सुदृढ, बांधेसूद, लवचिक शरीर, धडाडीने काम करण्याची शक्ती ही शारीरिक निरामयता; दुसऱ्याची बाजू समजून घेणे, समोरच्यावर रागावण्याने काम बिघडते हे समजून घेणे.
सुदृढ, बांधेसूद, लवचिक शरीर, धडाडीने काम करण्याची शक्ती ही शारीरिक निरामयता; दुसऱ्याची बाजू समजून घेणे, समोरच्यावर रागावण्याने काम बिघडते हे समजून घेणे, ईर्ष्या व द्वेष करण्यामुळे स्वतःची प्रगती थांबेल हे लक्षात घेणे ही मानसिक निरामयता. चार-चौघांबरोबर जमवून घेऊन टीमवर्क करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे, हे समजून वागणे आवश्यक आहे.
‘सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्र्चित् दुःखमाप्नुयात्।।’
भारतीय संस्कृतीची थोरवी आणि उदात्तता दर्शवणारी ही प्रार्थना. सर्वांनी सुखी व्हावे असे म्हटल्याबरोबर त्या सुखाचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे शरीर निरामय असावे हे लगेचच म्हणावे लागते, तसेच कोणालाही दुःख मिळू नये असे म्हणण्यापूर्वी सर्वांचे कल्याण आणि सर्व ठिकाणी चांगले पाहण्याचा संकल्प करणे हेसुद्धा स्वाभाविकपणे येते. जीवनाची सर्व सुखे उपभोगण्यासाठी शरीर लागते आणि ते निरोगी असावे लागते. समाधान हा भाव मानसिक असला तरी मनालासुद्धा शरीरस्वास्थ्यावर अवलंबून राहावे लागते. नुसते खाणे-पिणे, योग, व्यायाम एवढ्यावरच शरीर निरामय व सुदृढ ठेवता येत नाही. मनात एकदा का क्रोध, द्वेष, हट्टीपणा वगैरेंनी घर केले की सर्व आरोग्य बिघडून जाते. मानसिक ताण हे तर आमाच्या संचयाचे एक महत्त्वाचे कारण आहे. सदाचार, सद्वृत्ती, सामाजिक स्वास्थ्य, ध्यान, ईशचिंतन ह्या गोष्टीही निरामयतेसाठी आणि चांगल्या शरीर व व्यक्तिमत्त्वासाठी अत्यंत आवश्यक होत. आयुर्वेद हा आरोग्याचा एकमेव गुरू! आयुर्वेदरूपी गुरूने सांगितलेले मंत्र अनुसरले तर संपूर्ण आरोग्यप्राप्ती होऊ शकेल.
आयुर्वेदातील आरोग्यमंत्राचा पहिला चरण म्हणजे निसर्गचक्राशी संतुलन ठेवण्यासाठी ठरविलेले राहणीमान, वात-पित्त-कफ या संकल्पनेला अनुसरून, सप्तधातुवर्धनाला महत्त्व देऊन, जाठराग्नीचा विचार करून, आहार-आचरणाचे नियोजन.
दुसरा चरण म्हणजे, दैनंदिन जीवनव्यापारामुळे उत्पन्न झालेली आमद्रव्ये, विषद्रव्ये आणि विकृती शरीराबाहेर टाकण्यावर नेहमी लक्ष ठेवणे, तसेच पंचकर्म चिकित्सेतील विरेचन, वमन, बस्ती ह्या विशेष प्रक्रियांद्वारे शरीर शुद्ध ठेवून ताजेतवाने ठेवणे.
तिसरा चरण म्हणजे, शरीरास प्राणशक्तीची असलेली गरज योग्य अन्न, रसायन, औषधे यापासून मिळवणे, जमेल तेवढे अमृतसेवन करणे आणि वाईट व विषारी वस्तूंचे सेवन टाळणे.
चौथा महत्त्वाचा चरण म्हणजे मनात येणारे विचार दाबून न ठेवता व्यक्त करणे, भौतिक मर्यादेपलिकडे असणाऱ्या शक्तीशी संबंध प्रस्थापित करणे, त्यासाठी योग, प्राणायाम, नाद व स्वास्थ्यसंगीत यांचा कटाक्षाने उपयोग करून घेणे. त्याचबरोबर मनःस्वास्थ्य ठीक राहण्यास सर्वाधिक महत्त्व देणे.
पाचवा चरण म्हणजे प्रकृतीकडे लक्ष ठेवून आजाराकडे दुर्लक्ष न करणे, योग्य निदान व मोजमाप करून रोगाला बरी करणारी औषधयोजना किंवा उपचारपद्धत अंगीकारणे.
आरोग्याच्या नव्या व्याख्येप्रमाणे शरीर व मनाबरोबरच सामाजिक आरोग्य आणि आत्मिक (आध्यात्मिक) आरोग्य ही कल्पना जागतिक आरोग्य संघटनेने स्वीकारलेली आहे. रुबाबदार व्यक्तिमत्व व सुदृढ शरीर असलेला मनुष्य जर माणूसघाणा असला किंवा विकृत मनोवृत्तीचा असला तर त्याला महत्त्व राहणार नाही. सुदृढ, बांधेसूद, लवचिक शरीर, धडाडीने काम करण्याची शक्ती ही शारीरिक निरामयता; दुसऱ्याची बाजू समजून घेणे, समोरच्यावर रागावण्याने काम बिघडते हे समजून घेणे, ईर्ष्या व द्वेष करण्यामुळे स्वतःची प्रगती थांबेल हे लक्षात घेणे ही मानसिक निरामयता. चार-चौघांबरोबर जमवून घेऊन टीमवर्क करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे समजून वागणे आवश्यक आहे. समाजाने आपल्याला बरेच दिले आहे तेव्हा सामाजिक नियमांचे बंधन स्वीकारून समाजालाही काहीतरी देणे ही सामाजिक निरामयता आणि शरीर हे जरी नश्र्वर असले तरी सत्कृती मागे उरणार हे ध्यानी घेऊन काहीतरी कार्य करणे, सर्वाभूती आत्मभाव पाहून प्रेम वाढवणे, चांगल्या कार्यासाठी अदृश्य शक्ती कायमच मदत करत असते हे समजून घेऊन त्या शक्तिप्रती कृतज्ञ राहणे आणि स्वतःमधील व अशा परमशक्तीवरील विश्र्वास वाढवणे ही आध्यात्मिक निरामयता.
आयुर्वेदाची ही जीवनशैली आरोग्य, समाधान, मनःशांती या सर्व गोष्टी देऊ शकते. नववर्षाच्या स्वागतामधला एक अपरिहार्य भाग म्हणजे ‘संकल्प’. येणाऱ्या वर्षात काहीतरी वेगळे, काहीतरी चांगले करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. वर्षाच्या सुरवातीला आपणही ‘सर्वे सन्तु निरामयाः’ हा संकल्प करू या आणि आयुर्वेदाच्या, इतर भारतीय शास्त्रांच्या मदतीने आरोग्याकडे पाऊल टाकू या. फॅमिली डॉक्टर व सकाळच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या विपुल लेखनातून संकलित.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.