रोज क्लिनिकमध्ये रुग्णांना तपासताना, ‘अहो डॉक्टर, तुमची औषधे घेत असताना कुठल्या प्रकारचे पथ्य पाळावे लागणार आहे’, हा एक प्रश्र्न रुग्णांकडून हमखास विचारला जातो.
- डॉ. मालविका तांबे
रोज क्लिनिकमध्ये रुग्णांना तपासताना, ‘अहो डॉक्टर, तुमची औषधे घेत असताना कुठल्या प्रकारचे पथ्य पाळावे लागणार आहे’, हा एक प्रश्र्न रुग्णांकडून हमखास विचारला जातो. हा प्रश्र्न बहुतेक वेळा घाबरूनच विचारलेला असतो आणि या प्रश्र्नानंतरचे पुढचे वाक्य असते, ‘पण डॉक्टर पथ्य पाळणे मला जरा अवघड आहे हं.’ तरुण मंडळी तर म्हणतात, ‘डॉक्टर मला त्रास होतो आहे म्हणून मी औषधे तर घेईन, पण तुम्ही जर फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर वगैरे सगळे मला बंद करायला सांगणार असाल तर ते मात्र माझ्याकडून होणार नाही.’ पथ्य पाळणे खरंच एवढे अवघड आहे का? पथ्य म्हणजे काय हे आपण प्रथम समजून घेऊ. पथ्य हा शब्द ‘पथ’ या शब्दावरून आलेला आहे. अर्थात खऱ्या मार्गावरून चालणे म्हणजे पथ्य. पथ्याची व्याख्या करताना चरकसंहितेत म्हटलेले आहे, ‘पथ्यं पथो अनपेतं, यध्यच्चोक्तं मनसः प्रियम् ।....चरक सूत्रस्थान.’ पथ्य म्हणजे अशा प्रकारचा आहार-विहार ज्याने शरीरात कुठल्याही प्रकारचा दोष तयार होणार नाही, व जो मनालाही प्रिय असेल. पथ्य पाळल्याने शरीरात ताकद, उत्साह, तेज, सहनशक्ती, प्रतिकारशक्ती वाढायला मदत मिळते. आपल्या शरीरातील महत्त्वाच्या असणाऱ्या पचनसंस्थेला बल मिळते, शरीरातील सर्व धातू पोषित होतात, सर्व स्रोतसांचे कार्य नीट चालायला मदत मिळते.
पथ्य म्हणजे आयुष्यात पाळायच्या अशा काही गोष्टी ज्यांच्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर आरोग्य प्राप्त व्हायला मदत मिळते. तसेही, आयुष्यात नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे असते. निसर्गात सकाळी सूर्य रोज नियमाने उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. ‘तुम्ही मंडळी आपल्या मनाप्रमाणे चालता, मीही माझ्या मनाप्रमाणे चालणार, मला हा नियम पाळायचा नाही’ असे सूर्याने ठरविले तर चालेल का? आपापली वाहने घेऊन सर्वजण रस्त्यावर येतात असे आपण दैनंदिन जीवनात पाहतो. मी रहदारीचे नियम पाळणार नाही असे सर्वांनी ठरविले तर सर्वांनाच किती त्रास होईल याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. परीक्षेत उत्तरे लिहायचे काही नियम असतात. जो या नियमांचे पालन करून उत्तर लिहितो त्याला १०० टक्के गुण मिळतात. ज्यांना हे नियम पूर्णपणे पाळता येत नाहीत ते निदान ७०-८० टक्के गुण मिळिण्याचा प्रयत्न करतात, अगदीच शक्य नसणारे किमान उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. हेच पथ्य पाळण्याच्या बाबतीतही खरे आहे. आयुष्यात आपल्याला आपले आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर १०० टक्के नाही तर निदान उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळविण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल की नाही? पथ्य पाळणे म्हणजे सगळ्या गोष्टी टाळणे नव्हे, तर पथ्य पाळणे म्हणजे कोणत्या गोष्टी खाव्या हे समजून घेणे. दैनंदिन जीवनात थोडे पथ्य पाळले व क्वचित कधी तरी आवडणारी पण अपथ्याची गोष्टी खाल्ली तर शरीर ती गोष्ट पचवण्यास सक्षम ठरू शकते. पथ्याचा विचार करत असताना आपल्याला प्रकृती, ऋतू, आजार, मानसिकता, सवयी, आजूबाजूचे वातावरण, शरीरात कुठल्या दोषाचा प्रभाव जास्त आहे वगैरे सगळ्यांचा विचार करावा लागतो.
पथ्य गोष्टी कोणत्या हे म्हणजे सर्वांना चालू शकतात त्या गोष्टी कोणत्या हे आपण प्रथम पाहू या.
रक्ती तांदूळ, षष्ठीसाळी तांदूळ, गहू, जव
गाईचे, म्हशीचे, बकरीचे दूध, गाईचे तूप, ताक, लोणी
मूग, मसूर, चणा, तूर वगैरे पचायला हलकी कडधान्ये
कोहळा, दुधी, भेंडी, तोंडली वगैरे फळभाज्या
डाळिंब, खजूर, आवळा वगैरेंसारखी फळे
हळद, धणे, हिंग, मेथी, पिंपळी, ओवा
उकळून गार केलेले स्वच्छ पाणी
सैंधव मीठ
गूळ, साखर व मध
या सर्वांचा आपल्याला रोजच्या आहारात समावेश करता येणार नाही का? काही गोष्टीवर योग्य ते संस्कार केल्यास त्या पथ्यकर होऊ शकतात. उदा. गोष्ट पचायला हलकी व्हावी अशी इच्छा असली तर ती शिजवावी. यातूनच अन्नयोगशास्त्र तयार झाले आहे. उदा. उडदाची डाळ पचायला जड असली तरी ती भाजून, दळून केलेल्या पिठापासून दूध व साखर घालून खीर करून सेवन केली तर पथ्य होते. किंवा उडदाची डाळ भिजवून केलेले वडे दह्याबरोबर किंवा सांबाराबरोबर खाल्ल्यास पचायला सोपे होतात. सकाळी लवकर उठणे, शरीराला अभ्यंग करणे, व्यायाम करणे, ध्यान-धारणा करणे, चांगल्या व्यक्तींशी बोलणे-भेटणे, चांगली पुस्तके वाचणे, विचार सकारात्मक ठेवणे, राग, चिडचिड, द्वेष, मत्सर भावनांपासून दूर राहणे या गोष्टीही पथ्यात येतात. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर स्वास्थ्याचा सर्वांगीण विचार केवळ आयुर्वेदातच केलेला आढळतो. कारण आयुर्वेद हे संपूर्ण आयुष्याचे शास्त्र आहे, केवळ औषधांचे नाही. आयुर्वेद म्हटले की पथ्य आलेच असे समीकरण न मांडता पथ्याचे महत्त्व समजून घेण्याची गरज आहे. पथ्याच्या संकल्पनेचे पालन करण्याचा प्रयत्न केला तर आपला आहार व आपली वागणूक औषधासारखे काम करू लागते. त्यामुळे पथ्याला घाबरू नका, शक्य तेवढे पथ्य पाळा, म्हणजे आरोग्याकडे आपले मार्गक्रमण सोपे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.