महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पीएसआय भरती प्रक्रियेत अनाथ कोट्यातून लोणावळ्याची सुंदरी एस. बी. हिची निवड झाली आहे.
पुणे - तोंडावर आलेली मैदानी चाचणी...सात महिन्याचे बाळ...सासरच्या माणसांनी दिलेली साथ...आणि मेहनतीच्या जोरावर मिळालेले पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) (PSI) हे पद. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) (MPSC) घेण्यात आलेल्या पीएसआय भरती (PSI Recruitment) प्रक्रियेत अनाथ कोट्यातून (Orphan Quota) लोणावळ्याची सुंदरी एस. बी. (Sundari SB) हिची निवड झाली आहे. राज्य सरकारने अनाथांना जाहीर केलेल्या अनाथ आरक्षणाच्या कोट्यातून निवड झालेली सुंदरी ही राज्यातील पहिली मुलगी ठरली आहे.
मळवली येथील संपर्क बालग्राम संस्थेतील सुंदरी पीएसआय झाल्याने संस्थेने आनंद व्यक्त केला आहे. सुंदरी तीन वर्षाची असताना या संस्थेत दाखल झाली होती. बारावी पास झाल्यानंतर ती या संस्थेतून बाहेर पडली. त्यानंतर पैशांअभावी एका महाविद्यालयात प्रवेश मिळू न शकल्याने स्वतः पैसे कमवून पदवी प्राप्त करण्याचे ध्येय ठेवले. याच संस्थेत अर्धवेळ काम करून शिक्षणासाठी पैसे उभे करून, अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. शिक्षणासोबत कामाचीही गरज होती. त्यामुळे तिने महाविद्यालयातील संगणक प्रयोग शाळेत सहायक पदावर नोकरी स्वीकारली.
विद्या प्रसारिणी सभा या महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करण्यापेक्षा महिलांसाठी समाज कार्य करता यावे म्हणून एमपीएससीतून महिला व बाल विकास अधिकारी होण्याच्या ध्येयाने तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. २०१८ मध्ये पीएसआय पदासाठीच्या परीक्षेसाठी अर्ज केला. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेला खूप मेहनत केली. पती चंद्रकांत जैसवाल यांनी पाठिंबा दिल्यामुळेच मुक्तपणे एमपीएससीचा अभ्यास करता येत आहे, असे सुंदरी सांगते. मुख्य परीक्षेचा पेपर होता, त्यादिवशी मुंबईत खूप पाऊस होता. दादर स्टेशनपासून पुढे सर्व लोकल रेल्वे, बसगाड्या बंद होत्या.
मात्र, विनंतीवरून एका टॅक्सी चालकाने परीक्षा केंद्रावर सोडले. त्या टॅक्सी चालकामुळे पेपर देता आला. मुख्य परीक्षेत २०१९ मध्ये यश मिळाले, मात्र कोरोनामुळे भरती प्रक्रिया लांबली. त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे एमपीएससीने जाहीर केले. यासाठी तीन महिन्याचा वेळ होता. त्यामुळे द्यावी की नाही हा प्रश्न तिच्यापुढे होता. कारण अवघे सात महिन्याचे बाळ होते. चाचणीसाठी मैदानावर सराव महत्त्वाचा होताच. त्यामुळे अखेर तिने घरी बाळाला सोडून पुणे शहरात तीन महिने मैदानी चाचणीचा सराव करण्याचा निर्णय घेतला. तिने केलेल्या संघर्षामुळे पीएसआय पदाच्या गुणवत्ता यादीत तिचे नाव झळकले. काही दिवसातच एमपीएससीकडून अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे, असे सुंदरीने सांगितले.