इस्त्राइल हमास युद्ध सुरू असून या युद्धात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्राइलकडून गाझाला सातत्याने प्रत्युत्तर दिले जात आहे. यादरम्यान अनेक वेळा उत्तर गाझा रिकामे करण्याचा इशारा इस्राइलकडून देण्यात आला आहे. मात्र, इथल्या लोकांना पळून जाण्यासाठीही जागा नाहीये.
इस्राइलचे सैन्य जमिनीवर कारवाईसाठी सीमेवर उभी आहे. आता इस्राइलने उत्तर गाझा रिकामा करण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला आहे. उत्तर गाझामधील नागरिकांनी उत्तर गाझा रिकामा करावा, अन्यथा त्यांनाही दहशतवाद्यांचे सहकारी मानले जाईल आणि त्यांना नष्ट केले जाईल, असे इस्राइलच्या लष्कराने म्हटले आहे.
इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, हा तातडीचा इशारा आहे. तुम्ही उत्तर गाझामध्ये राहून आपला जीव धोक्यात घालत आहात. जे उत्तर गाझामधून दक्षिण गाझामध्ये स्थलांतरित होणार नाहीत त्यांना दहशतवादी मानले जाईल. इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, त्यांना कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा मृत्यू नको आहे, त्यामुळे सलग अनेक दिवस इशारे देण्यात आले होते, परंतु हा अंतिम इशारा मानला जावा.
लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कधीही नागरिकांना लक्ष्य केले नाही, परंतु ज्या ठिकाणी दहशतवादी होते त्याच ठिकाणी हवाई हल्ले केले. गाझामधील लोक दक्षिण गाझामध्ये जाण्यास टाळाटाळ करत आहेत कारण तेथेही त्यांना हवाई हल्ल्याची भीती आहे. दक्षिण गाझाला गेलेले त्यांचे सर्व कुटुंबीय किंवा नातेवाईक इस्राइली हल्ल्यात मारले गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सात ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसखोरी करून जवळपास १४०० लोकांचा जीव घेतला होता. यानंतर इस्राइलनेही प्रत्युत्तर देत गाझावर हल्ला चढवत मोठा भाग उद्ध्वस्त केला. याशिवाय इस्राअलने गाझाला होणारा इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही बंद केला.
संयुक्त राष्ट्रांपाठोपाठ आता गाझाला इजिप्तच्या माध्यमातून मदत मिळू लागली आहे. गाझामधील सर्वसामान्य जनतेलाही भारताने मदत पाठवली आहे. मात्र, इस्रायलचे सैन्य ग्राउंड ऑपरेशनसाठी तैनात आहे. यामुळे इस्त्राइल काय पाऊल उचलेल याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.