या अभ्यासाचं बक्षीस आहे हे आपल्या मेंदूला आणि मनाला शिकवू शकलो तर मग दिवसभर आपण अधिक प्रभावीपणे आणि उत्साहाने अभ्यास करतो.
सिनेमा किंवा वेबसिरीजचा एखादा भाग दिसला की आपण लगेच तो पाहायला सुरुवात करतो. एवढं झाल्यावर अभ्यासाला बसू असं म्हणतो आणि लक्ष एकाग्र करून अभ्यासाला सुरुवात करण्याऐवजी बघता बघता वेब सिरीजच्या एका एपिसोडच्या कालावधीपेक्षा जास्त वेळ जातो. असं आठवड्यात किमान दोन वेळा झालं तरी आपल्या अभ्यासाचं नियोजन कोलमडतं आणि मग तो ठरवलेला अभ्यास त्या आठवड्यात पूर्ण करण्याचा ताण येऊ लागतो.
यासाठी आपण आपल्या मेंदूला आणि मनाला अशी शिस्त लावायची की माझ्या आवडीची गोष्ट करणं हे माझ्यासाठी दिवसाच्या, आठवड्याच्या अभ्यासाचं बक्षीस आहे आणि ठरवलेला अभ्यास पूर्ण केला, तरच मला हे बक्षीस मिळणार आहे. यामुळे अभ्यास करताना आपला उत्साह टिकून राहतो, आपली ऊर्जा टिकून राहते आणि मुख्य म्हणजे मनावर ताबा मिळवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो.
अभ्यासात अडथळा आणणाऱ्या नकारात्मक सवयी किंवा वागणुकीबद्दल स्वत:वरच तत्काळ बंधने घालायला. योग्य पद्धतीने शिस्त लावून घेतल्यास अधिक प्रभावीपणे अभ्यास करू शकता.
(लेखिका ‘आयआरएस’ ऑफिसर, गायिका, गीतकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.