- डॉ. मालविका तांबे
आई-वडील बाळाकरता, मुलांकरता सगळ्यात महत्त्वाचे असतात. आपण कोणाच्या पोटी जन्म घेतो आहे, यावर संपूर्ण भावी आयुष्य अवलंबून असते. आई-वडिलांचीही इच्छा असते की, आपल्या मुलांच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा गरजा त्यांना पूर्ण करता याव्या.
एवढेच नव्हे, तर आजच्या जमान्यात तर मुलाला जन्म देण्याचा विचार करण्याआधीच त्याला कुठल्या शाळेत घालावे, ती शाळा आपल्याला परवडेल की नाही या सगळ्यांचा विचार करून घर कुठे घ्यावे हेही पालक ठरवायला लागलेले आहेत.
मला वाटते की गर्भाला पोटातून संवाद साधता आला असता तर त्याने सांगितले असते, ‘आई मला घर नसले तरी चालेल, मला कोणतीही शाळा चालेल पण एकच काळजी घे, मला डायबेटिस नको.’
आयुर्वेद व आधुनिक शास्त्र या दोन्हींच्या मताने आपल्या शारीरिक स्वास्थ्याचा पाया गर्भारपणातच नक्की होत असतो. सध्या बदलत्या राहणीमानामुळे, आधुनिक परिस्थितीमुळे आजार असण्याची शक्यता वाढत चाललेली आहे, त्यात मधुमेह हा जास्त प्रमाणात आढळतो.
जेस्टेशनल डायबेटिस म्हणजे पोटात गर्भ असताना सहाव्या-सातव्या महिन्याच्या सुमाराला रक्तशर्करा अधिक प्रमाणात असणे. कधी कधी गर्भ राहिल्या राहिल्या काही स्त्रियांमध्ये साखर वाढलेली दिसते. काही स्त्रियांमध्ये आधीच मधुमेह असतो व त्यानंतर गर्भधारणा होते.
या दोन्ही प्रकारांत जन्माला आलेल्या बालकांमध्ये वेगवेगळे विकार कमी वयातच आढळू शकतात. सर्व जगभर जेस्टेशनल डायबेटिस वाढत आहे. भारतात लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे तसेच मधुमेहाचे प्रमाणही जास्त आहे त्यामुळे आपल्याकडे मधुमेह असणाऱ्या मुलांचे प्रमाण जास्त आहे.
जेस्टेशनल डायबेटिसचा आयुर्वेदात उल्लेख नाही, परंतु आयुर्वेदात मधुमेहासंबंधित सविस्तर मार्गदर्शन आढळते. तसेच गर्भधारणा झाल्यावर दिसणारे वेगवेगळे त्रास जेस्टेशनल डायबेटिसच्या बालकाला दिसून येतात.
उदा. बाळाचा आकार फार मोठा असणे. हा आजार बदलत्या जीवनशैलीमुळे होतो, त्यामुळे जीवनशैलीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. जीवनशैलीसंबंधित मार्गदर्शन जेवढ्या सविस्तरपणे आयुर्वेदात सापडते तेवढे कुठेच सापडत नाही. आहार, विहार, दिनचर्या, दुष्परिणाम नसलेली औषधे, योग, ध्यान वगैरे केवळ आयुर्वेदात सापडतात.
गर्भधारणा होणाऱ्या स्त्रीचे वय ३५ पेक्षा अधिक असणे.
गर्भधारणा होण्यापूर्वी वजन जास्त असणे.
गर्भधारणा होत असताना कुठल्यातरी प्रकारचे हॉर्मोनल असंतुलन असणे अर्थात अग्निदोष असणे. हे असंतुलन पीसीओस्, थायरॉइडच्या स्वरूपात असू शकते.
घराण्यात मधुमेहाचा इतिहास असणे.
बैठे काम जास्त असणे.
या सर्व कारणांमुळे जेस्टेशनल डायबेटिस होतो.
अशा प्रकारचा त्रास होऊ नये अशी इच्छा असल्यास त्रास झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा मुळात त्रास होऊ नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यक आहे असे आयुर्वेदाचे मत आहे. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे नेहमी म्हणत असत की,
होणाऱ्या बाळाच्या शारीरिक स्वास्थ्याकरता कार्य गर्भधारणेपूर्वीच होऊ शकते. यासाठी आयुर्वेदात सांगितलेली सर्वांत महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे शरीराची शुद्धी करून घेणे. गर्भसंस्कारांचे पालन करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक दांपत्याला आत्मसंतुलनमध्ये सर्वप्रथम शास्त्रोक्त पद्धतीने संतुलन पंचकर्म करवून घेण्यास सुचवले जाते.
संतुलन आयुर्वेद फर्टिलिटी एक्स्पिरिअन्समध्ये (SAFE) तर बऱ्याच दांपत्यांचा अनुभव असा आहे की पहिल्या गरोदरपणात गर्भवतीला मधुमेह झाला असला तरी नंतरच्या गरोदरपणात आयुर्वेदाचे मार्गदर्शन घेऊन गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यास असा त्रास झाला नाही.
शरीराचे शोधन झाल्यानंतर दांपत्यासाठी आहार व वेगवेगळ्या प्रकारची रसायने आयुर्वेदात सुचवलेली आहेत. तसेच गर्भधारणा झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या सूचना दिलेल्या सापडतात, जेणेकरून गर्भवती स्वस्थ राहायला मदत मिळते तसेच जन्माला येणाऱ्या बालकाचे स्वास्थ्य व त्याची शक्ती उत्तम असते. आत्तापर्यंत लाखो लोकांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार व SAFE या दोन्ही उपक्रमांतून फायदा मिळविलेला आहे.
आहाराचा यात खूप मोठा हातभार लागतो. गर्भवतीच्या आहाराचे पालन आयुर्वेदात सुचवल्यानुसार केले गेले तर अशा प्रकारचे त्रास सहसा होत नाहीत असा अनुभव आहे, परंतु मधुमेह असल्याचे आढळले तर मात्र आहारात बरेच बदल करावे लागू शकतात.
हे बदल गर्भवतीच्या आहारात असलेल्या बाकीच्या गोष्टींच्या बरोबरीने करावे, आहाराच्या वेळा पाळाव्या. मूड होईल तेव्हा खाणे किंवा अधून-मधून सारखे काही तरी तोंडात टाकत राहणे हे पचनाच्या दृष्टीने अत्यंत अयोग्य असते. पाहुणे आले तरी आपल्या आहाराच्या वेळा गर्भवतीने बदलू नये. तसेच रात्रीचे भोजन फार उशिरा करू नये.
आहारात मूग डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ यांचा समावेश नक्की असावा, त्याचबरोबरीने गहू, जव, षष्ठीशाली तांदूळ, बाजरी, ओट््स यांचा आहारात समावेश असावा. ही धान्ये भाजून घेतली तर अधिक सुपाच्य होतात.
भाज्यांमध्ये पालक, टोमॅटो, ब्रोकोली, पडवळ, परवर, दोडके, काकडी, मुळा, मेथी, कारले, शेवगा यांचा समावेश नक्की असावा. यातील बऱ्याच भाज्या मूत्रल असल्यामुळे मधुमेह कमी व्हायला मदत मिळते.
ऋतूनुसार उपलब्ध असणारी ताजी फळे घ्यावी, परंतु यांचाही अतिरेक नसावा. त्यातल्या त्यात संत्रे, सफरचंद, पेअर, आवळा, डाळिंब वगैरेसारखी फळे खाण्यात ठेवलेली बरी. सुक्या मेव्यातील बदाम, आक्रोड वरचेवर खाण्यात ठेवावेत.
या काळात मसाल्यांना खूप महत्त्व असते. योग्य मसाले खाल्ल्यास पचनाला मदत होते. हळद गर्भवतीने नक्की खावी, परंतु जेस्टेशनल डायबेटिस झाला असेल किंवा होण्याची शक्यता असेल तर नक्कीच चांगल्या प्रतीची हळद खाण्यात ठेवावी.
हळदीने संस्कारित केलेले दूध प्यायल्यास फायदा मिळू शकेल. दालचिनी, मेथी दाण्याचा मसाल्यांत समावेश असावा. तुळस खरे तर औषधी असते, मात्र ती घराघरांत असल्याने तिचा आपण आहारात समावेश करू शकतो. सकाळच्या वेळी साधारण एक अष्टमांश चमचा तुळशीचा स्वरस घेणे उत्तम. हे शक्य नसल्यास गर्भवतीचा चहा करताना त्याच तुळशीची चार पाने घालावी. ताजे आवळे मिळत असल्यास मीठ लावून खावा, तसेच संतुलनचा डायबेटिक च्यवनप्राश रोज घ्यावा.
योगासने करणे जेस्टेशनल डायबेटिससाठी अत्यंत फायदेशीर असते. यामुळे शरीर-मनाचा ताण कमी व्हायला मदत मिळते व त्यामुळे ताणातून जेस्टेशनल डायबेटिसचा होणारा त्रास कमी व्हायला मदत मिळते.
‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकात आपण व्यायामांबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. चालणे अत्यंत महत्त्वाचे असते, तसेच अर्धमार्जारासन, कोणासन, वज्रासन, फुलपाखरू, सूर्यनमस्कार वगैरे आसने आपापल्या गर्भधारणेच्या महिन्यानुसार नक्की करावी.
घराण्यात मधुमेहाचा इतिहास असला किंवा आधीच्या गरोदरपणात मधुमेहाचा त्रास झालेला असला तर अशा प्रकारच्या योगासनांचा अभ्यास गर्भधारणा होण्यापूर्वी कमीत कमी तीन महिने नक्की सुरू करावा.
प्राणायामामुळे आपल्या शरीरातील सर्व चयापचय क्रियांवर सकारात्मक प्रभाव पडतो, रक्तदाब तसेच हृदयाची गती कमी व्हायला मदत मिळते, पचनसंस्थेचे कार्य व्यवस्थित चालते. मधुमेह म्हणजे शरारीला कार्बोहायड्रेट न पचवता येणे.
कार्बोहायड्रेट आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. कार्बोहायड्रेट पचवता आले नाहीत तर बऱ्याच गोष्टी खाणे बंद करावे लागते. त्यामुळे गर्भधारणेपूर्वीच प्राणायाम करणे सुरू करावे व संपूर्ण गर्भारपणात अनुलोम-विलोम व शक्य झाल्यास भ्रामरी प्राणायाम नक्की करावा. यामुळे मन शांत राहायलाही मदत मिळते.
आयुर्वेदाच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुडूची, हरीतकी, बिल्व, मेथी, जांभूळ, तुळस, भुईआवळा वगैरे वापरून तयार केलेला एखादा योगही घ्यावा.
‘तुम्ही गर्भवतीला दूध, पंचामृत, शतावरी कल्प, धात्री रसायन वगैरे योग घ्यायला सांगता, पण ही सर्व गोड असतात. हे योग गर्भवतीने सुरुवातीपासून घेतल्यामुळे जेस्टेशनल डायबेटिस होण्याची शक्यता नसते का’ असा प्रश्न विचारला जातो.
तथापि आयुर्वेदात स्त्रीसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थ, जी मधुर रसप्रधान असतात, नक्की घ्यायला सांगितलेले आहे. एवढेच नव्हे तर गर्भवतीने महिन्यांनुसार लोणी, तूप, खीर, खिचडी वगैरे घेणे गर्भाच्या आरोग्यासाठी उत्तम सांगितलेले आहे.
याप्रकारे दूध-तूप-हिरव्या पालेभाज्या-फळे यांनी युक्त व्यवस्थित आहार गर्भाधारणेपूर्वी व गर्भारपणात घेतला तर जेस्टेशनल डायबेटिस होण्याची शक्यता खूप कमी होते. डायबेटिस असल्याचे निदान झाले तर मात्र वैद्यांच्या सल्ल्यानुसार आहारात फरक करणे आवश्यक ठरते.
आईच्या रक्त्तात साखर जास्त प्रमाणात असली तर आईला स्वतःला त्रास होऊ शकतो, त्याचबरोबरीने बाळालासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होताना दिसतात, जन्म झाल्यानंतर श्र्वास घ्यायला अडथळा येऊ शकतो,
रक्तातील साखरेचे नियंत्रण होऊ शकत नाही, मूल थोडे मोठे झाल्यावर स्थूलता किंवा मधुमेह होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असताना दिसते. तेव्हा एकूणच या आजाराबद्दल समाजात जागरूकता आणणे गरजेचे आहे त्यासाठी आयुर्वेदाची मदत कशी घेता येऊ शकेल हे पाहायला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.