tarri poha  file photo
फूड

खाद्यभ्रमंती : नागपूरची खासियत 'तर्री पोहे'

पोहे कधीही खा किंवा कशासोबतही खा, दिलखूष होणारच... अशी ही पोह्यांची महती.

सकाळ ऑनलाइन

- आशिष चांदोरकर

पोहे म्हणजे जीव की प्राण... सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही म्हटलं तरी पोहे खायला आपण कायम तयार. नेहमीचे तयार होतात तसे कांदा पोहे, बटाटा पोहे, दहीपोहे, दडपे पोहे, पुण्यात तुळशीबागेत रौनकच्या बाहेर झणझणीत ठेच्याबरोबर मिळतात तसे पॅटिस-पोहे किंवा वडा-पोहे, रास्ता पेठेत किंवा शनिवारवाड्याजवळ मिळतात तसे सांबार पोहे, कोकणातील कोळाचे पोहे, इंदूरचे जिरावन पसरलेले पोहे किंवा एमपीएससीचे विद्यार्थी ज्यावर ताव मारतात ते मटकी पोहे... पोहे कधीही खा किंवा कशासोबतही खा, दिलखूष होणारच... अशी ही पोह्यांची महती.

काही वर्षांपूर्वी एका कामानिमित्त नागपूरला गेलो होतो, तेव्हा तर्रीपोहे हा पोह्यांचा आणखी एक प्रकार अनुभवला. काही लोक त्याला चनापोहे देखील म्हणतात. तर्रीपोहे म्हणजे एकदम वरचा क्लास. नागपुरात जागोजागी तर्रीपोहे मिळतात. कस्तुरचंद पार्कजवळचा पोहेवाला विशेष प्रसिद्ध, पण मी तर्रीपोहे खाल्ले ते चंद्रपूरला जाताना नागपूरच्या एसटी स्टँडसमोर. तिथं असलेल्या तीन-चार गाड्यांमधली सर्वाधिक गर्दी असलेल्या एका गाडीवर सकाळी झणझणीत तर्रीपोह्यांची ऑर्डर दिली नि कायमचा जीव जडला.

साधे पोहे, त्यावर शेव आणि चिवडा, बारीक चिरलेला कांदा, वरून चण्याची म्हणजे हरभऱ्याची उसळ आणि वरून मस्त एक्स्ट्रॉ तर्री... चण्याची उसळ आणि तर्री म्हणजे पोह्याचा आत्मा. तो नसेल तरी पोहे चांगले लागतात, पण मजा येत नाही. चण्याच्या रश्शामध्ये अर्धे कापलले टोमॅटो तरंगताना दिसतात. तुमच्या आवडीनुसार पोह्यावर तर्री मारताना अर्धा कापलेला आणि अर्धवट शिजलेला टोमॅटो देखील ठेवला जातो. मग पोह्यांच्या घासाबरोबर अर्ध्यापक्क्या शिजलेल्या टोमॅटोचे तुकडेही स्वाहा केले जातात. तर्रीमध्ये काही टोमॅटो तरंगताना दिसतात. काही टोमॅटो तळाला असतात. जसजसे तर्रीतले टोमॅटो संपत जातात तसतसे नवे टोमॅटो कापून उकळत्या तर्रीत टाकले जातात. मग हळूहळू उकळत्या तर्रीमध्ये टोमॅटो शिजत जातात. तर्रीपोहे खाताना वरून टोमॅटो हवाच, हा बहुतांश नागपूरकरांचा नियम. अर्थात, मी पक्का नागपूरकर नसल्यानं तेव्हा मला टोमॅटोची महती माहिती नव्हती. त्यामुळं मी टोमॅटोला मुकलो होते. टोमॅटो देऊ का, असं विचारल्यावरही मी चक्क नाही म्हटल्याचं मला पक्क आठवतंय.

हेही वाचा :सावधान! आठ पदार्थांमुळे कोरोनाचा धोका; इम्युनिटीवर करतात परिणाम

तर्रीपोहे म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’. तुलनेनं मवाळ असलेल्या पोह्यांना तर्री थोडं तेज बनविते आणि तेजतर्रार तर्रीच्या आगीची धग कमी करण्याचा प्रयत्न पोहे करतात. त्यामुळं हे कॉम्बिनेशन एकदम अफलातून लागतं. Opposite poles attract each-other म्हणतात ना तसं. पहिल्याच घासाला चणे, तर्री आणि पोहे यांचा झणझणीतपणा जाणवतोच. सावजीइतकं तिखट नसलं तरीही, नव्यानं खाणाऱ्याला ठसका लागण्याइतकं हे प्रकरण तिखट असतंच. तिखट असो किंवा झणझणीत हे प्रकरण तुम्हाला प्रेमात पाडतं हे मात्र नक्की. पहिला घास संपल्यानंतर प्लेट कधी संपते ते कळत देखील नाही.

अधूनमधून शेव-चिवडा आणि चणे-तर्री यांचं आवर्तन सुरू असतं. खरे खवय्ये असाल किंवा पोहेप्रेमी असाल, तर मग तुम्ही एका प्लेटवर थांबूच शकत नाही. दुसरी प्लेट ऑर्डर करणं हे अत्यावश्यक असतं. शास्त्रं असतं ते... असा भरपेट नाश्ता केल्यानंतर मग तुमचा दिवस एकदम भारी जातो, हे मुद्दाम वेगळं सांगायला नको. मध्यंतरी अमरावतीला गेलो होतो. खूप शोध घेतला, पण तिथं काही तर्रीपोहे मिळाले नाही. त्यामुळं आता पुन्हा एकदा तर्रीपोह्यांचा आस्वाद घेण्यासाठी नागपूरची ट्रीप करणं भाग आहे. बघू जाऊयात लवकरच...

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT