Dharamsingh and Dr. Ajaysingh
Dharamsingh and Dr. Ajaysingh sakal
Election News

Jevragi Vidhansabha Constituency : घराणेशाहीचे राजकारण : गांधी कुटुंबाचे निष्ठावंत ‘अजातशत्रू’ धरमसिंग

संजय उपाध्ये

कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ राजकारणी आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांना ओळखले जाते.

कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ राजकारणी आणि गांधी कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांना ओळखले जाते. गुलबर्गा जिल्ह्यातील घरच्या जेवरगी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग नऊ वेळा विजय मिळविला होता. आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीत त्यांचे पक्षांतर्गत स्पर्धक, विरोधक, हायकमांड, जनतेशी मैत्रीचे आणि सौहार्दचे संबंध राहिले. त्यामुळे त्यांना ‘अजातशत्रू’ असे ओळखले गेले.

धरमसिंग यांचा जन्म नेलोगी (ता. जेवरगी) येथे २५ डिसेंबर १९३६ ला कर्नाटकात अल्पसंख्याक असलेल्या रजपूत कुटुंबात झाला. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली. २८ मे २००४ ते २८ जानेवारी २००६ पर्यंत ते कर्नाटकाचे अकरावे मुख्यमंत्री बनले. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे १८ वे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. धरमसिंग यांनी गुलबर्गा नगरपालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. स्वतःच्या भावाच्या विरोधात लढून ते नगरसेवक बनले होते. सुरुवातीपासूनच त्यांनी समाजवादी भूमिका घेतली होती. १९६० मध्ये ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. अखेरपर्यंत ते गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत राहिले. त्यातूनच २००४ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा मुकुट त्यांच्या डोक्यावर चढला.

इंदिरा गांधी यांच्या निर्देशानुसार त्यांनी गुलबर्गा लोकसभा मतदारसंघाचा १९८० मध्ये राजीनामा दिला होता. केंद्रात मंत्री असलेले सी. एम. स्टीफन यांच्यासाठी त्यांनी खासदारपदावर पाणी सोडले होते. धरमसिंग हे देवराज अर्स, आर. गुंडू राव, एस. बंगारप्पा, एम. वीराप्पा मोईली आणि एस. एम. कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्री बनले. १९९० मध्ये त्यांच्याकडे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद आले. १९९९ मध्ये मुख्यमंत्रिपद धरमसिंग यांना मिळणार, अशी चर्चा सुरू असताना कृष्णा यांच्या गळ्यात माळ पडली. पण, तरीही कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. पण, एच. डी. देवेगौडांनी दिलेल्या पाठिंब्यावर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे युती सरकार बनल्याने धरमसिंग मुख्यमंत्री बनले. २८ मे २००४ ला त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

वीरेंद्र पाटील यांच्यानंतर गुलबर्गा जिल्ह्यातील दुसरे मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. पण, युती सरकार ३ फेब्रुवारी २००६ ला कोसळले, आणि भाजपच्या पाठिंब्यावर कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले. २००८ मध्ये विधानसभेला भाजपच्या नवख्या दोड्डप्पगौडा पाटील-नरिबोल यांनी धरमसिंग यांचा केवळ ५२ मतांनी पराभव केला. २००९ मध्ये बिदर लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढविताना त्यांनी भाजपचे गुरुपादाप्पा नागमारपळ्ळी यांचा ९२ हजार मतांनी पराभव केला. पण २०१४ ला भाजपच्या भगवंत खुबा यांनी धरमसिंग यांचा एक लाखांनी पराभव केल्यावर त्यांच्या कारकीर्दीची इतिश्री झाली.

डाॅ. अजय धरमसिंग

डाॅ. अजय हे जेवरगी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. तसेच, विधानसभेत विरोधी पक्षाचे उपनेते म्हणूनही त्यांनी १२ मार्च २०२० पासून काम केले आहे. एमबीबीएस असलेले अजय यांनी बंगळुरात अॅक्सिडेंट रिलीफ केअर ही संस्था स्थापन केली. कर्नाटक युवा काँग्रेसचे ते १९९९ ते २००९ पर्यंत सरचिटणीस बनले. त्यानंतर २००५ मध्ये ते काँग्रेसचे सक्रिय सदस्य झाले.

गुलबर्गा दक्षिणचे भाजपचे आमदार चंद्रशेखर पाटील-रेवणूर यांचे निधन झाल्यावर पोटनिवडणूक झाली. पण, घरचे मैदान नसताना अजय यांनी पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. पण, कमी मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. २०१३ च्या निवडणुकीत जेवरगी मतदारसंघातून निवडणुकीत लढताना त्यांनी भाजपचे आमदार दोड्डप्पगौडा पाटील यांचा ३७ हजार मतांनी पराभव केला. हे मताधिक्य गुलबर्गा जिल्ह्यातील आजवरचे सर्वाधिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT