Swiggy
ESakal
Most Ordered Food in India on Swiggy : ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी कंपनी ‘स्विगी’ने मंगळवारी एक विशेष रिपोर्ट प्रसिद्ध केला. या अहवालात स्विगीने २०२५ मध्ये कोणत्या पदार्थांसाठी सर्वाधिक ऑर्डर मिळाल्या हे उघड केले. स्विगीच्या रिपोर्टनुसार, या वर्षी सर्वाधिक ऑर्डर केलेल्या पदार्थांमध्ये बिर्याणी, बर्गर, पिझ्झा आणि डोसा यांचा समावेश आहे. तर कंपनीने हे देखील सांगितले की या वर्षी भारतीयांनी बिर्याणीसाठी सर्वाधिक ऑर्डर दिल्या आहेत. म्हणजेच स्विगीवर सर्वाधिक ऑर्डर केलेल्या पदार्थांच्या यादीत बिर्याणी अव्वल स्थानावर आहे.
स्विगीच्या 'हाउ इंडिया स्विग्ड' रिपोर्टमध्ये कंपनीने म्हटले आहे की या वर्षी बिर्याणी त्यांच्या युजर्ससाठी सर्वाधिक आवडता पदार्थ होता. स्विगीला या वर्षी बिर्याणीसाठी एकूण ९३ दशलक्ष ऑर्डर मिळाल्या आहेत. स्विगी युजर्सच्या आवडत्या पदार्थांच्या यादीत बर्गर दुसऱ्या क्रमांकावर असून, वर्षभरात एकूण ४४.२ दशलक्ष ऑर्डर दिल्या गेल्या. यानंतर या यादीत पिझ्झा तिसऱ्या क्रमांकावर आहे, स्विगीला या वर्षी पिझ्झासाठी एकूण ४०.१ दशलक्ष ऑर्डर मिळाल्या आहेत. तर त्यापाठोपाठ सर्वाधिक ऑर्डर केलेल्या खाद्यपदार्थांच्या यादीत डोसा देखील समाविष्ट आहे, जो चौथ्या क्रमांकावर असून, स्विगीला या वर्षी डोसासाठी २६.२ दशलक्ष ऑर्डर दिल्या गेल्या आहेत.
स्विगीने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, स्थानिक पाककृतींवरील भारतीयांचे प्रेम आणि पसंती कायम आहे. रिपोर्टनुसार, यावर्षी पहाडी अन्नपदार्थांच्या ऑर्डरमध्ये नऊ पट वाढ झाली आहे, तर मालबार, राजस्थानी, मालवणी आणि इतर प्रादेशिक पाककृतींच्या ऑर्डरमध्येही मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे.
याशिवाय, रात्रीच्या जेवणाच्या ऑर्डरमध्ये दुपारच्या जेवणाच्या ऑर्डरपेक्षा अंदाजे ३२ टक्के जास्त वाढ झाली आहे. तसेच, स्विगीने म्हटले आहे की या वर्षी भारतीयांनी मेक्सिकन फूडसाठी १६ दशलक्ष, तिबेटी फूडसाठी १२ दशलक्षाहून अधिक ऑर्डर आणि कोरियन फूडसाठी ४.७ दशलक्ष ऑर्डर दिल्या असल्याचीही माहिती स्विगीने रिपोर्टद्वारे दिली आहे.