पुणे : ''हौसेला मोल नसतं, अस म्हणतात....'' ही उक्ती कोथरूडमधील एका पुणेकरानं खरी करून दाखविली आहे. शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा भव्य देखावा त्यांनी घरातच साकारला आहे. तो पहायला त्या पुणेकरांच्या घरी आता आजूबाजूचे नागरिकही येऊ लागले आहेत.
सुधीर फडके हे आहे हौशी पुणेकराचं नाव. कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीजवळ हिल व्ह्यू रेसिडेन्सीमध्ये ते राहतात. घरातच त्यांनी १० फूट बाय ३ फूट आकारात मेट्रोचा देखावा तयार केला आहे. डिझाईनिंग आणि साईनेजेसचा व्यवसाय असलेल्या फडके यांच्या डोक्यात यंदा ऑलिंम्पिक आणि मेट्रोचा विषय घोळत होता. सहकाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी मेट्रोचा देखावा तयार करण्याचं ठरविलं. त्यासाठी त्यांनी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली. सुमारे आठ दिवसांत त्यांचा मेट्रोचा देखावा तयार झाला. प्लायवूड, फोम, कार्डशीटचा वापर करून त्यांनी हा देखावा तयार केला आहे. त्यावर त्यांनी एलईडीच्या दिव्यांचा झोतही सोडले आहेत. तसेच वाहनांच्या आकृत्याही वापरल्या आहेत. त्यासाठी आकर्षक रंगसंगतीही केली आहे.घरातच साकारला मेट्रो प्रकल्पाचा देखावामधील गणरायाची मुर्ती.नळस्टॉप चौकात साकारणाऱ्या दुमजली उड्डाण पुलाचीही प्रतिकृती त्यांनी तयार केली आहे. या बाबत फडके म्हणाले, ‘‘मेट्रो प्रकल्पाचे काम कोथरूडमध्ये सुरू आहे. आता तर मेट्रोची ट्रायलही झाली आहे. त्यामुळे हा देखावा मनात होता, तो साकारला आहे.’’ हा देखावा पाहण्यासाठी १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान सायंकाळी ५ ते रात्री ८ दरम्यान नागरिकांना खुला ठेवला आहे. वनाज- रामवाडी (१६ किलोमीटर) आणि पिंपरी चिंचवड - स्वारगेट (१५ किलोमीटर) मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या पुण्यात सुरू आहे. या प्रकल्पाचे काम सुमारे ६० टक्के पूर्ण झाले आहे. दोन्ही मार्गांवर पहिल्या टप्प्यातील मेट्रो डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही मार्गांवर मेट्रोची ट्रायल रन झाली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका एकूण ११ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. मार्च २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. दोन्ही मार्गांवर सुमारे ३१ मेट्रोची स्थानके आहेत. शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाचा भव्य देखावा Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.