dink ladoo and awala sakal
फॅमिली डॉक्टर

रसायनसेवनासाठी सर्वोत्तम काळ : हिवाळा

हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू असतो. शरीरशक्ती, अग्नीची शक्ती, पचनक्षमता या सगळ्याच गोष्टी थंडीच्या दिवसात सुधारलेल्या असतात.

सकाळ वृत्तसेवा

हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू असतो. शरीरशक्ती, अग्नीची शक्ती, पचनक्षमता या सगळ्याच गोष्टी थंडीच्या दिवसात सुधारलेल्या असतात.

- डॉ. भाग्यश्री झोपे

हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू असतो. शरीरशक्ती, अग्नीची शक्ती, पचनक्षमता या सगळ्याच गोष्टी थंडीच्या दिवसात सुधारलेल्या असतात आणि म्हणूनच हिवाळ्याचा आरोग्यासाठी, शक्ती कमावण्यासाठी उपयोग करून घेणे रास्त असते. इतर सर्व ऋतूंप्रमाणे हिवाळ्यातही निसर्ग यासाठी आपल्याला अनेक गोष्टी भरभरून देत असतो. बाजारात भाज्या, फळांची रेलचेल असते. आवळ्यासारखे रसायन गुणात सर्वश्रेष्ठ फळ हिवाळ्यातच उपलब्ध असते. ओली हळद, आंबेहळद, ज्वारीचा हुरडा अशा अनेक स्वास्थ्यकारक गोष्टी फक्त याच काळात मिळतात. आपणही याचा व्यवस्थित उपयोग करून घेतल्यास आरोग्य उत्तम राहील हे नक्की. चला, तर मग आपण आज हिवाळ्यात ताकद देणारे उपचार कोणते ते पाहू या.

डिंकाचा लाडू

डिंकाचा लाडू घराघरांत बनवला जातो. उत्तम प्रतीचा डिंक बारीक करून घरी बनविलेल्या साजूक तुपात तळून तयार केलेली लाही, खसखस आणि खारीक या तीन गोष्टी त्यात मुख्य असतात. बरोबरीने गोडांबी, तालीमखाना, जायफळ, बदाम, काजू, पिस्ता वगैरे गोष्टी टाकून शक्यतो खडीसाखरेचा पाक करून त्यात बनविलेला डिंकाचा लाडू रोज खाणे हे घरातल्या प्रत्येकासाठी उत्तम होय. मधुमेह असला तर अगदी कमी साखर टाकूनही लाडूचे मिश्रण बनवता येते. शक्तीसाठी डिंक अमृतोपम असतो. हाडांसाठी, सांध्यांसाठी, कंबरेतील शक्तीसाठी डिंकासारखे द्रव्य नाही. ‘कंबर कसून कामाला लागणे’ हा वाक्प्रचार आपण वापरतो कारण कोणत्याही कामासाठी कंबरेत शक्ती असावी लागते आणि ती डिंकातून उत्तम प्रकारे मिळते.

श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे त्याच्या अनुभवाचा डिंकाचा एक उपाय नेहमी सांगतात, तो असा, उत्तम प्रतीचा म्हणजे छान चकाकी असणारा महागातील डिंक आणून खलबत्त्याच्या मदतीने त्याची बारीक पूड तयार करावी. कपभर गरम दुधात एक चमचा खडीसाखरेची पूड आणि पाव चमचा डिंकाची पूड टाकून नीट ढवळून रोज सकाळी प्यावे. हिवाळ्यात तर हा उपाय योजावाच, परंतु वर्षभर असे दूध घेतले, बरोबरीने त्यात खारीक पूड टाकून पाच मिनिटांसाठी उकळून घेतले तरी चालते.

महाराष्ट्रात जसे डिंकाचे लाडू प्रसिद्ध आहेत तसा गुजरातमध्ये अडदीयो पाक नावाचा उडदापासून बनविलेला पदार्थ हिवाळ्यात घराघरांत बनवला जातो. उडदाची डाळ, तूप, दूध, डिंकाची लाही, बदाम, काजू, केशर, जायफळ, दालचिनी, खडीसाखर यांपासून बनविलेला हा पाक प्रतिकारशक्ती, हाडांची-स्नायूंची शक्ती, शुक्रधातूची शक्ती वाढविण्यासाठी उत्तम असतो.

आवळ्याचे महत्त्व

हिवाळा आणि शक्ती ही चर्चा करत असताना ताजा आवळा अग्रणी ठरणारच. आवळ्यापासून बनविलेला च्यवनप्राश तर आपण वर्षभर सेवन करायचा असतोच, मात्र हिवाळ्यामध्ये आवळीपूजन ते ताजे आवळे मिळत असेपर्यंत रोज एक आवळ्याचा रस काढून त्यात खडीसाखर, मध व तूप मिसळून दिवसातून एकदा घेणे हे एक हिवाळ्यातील उत्तम रसायन असते, चवीलाही छान लागते. आजकाल अनेकांना व्हर्टिगोचा त्रास होताना दिसतो, यावरही हे एक उत्तम औषध असते. लघवी साफ होत नसली, दाह होत असला तर त्यावरही आवळ्याचा रस आणि खडीसाखर हे मिश्रण घेण्याने लगेच गुण येतो.

हिवाळा असेपर्यंत तर ताज्या आवळ्याचे हे रसायन घेता येईल पण नंतर काय? चांगले आवळे आणून कापून सावलीमध्ये वाळवून ठेवता आले तर नंतर त्याचे चूर्ण करता येते. असे आवळ्याचे चूर्ण, गुळवेलीचे चूर्ण व गोक्षुर चूर्ण ही तिन्ही चूर्णे समभाग मिश्रित करून ठेवली आणि त्यातील एक चमचा चूर्ण, एक चमचा तूप आणि अर्धा चमचा मध यात मिसळून सेवन केले तर ते एक उत्तम रसायन असते, रक्तशुद्धी करते, त्वचाविकारांवर उपयुक्त असते, मधुमेही व्यक्तीची ताकद कमी होऊ देत नाही, थकवा, मरगळ, अनुत्साह, इतकेच नाही तर नैराश्य कमी होण्यासही या चूर्णाचा उपयोग होताना दिसतो.

कोहळा आणि जेष्ठमध

हिवाळ्यात कोहळे मिळू लागतात. कोहळ्याचा पेठा तर सर्वज्ञात असतो, मात्र पिकलेल्या कोहळ्याचा कीस, कवचबीज, ज्येष्ठमध, शतावरी वगैरे द्रव्ये आणि खडीसाखेरचा पाक करून बनविलेल्या वड्या या सुद्धा शक्तिवर्धनासाठी उत्तम असतात. कोहळा थंड वीर्याचा व स्मृति-बुद्धिवर्धक तसेच मनाची शक्ती वाढवणारा असल्यामुळे कोहळेपाक किंवा कोहळ्याच्या वड्या अप्रतिम गुणकारी असतात. धात्रीरसायन हे जे तयार रसायन असते त्यात आवळा व कोहळा या दोन्ही गोष्टी असतात.

ज्येष्ठमध हे एक प्रसिद्ध घरगुती औषध. ज्येष्ठमधाची विशेषतः ही की ते चवीला गोड असते, ताकद वाढवते पण तरीही कफदोष वाढवत नाही, उलट कफदोष कमी करते. चांगले ज्येष्ठमध आणून त्याची खलबत्त्याच्या व मिक्सरच्या मदतीने वस्त्रगाळ पूड बनवून ठेवता येते. चमचाभर चूर्ण, एका चमचा तूप व अर्धा चमचा मधात मिसळून दिवसातून एकदा किंवा दोनदा घेता येते. यामुळे शक्ती वाढते, शरीरातील उष्णता कमी होते, आवाज सुधारतो, घशातील खवखव कमी होते आणि मरगळ, थकवा बघता बघता कमी होण्यास सुरुवात होते. हिवाळ्यातच नाही तर पूर्ण वर्षभर सुद्धा अशा प्रकारे ज्येष्ठमधाचा उपयोग करून घेता येतो.

ताजे खोबरे सुद्धा ताकद वाढविणारे असते. त्यामुळे या दिवसात स्वयंपाकात नारळ खवून ताज्या खोबऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग करणे चांगले होय. ताजा आवळा व खोबऱ्याची चटणी, ताज्या खोबऱ्याच्या वड्या, नारळाच्या दुधापासून बनविलेली सोलकढी सेवन करणे चांगलेच. बरोबरीने नैवेद्याच्या छोट्या वाटीभर नारळाच्या दुधात चवीनुसार खडीसाखर मिसळून घेण्याने शक्ती वाढू लागते. अंगदुखी, थकवा वगैरे लक्षणे दूर होतात, त्वचेचा कोरडेपणा, कोरडा खोकला वगैरे त्रासही दूर होतात.

तूप, मध, दही, साखर प्रत्येकी एक चमचा आणि दूध ४-५ चमचे या पाचही गोष्टी एकत्र करून बनविलेले पंचामृत हे सुद्धा एक उत्कृष्ट रसायन आहे. पंचामृत संपूर्ण वर्षभर घेता येणे चांगलेच पण निदान हिवाळ्यात तरी प्रत्येकाने नक्की घ्यावे. पंचामृतात साखरेच्या ऐवजी अमृतशर्करा हा अस्सल केशर, सुवर्णवर्ख, शतावरी यांच्यापासून बनविलेला कल्प टाकला तर त्याचे रसायन गुण अनेक पटींनी वृद्धिंगत होतात.

‘रसायन’ ही आयुर्वेदातील विशेष संकल्पना. रसादी धातूंपर्यंत पोचण्याची आणि त्यांना शक्ती देण्याची क्षमता रसायनामध्ये असते. उत्तम अन्न सुद्धा रसायनाचे काम करू शकते, पण सध्याच्या काळात प्रदूषण, अन्नात झालेले बदल, रासायनिक खतांचा वारेमाप वापर यामुळे फक्त अन्नावर अवलंबून राहणे पुरेसे ठरत नाही. कमी प्रमाणात घेता येईल, पण अधिक प्रभावी ठरेल यासाठी आयुर्वेदातील रसायन सर्वोत्तम असते. छोट्या मुलांसाठी च्यवनप्राश, चैतन्य कल्प, बालामृत ही रसायने; स्त्रियांसाठी सॅनरोझ, धात्री रसायन, शतावरी कल्प, आत्मप्राश, मॅरोसॅन ही रसायने; पुरुषांसाठी आत्मप्राश, मॅरोसॅन ही रसायने उत्कृष्ट परिणाम देतात. हिवाळ्याच्या निमित्ताने प्रत्येकाने एखादे-दुसरे रसायन घेण्यास सुरुवात केली तर त्यामुळे संपूर्ण वर्षाची आरोग्य-तयारी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT