Maharashtra Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver second list 2026
esakal
तात्या लांडगे
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील दोन याद्या प्राप्त झाल्या आहेत. पहिल्या यादीत चार गावांतील २१ शेतकरी होते. दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील १,०७८ गावांमधील सुमारे २६ हजार शेतकरी आहेत. दरम्यान, थकबाकीदार शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड घेऊन गावातील आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. त्याशिवाय लाभार्थ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळणार नाहीत.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना लाभ होईल, असे बँकांचे अधिकारी सांगतात. मात्र, आतापर्यंत २६ हजार शेतकऱ्यांच्याच याद्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आणखी दोन याद्या जाहीर होतील, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. सध्या कर्जमाफीस पात्र सर्व शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जिल्ह्याला पाठविल्या जात आहेत. मात्र, त्यामध्ये प्रचंड चुका असून शेतकऱ्यांची नावे, आडनावे (कादेऐवजी कडे) चुकीची नमूद केल्याचे आढळते. याशिवाय एखादा शेतकरी एका गावातील असून दुसऱ्याच गावाच्या यादीत त्याचे नाव असल्याचेही आढळून आले आहे. सावळेश्वर (ता. मोहोळ) येथील नागनाथ रामचंद्र गावडे यांचे नाव लांबोटी गावाच्या यादीत आहे. अशी अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
आधार प्रमाणीकरण करून घ्यावे
जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या दोन याद्या प्राप्त झाल्या आहेत. गावनिहाय याद्या मिळाल्या असून त्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, बँकेची शाखा आणि तलाठी कार्यालयाबाहेर लावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपले नाव, बँक खाते क्रमांक व रक्कम अचूक असल्याची खात्री करावी. याशिवाय कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात ज्यांची नावे आहेत, त्या शेतकऱ्यांनी गावातील आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.
- मुकुंद पवार, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर
यादीशिवाय शोधता येईल लाभार्थी
१ एप्रिल २०१९ नंतर ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज थकीत राहिले किंवा ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीत असलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र असणार आहेत. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या सहकार विभागाकडून टप्प्याटप्प्याने बँकांना पाठविल्या जात आहेत. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार या याद्या गावागावांत प्रसिद्ध करून त्यांचे फोटो मागविले जात आहेत. शेतकऱ्यांनी त्या यादीतील आपले नाव, बँक खाते क्रमांक व रक्कम तपासून घ्यायची आहे. यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे नाहीत, पण ते कर्जमाफीस पात्र आहेत, असे शेतकरी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त स्वतःचा आधार क्रमांक देऊनही आपण लाभार्थी असल्याची खात्री करू शकणार आहेत.
सोलापूर जिल्ह्याची स्थिती
कर्जदारांची यादी अपलोड
५९,८५१
पात्र शेतकरी
२६,२५३
‘ई-केवायसी’ पूर्ण केलेले
३,२६२
‘ई-केवायसी’ प्रलंबित
२२,९९१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.