Vidhan sabha Election 2024 esakal
Maharashtra Election 2024 Result

Assembly Election 2024 : आरक्षण नष्ट करण्याचा नवा डाव

Vidhan sabha Election 2024 : हीच काँग्रेस आता अनुसूचित जाती, जमाती, ओबीसींमध्ये भांडणे लावून आरक्षण नष्ट करण्याचा नवा डाव खेळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘काँग्रेसने जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला लागू होऊ दिले नाही. हीच काँग्रेस आता अनुसूचित जाती, जमाती, ओबीसींमध्ये भांडणे लावून आरक्षण नष्ट करण्याचा नवा डाव खेळत आहे.

परकीय गुलामीच्या मानसिकतेच्या काँग्रेसने कायमच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा द्वेष आणि अपमान केला. कर्नाटकात जनतेचा लुटलेला पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीत वापरला जात आहे. त्यामुळे काँग्रेससारख्या आपत्तीला महाराष्ट्रापासून दूर ठेवा,’’ असा घणाघात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मंगळवारी टीकेची झोड उठवली.

पुणे आणि सातारा जिल्ह्यातील विधानसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, उदयनराजे भोसले, डॉ. मेधा कुलकर्णी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ‘‘काँग्रेसने कर्नाटकात खोटे आश्वासनाचे टेप रेकॉर्डर वाजवून मतदान घेतले. पण आता या आश्‍वासनाची पूर्तता करता आली नाही. उलट येथील जनतेची लूट सुरु केली आहे. हाच पैसा महाराष्ट्रात पाठवला जात आहे. महाराष्ट्राला वाचविण्यासाठी काँग्रेससारख्या आपत्तीला सत्तेपासून दूर ठेवण्याची जबाबदारी पुणे आणि महाराष्ट्रावर आहे.’’

हेही वाचा

काँग्रेसने जम्मू-कश्मिराच्या विधानसभेत काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचे विधायक मंजूर केलेले आहे. हे लोक संविधानाचे पुस्तक देशभर दाखवत आहेत आणि महाराष्ट्रात कोऱ्या कागदांचे पुस्तक वाटले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसमुळे वेगळे विधान, प्रधान, निशान होते. पण मला काम करण्याची संधी दिल्यानंतर तेथे संविधान लागू झाले. दिवाळीमध्ये नागरिकांनी लाल चौकात दीपोत्सव साजरा केला.

पण काँग्रेस आणि त्यांचे चट्टेबट्टे साथीदार पुन्हा एकदा कलम ३७० लागू करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी नागरिकांनी काँग्रेसला दिवा दाखविण्याची गरज आहे, असे मोदी यांनी भाषणात सांगत उपस्थित नागरिकांना त्यांची मोबाईलचे दिवे सुरू करण्यास सांगून काँग्रेसला ३७० कलम हटणार नाही, हे स्पष्टपणे सांगितले. यावेळी सभेत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देण्यात आल्या.

मध्यमवर्गीयांना दिलासा दिला
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना त्यामध्ये मध्यमवर्गीय महत्त्वाचा भाग आहे. साडेसात लाखापर्यंतच प्राप्तिकर माफ करून मध्यमवर्गीयांना दिलासा दिला. ह्रदयरोगासह अन्य गंभीर आजारांच्या उपचारांचे दर कमी केल्याने सुमारे ८५ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

‘आयुष्यमान भारत’ योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा फायदा झाला आहे. त्यांच्या आरोग्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी माझी आहे. मी गॅरंटी पूर्ण केली. गेल्या १० वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश क्षमता एक लाखाने वाढविल्याने परदेशात जाऊन महागडे शिक्षण घेण्याची गरज नाही. आगामी काळात आणखी ७५ हजार जागा वाढविल्या जाणार आहेत.

काँग्रेसने महाराष्ट्राचा अपमान केला
पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या स्मारकाचे काम आम्ही सुरु केले आहे. तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ, संत संताजी जगनाडे महाराज समाधीस्थळ विकसित केले जात आहे. आंबेगावमधील शिवसृष्टीच्या कामाला गती दिली. क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे संग्रहालयाचे काम सुरु केले. हे काँग्रेसने यापूर्वीच करणे आवश्‍यक होते, असे मोदी यांनी नमूद केले.

दम असले तर सावरकर, ठाकरेंचे कौतुक करा
काँग्रेससारखा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिव्या देतो, बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करताना त्यांच्या तोंडाला कुलूप लागलेले असते. काँग्रेसच्या युवराजांमध्ये दम असले तर त्यांनी वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करणारे भाषण करून दाखवावे, असे आव्हान मोदी यांनी राहुल गांधी यांना दिले.

‘एक रहेंगे, तो सेफ रहेंगे’
काँग्रेसकडे नियत, नीती आणि नैतिकता नाही. त्यांना फक्त सत्ता पाहिजे, सत्तेसाठी काँग्रेसने देशाचे विभाजन केले, लांगुलचालन करण्याचा खतरनाक खेळ खेळला आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींमधील वेगवेगळ्या जातींमध्ये फूट पाडून, एकजूट संपविण्याचा प्रयत्न सुरु आहे. जातीजातींमध्ये भांडण लावून त्यांना कमकुवत करणे आणि त्यांचे आरक्षण काढून घेण्याचा डाव आहे. त्यामुळे ‘एक रहेंगे, तो सेफ रहेंगे’ हे लक्षात ठेवा, असे आवाहन मोदी यांनी केले.

शरद पवार यांच्यावर टीका टाळली
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ३७ मिनिटांच्या भाषणात अनेक मुद्दे उपस्थित केले. काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण पुण्यात सभा असताना देखील मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख तर केलाच नाही. पण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका करण्याचे टाळले. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली नाही.

हे होते उपस्थित
या सभेला उमेदवार दिलीप वळसे पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, राहुल कुल, शंकर जगताप, चेतन तुपे, सुनील टिंगरे, शंकर मांडेकर, विजय शिवतारे तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, रिपाईचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, तसेच गणेश बिडकर, बापू मानकर, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. घाटे यांनी प्रास्ताविक केले तर गायत्री खडके यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT