फॅमिली डॉक्टर

आरोग्यासाठी उत्तम ऋतू... हिवाळा

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. भाग्यश्री झोपे

हिवाळ्यामध्ये शरीरसामर्थ्य वाढविण्यासाठी व्यायाम करणे उपयुक्त असते. व्यायामाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवायला लागते. धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ॲरोबिक्स यांसारख्या व्यायामाने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते, स्नायू लवचिक राहतात, हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीर उबदार राहण्यास मदत मिळते. योगासने, चालणे या प्रकारच्या व्यायामाने शरीर लवचिक राहते; शरीरासह मनाचाही ताण नाहीसा होण्यास मदत मिळते.

थंडीचे दिवस सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात. पावसामुळे होणारी गैरसोय किंवा गर्मीमुळे होणारी जिवाची घालमेल या दोन्ही गोष्टी थंडीत नसतात. हिवाळ्यात भूक चांगली लागते, त्यामुळे पचन सुधारते, शरीरशक्ती वाढते, सहसा आजारपण येत नाही आणि असलेल्या आजारात थोडा तरी आराम मिळतो. हे सर्व का होते? आयुर्वेद याचे कारण सांगतो की वाढत्या थंडीमुळे शरीरस्थ अग्नी प्रदीप्त होतो. आयुष्य, ताकद, कांती, आरोग्य, उत्साह, उत्तम शरीरबांधा वगैरे सर्व गोष्टी ज्याच्या अधीन आहेत असा अग्नी जेव्हा प्रदीप्त होतो, त्या हिवाळ्यात आरोग्य सुधारणे अगदी स्वाभाविक असते. आरोग्याची सर्व बाजूंनी काळजी घेणाऱ्या आयुर्वेदाने निसर्गात व शरीरात होणाऱ्या बदलांचा आरोग्यासाठी कसा वापर करून घ्यावा हे सुद्धा सांगितले आहे. यामध्ये पहिली महत्त्वाची येते ती आहारयोजना. या ऋतूत सप्तधातूपोषक, बलशक्तिवर्धक अन्न घेतल्यास सहजपणे पचू शकते व त्यातून शरीरशक्ती कमावून ठेवता येते. दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत. हिवाळ्यात दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते. ताकातही आले-पुदिन्याचा रस टाकला, कधी तरी तूप-जिरे- हिंगाची फोडणी दिली तर छान लागते.

हिवाळ्यात नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचे सेवन करता येतेच. मात्र, हिवाळ्यात साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचे प्रमाण वाढवता येते. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मसाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते. भाज्या बनवताना या द्रव्यांची व्यवस्थित योजना केली तर त्या रुचकर होतात, सहज पचतात आणि शक्ती वाढवतात. भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, परवर, कर्टोली, गाजर, मुळा वगैरे भाज्या, वेलीवर येणाऱ्या मसाल्याचे पदार्थ टाकून बनवता येतात. बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, अक्रोड हा सुका मेवाही हिवाळ्यात उत्तम असतो. ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे, सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ- बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, भोजनानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

रसायनसेवनासाठी सुद्धा हिवाळा हा सर्वोत्तम ऋतू असतो. रक्ताभिसरण नीट होण्यासाठी, प्राणशक्ती पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी, प्रतिकारशक्ती टिकण्यासाठी या दिवसांत च्यवनप्राश, धात्री रसायन, मॅरोसॅन, आत्मप्राश, ब्राह्मरसायन, अमृतप्राश वगैरे उत्तमोत्तम रसायने सेवन करणे उत्तम होय. जर ही रसायने शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित बनवली असली, त्यात टाकायची केशर, वेलची, कस्तुरी, सोन्या-चांदीचा वर्ख वगैरे द्रव्ये खरी, शुद्ध, उत्तम प्रतीची असली तर त्यामुळे शक्ती वाढते, प्राणशक्ती व जीवनशक्तीची पूर्ती होते, अर्थातच आरोग्यरक्षण होते. हिवाळ्यामध्ये शरीरसामर्थ्य वाढविण्यासाठी व्यायाम करणेही उपयुक्त असते. व्यायामाचे फायदे निरनिराळे असतात. उदा. शरीरयष्टी पिळदार करण्याच्या दृष्टीने व्यायाम करायचा असल्यास वेटलिफ्टिंग, दंडबैठका, जोर काढणे वगैरे प्रकार उपयुक्त ठरू शकतात.

व्यायामाचा अतिरेक होणार नाही, व्यायाम करताना दमछाक होऊन फायद्याऐवजी नुकसान होणार नाही याकडे लक्ष ठेवायला लागते. धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ॲरोबिक्स यासारख्या व्यायामाने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते, स्नायू लवचिक राहतात, हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळते. योगासने, चालणे या प्रकारच्या व्यायामाने शरीर लवचिक राहते; शरीरासह मनाचाही ताण नाहीसा होण्यास मदत मिळते; रक्ताभिसरण संस्थेसह, मज्जासंस्थेचे कार्य सुधारते आणि प्राणायाम, भस्रिकासारख्या श्र्वसनक्रियांमुळे शरीरात प्राणशक्तीचा संचार अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते; शरीर, मन, इंद्रिये सर्वच गोष्टी प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. प्राणायामामुळे वाताला प्रेरणा मिळाली की अग्नी सुधारण्यास, पर्यायाने आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत मिळते. या शिवाय हिवाळ्यात नियमित अभ्यंग करणे, तज्ज्ञ परिचारकाकडून मसाज, स्वेदन करून घेणे, शक्तिवर्धक बस्ती करून घेणे याही गोष्टी आरोग्यवर्धक ठरतात. अशा प्रकारे हिवाळ्याचा जर युक्तिपूर्वक वापर करून घेतला तर संपूर्ण वर्षभर आरोग्य उत्तम राहू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT