Actress Prajakta Gaikwad esakal
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. त्यात तीन दिवस गौरी. यावर्षी तिने सजावटीमध्ये महालक्ष्मीला महाराष्ट्रीयन पेहराव अशी थीम केली आहे. याबद्द्ल तिने 'सकाळ'कडे व्यक्त केलेल्या भावना तिच्याच शब्दांत...
गणपतीचे दहा दिवस खरंच खूपच प्रसन्नतेचे असतात. खूप आनंद, खूप मज्जा, खूप सारी सजावट आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मीसाठी करण्यात येणारा फराळ. फराळामध्ये माझा सर्वांत आवडीचा पदार्थ म्हणजे चकली आणि करंजी. आईच्या हातची चकली आणि करंजी खाणं म्हणजे सुख. तिची चकली आणि करंजी मी आतापर्यंत कोणाकडेच पाहिली नाही आणि खाली नाही. करंजी म्हणजे खूप सारे पापुद्रे आणि खुसखुशीत. चकली म्हणजे खायला एकदम भारी आणि दिसायलाही भारी. खरंतर दरवर्षी शूटिंगमुळे मला वेळ मिळत नाही; पण यावर्षी आवर्जून वेळ ठेवला आणि महालक्ष्मीची सजावट, गौरीच्या फराळासाठी आईला मदत केली.आमच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो. त्यात तीन दिवस गौरी. यावर्षी सजावटीमध्ये महालक्ष्मीला महाराष्ट्रीयन पेहराव अशी थीम आम्ही केली. त्यांना पारंपरिक पद्धतीचे दागिने म्हणजेच बोरमाळ, ठुशी, झुमके, बांगड्या, कंबर पट्टा, नथ, इत्यादी केले. गौराई यांना महाराष्ट्रीयन पेहराव यावा, यासाठी फेटा घातला आहे. दोघींना वेगवेगळ्या प्रकारचे फेटे घालून एक मराठमोळे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न आम्ही केला. त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येकाला खूप छान वाटले आणि त्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसादही दिला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी गौराई यांना नऊवार साडी नेसली आहे. एका खांद्यावर शॉल देऊन त्यांचं रूप खऱ्या अर्थानं महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभेल, असं केलेलं आहे.अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने महालक्ष्मीला 'महाराष्ट्रीयन पेहराव' केला आहे. हे फोटो 'ई-सकाळ' तसेच, प्राजक्ताच्या सोशल मीडियावर टाकले आहेत. या वर्षीची सजावट तुम्हाला कशी वाटली, याबाबत आपली प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपवर या नंबरवर- 8484973602 नावासह कळवा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.