Food sakal
फॅमिली डॉक्टर

बकासुरी आहार

अन्नामुळे मनुष्य जगतो असा समज झाल्याने माणसांची खूप खायची प्रवृत्ती असते. माया, ममता भौतिकत्वाशी संबंधित असल्यामुळे यांचा संबंध शरीराशी अधिक असतो.

सकाळ वृत्तसेवा

महाभारतातील भीम व बकासुराची गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती असते. गावाच्या बाहेर हा राक्षस राहत असे व त्याला रोज गाडाभर अन्न पोचवावे लागे. अन्न गाडीत भरून नेणाऱ्या माणसासकट तो सर्व अन्न फस्त करत असे. गावातल्या लोकांना खूप भीती व चिंता वाटत असे पण त्यांचा काही इलाज नव्हता, बकासुराची रोज एका माणसासकट गाडाभर अन्नाची मेजवानी सुरूच होती. शेवटी भीमाने युक्ती करून त्याचा वध केला.

ताकद खाण्याच्या प्रमाणावर अवलंबून नसते. रोज दहा पोळ्या खाणारी मुलेही किडकिडीत, कमी रक्त असलेली, अशक्त असू शकतात आणि दोन पोळ्या खाणारी मुले ताकदवान असू शकतात. खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होऊन, व्यवस्थित व्यायाम, योग वगैरे करून शरीरात तयार होणाऱ्या धातूंना आकार व शक्ती साठवण्यासाठी शिक्षण दिले नाही तर किती अन्न खाल्ले याला काही महत्त्व नाही.

अन्नामुळे मनुष्य जगतो असा समज झाल्याने माणसांची खूप खायची प्रवृत्ती असते. माया, ममता भौतिकत्वाशी संबंधित असल्यामुळे यांचा संबंध शरीराशी अधिक असतो. प्रेम, माया वा ममता सिद्ध करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे शारीरिक जवळीक साधणे किंवा चांगले गोड-धोड पदार्थ करून खाऊ घालणे असा समज असतो.

‘तुम्ही खा’ म्हणजेच तुमच्यावर माझे असलेले प्रेम जणू सिद्ध होईल असा प्रयत्न चाललेला दिसतो. त्यामुळे आई तिच्या मुलांना किंवा पत्नी तिच्या पतीला अधिकाधिक खायला घालू इच्छिते. चार मित्र-मैत्रिणी मजा करायला एकत्र जमले तरी ‘चला, मी आज तुम्हाला हॉटेलमध्ये नेतो’ असे संवाद हमखास ऐकू येतात.

एखाद्या विषयी जास्त प्रेम दाखवायचे असले तर आग्रहाला सुरुवात होते. लग्न समारंभात वगैरे तर लाडू भरवण्यापर्यंत मजल जाते. किती जिलब्या खाल्ल्या, किती लाडू खाल्ले याची स्पर्धा सुरू होते व त्यावर पैजा लावणेही सुरू होते.

खाण्यामुळे शक्ती मिळते अशा समजातून अति खाण्याचे बकासुरी प्रयोग सुरू होतात. जेवण पूर्ण झाल्यावर ‘ताट भरून जिलब्या खाल्ल्यास हे जिलब्या भरलेले चांदीचे ताट तुमचेच’ अशा आग्रह केला जातो. अशा पैजा जिंकण्याच्या मोहापायी माणसे दगावण्याचीही उदाहरणे कानावर येतात. मी कोणी तरी मोठा, मी कोणीतरी वेगळा हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात निर्माण होणाऱ्या स्पर्धेमुळे माणसे अनेकदा अति खातात, पितात. दुसरे म्हणजे मायेची माणसे काळजी घेण्याच्या निमित्ताने आग्रह करून खाऊ घालतात.

एकदा अशाच आग्रहातून मला एका जवळच्या नात्यातल्या बार्इंनी म्हटले, ‘तुम्ही येणार म्हणून मी आज तुमच्यासाठी खास श्रीखंड बनवले आहे, तुम्ही कमीत कमी २-४ वाट्या श्रीखंड तरी खाल्ले पाहिजे.’ मी म्हटले, ‘आज तर मी एक चमचाभरही श्रीखंड खाऊ शकणार नाही, आज माझी प्रकृती श्रीखंडाला अनुकूल नाही.’’ यावर त्या बाई खूप रागावल्या आणि म्हणायला लागल्या, ‘मी एवढे प्रेमाने व आपुलकीने केले, पण तुमचे मुळी माझ्यावर प्रेमच नाही.

तुमच्या अशा वागण्याने मला किती वाईट वाटेल याचा विचार का करत नाही?’ मी म्हटले, ‘मी श्रीखंड खाल्ले, तर तुम्हाला बरे वाटेल, पण तब्येत बिघडल्यामुळे मला वाईट वाटेल, त्याचे काय? आणि मी जर श्रीखंड खाल्ले नाही तर मला बरे वाटेल, पण तुम्हाला वाईट वाटेल. कुणाला तरी एकाला वाईट वाटणार असेल तर तुम्हाला वाईट वाटलेले अधिक ठीक.’

पहिलवान, शरीर घडवणारे बॉडी बिल्डर्स वगैरेंना शरीर कमवायला काही विशेष गोष्टी सेवन कराव्या लागतात, पण मेहनत करून ते सर्व अन्न पचवावे लागते व त्यापासून तयार झालेल्या शरीरधातूंना वळण देऊन प्राण व रक्ताचा पुरवठा चालू ठेवण्याची जबाबदारी त्या व्यक्तीवर येते. व्यायाम सोडल्याने वजन वाढण्याची तक्रार अनेक लोक करतात. पण व्यायाम करत असतानाचा आहार व्यायाम सोडल्यावर सुद्धा चालू ठेवल्याने वजन वाढते, व्यायाम सोडल्याने नव्हे.

आयुर्वेदाने ‘बकासुरी आहारा’च्या अगदी विरुद्ध आहार घ्यायला सांगितला आहे.

कुक्षेर्भागद्वयं भोज्यैस्तृतीये वारि पूरयेद्‌ ।वायोः संचरणार्थाय चतुर्थमवशेषयेत्‌ ॥...योगरत्नाकर

पोटाचे चार भाग कल्पून त्यातील दोन भाग घनपदार्थांनी म्हणजे पोळी, भाजी, भात वगैरेंनी भरावेत, एक भाग द्रव पदार्थाने म्हणजे पाणी, आमटी, ताक वगैरेंनी भरावा व शेवटचा एक भाग वायूच्या संचरणासाठी, पचनासाठी आवश्‍यक त्या हालचाली व्यवस्थित होण्यासाठी रिकामा ठेवावा.

अर्थातच ‘आता एक घास खायलाही जागा नाही’, ‘पाण्याचा घोटही घेववणार नाही’, या उद्‍गारांना आयुर्वेदिक जीवनशैलीत स्थान नाही; ‘बकासुरी आहार’ तर खूपच दूर राहिला.

प्रत्येकाला जगातील सर्व पदार्थ पचत नाहीत. सर्व पदार्थ सर्वांच्या प्रकृतीला अनुकूल नसतात. वात-पित्त-कफाच्या कल्पनांनुसार अन्न सेवन करावे लागते. वेगवेगळ्या कामासाठी लागणारे वेगवेगळे धातू बनणेही महत्त्वाचे असते, याचा विचार करून आपल्या प्रकृतीला पचेल एवढेच खाल्ले तरच रोग येणार नाहीत आयुष्य सुखात जगता येईल.

लग्नकार्यासारख्या प्रसंगातील उपस्थितीमुळे तर अनेकांची तब्येत हमखास बिघडते. आग्रहापायी व वेळी अवेळी रोजच्या आहारापेक्षा दुप्पट, तिप्पट खाणे, शरीराला ज्या पदार्थांची सवय नाही असे पदार्थ खाणे, जेवणाच्या मेन्यूत अनेकविध पदार्थ असल्यानेसुद्धा जास्त खाल्ले जाऊ शकते व तो ‘बकासुरी आहार’च होतो.

कॉन्टिनेंटल स्टॉल, गुजराथी थाळी, जैन थाळी, चायनीज स्पेशालिटी, ८-१० प्रकारचे स्टार्टर्स, पाणीपुरी, पिझ्झा, शेव पुरी असा जंगी मेन्यू असल्यावर प्रत्येक ठिकाणचे थोडे थोडे चाखल्यासही पोटाला तडस लागून त्रास होणे अपरिहार्य असते. किंबहुना अशा जेवणानंतर माणसे आजारीही पडतात. किती व काय खावे याचे जर ज्ञान करून घेतले तर माणसे आजारी पडणार नाहीत.

खरे पाहता एखादा मनुष्य किती खातो यापेक्षा किती पचवतो यालाच अधिक महत्त्व असते. कमी खाणाऱ्या माणसाची शक्ती जास्ती असू शकते. किंबहुना भौतिक शक्ती व स्नायूंची ताकदीच्या पुढची मानसिक शक्ती व त्याही पुढची आत्मिक शक्ती असणारी बुद्धासारखी मंडळी तर जवळ जवळ काहीच खात नाहीत. ही मानसिक व आत्मिक शक्ती पुढे सरस ठरू शकते. शारीरिक शक्ती तर आत्मिक शक्तीपुढे टिकाव धरू शकत नाही.

तेव्हा मिताहार, तोही नियमित व स्वतःच्या प्रकृतीला मानवणारा असावा, आपण घेत असलेल्या आहारामुळे सप्तधातुवर्धन होते आहे इकडे लक्ष ठेवणे हीच निरामय आयुष्याची व आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT