israeli–palestinian conflict death toll rises to 1200 siege of gaza Hamas attack  Sakal
ग्लोबल

इस्राईलकडून ‘अग्निवर्षाव’ युद्धातील मृतांची संख्या १२०० वर : ‘हमास’ला हुसकाविण्यासाठी प्रयत्न सुरू

हमासने शनिवारी केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत इस्राईलचे सातशे, तर पॅलेस्टाइनमधील ५०० हून अधिक जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जेरुसलेम : ‘हमास’विरोधात युद्ध पुकारलेल्या इस्राईलने आज गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेच्या विविध आश्रयस्थानांवर तुफान बाँबवर्षाव केला. हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करणे, हाच अंतिम उद्देश असल्याचे इस्राईलच्या संरक्षण दलाने स्पष्ट केले आहे. गाझा पट्टीतून इस्राईलच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात घुसखोरी करत हल्ले करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांना हुसकावून लावणे आणि सीमा पुन्हा संरक्षित करणे, यासाठी इस्राईलच्या सैनिकांचे सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

हमासने शनिवारी (ता. ६) केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत इस्राईलचे सातशे, तर पॅलेस्टाइनमधील ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. हमासने १३० इस्रायलींना ओलिस ठेवले आहे.

इस्राईलकडे प्रचंड शस्त्रसाठा आणि आधुनिक यंत्रणा असतानाही रॉकेट हल्ल्याला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करणे अद्यापही त्यांना शक्य झालेले नाही. इस्राईलच्या दक्षिण भागातील सात ते आठ गावांमध्ये हमास आणि इस्राईलचे सैनिक यांच्यात संघर्ष सुरु आहे.

याशिवाय, दहशतवाद्यांची घुसखोरी सुरुच आहे. त्यामुळे इस्राईलच्या हवाई दलाने आज हल्ल्यांना तीव्रता आणत गाझा पट्टीतील एक हजार ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये बैत हनौन या गावाचाही समावेश आहे. हल्ल्यांमध्ये हे गाव जवळपास भुईसपाट झाले आहे याच गावातून हमासने हल्ले केल्याचा इस्राईलचा दावा आहे. या हल्ल्यामधील जीवितहानीबाबत माहिती जाहीर झालेली नाही.

एक हजार जण घुसले

शनिवारी केलेल्या हल्ल्यावेळी हमासच्या सुमारे एक हजार दहशतवाद्यांनी इस्राईलमध्ये घुसखोरी केल्याचा दावा इस्राईल सरकारने केला आहे. त्यांनी सीमेवरील गावांमध्ये घुसत बेछूट गोळीबार केला. अनेकांचे अपहरण केले. हमास आणि आणखी एका इस्लामिक जिहाद नावाच्या गटाने मिळून एकूण १३० जणांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे. यामध्ये सैनिक, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. इतर काही देशांच्या नागरिकांचेही अपहरण करण्यात आले आहे.

प्रमुख घडामोडी

  • परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे इस्राईलमधील हायफा बंदराचा कारभार पाहणाऱ्या अदानी समूहाचे निवेदन.

  • इस्राईलला विमाने न नेण्याचा अमेरिकन एअरलाइन्सच्या वैमानिक संघटनेचा निर्णय

  • निकी हॅले आणि विवेक रामास्वामी या भारतीय वंशाच्या अमेरिकी नेत्यांचा इस्राईलला पाठिंबा

  • पॅलेस्टाइनला दिला जाणारा विकासनिधी ऑस्ट्रिया रोखणार

  • संघर्षावर तोडगा काढण्याचे इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरातीकडून प्रयत्न

  • हंगेरीचे नागरिक इस्राईलमधून मायदेशी

  • इस्राईलला जाणारी विमान उड्डाणे इजिप्तकडून रद्द.

  • संघर्षातील मृतांमध्ये अमेरिकेचे नऊ,

  • तर थायलंडचे बारा नागरिक.

सव्वा लाख जण विस्थापित

इस्राईलने प्रतिहल्ले सुरु केल्यानंतर गाझा पट्टीतील सुमारे एक लाख २३ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमध्ये गाझा शहरासह इतर गावांमधील अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बहुतांश नागरिक किनारपट्टीच्या भागाकडे जात आहेत.

‘यूएन’ची बैठक निर्णयाविनाच

इस्राईल-हमास संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची आज तातडीची बैठक झाली. समितीच्या सर्व १५ सदस्यांनी हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध करावा, अशी मागणी अमेरिकेने यावेळी केली.

मात्र, अमेरिकेनेच केलेल्या विनंतीनुसार समितीने तूर्त कोणतीही कारवाई न करण्याचे ठरविले. हमासच्या हल्ल्याचा एक सदस्य वगळता सर्वांनी निषेध केला, अशी माहिती अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. ‘अमेरिकेचा रोख जरी आमच्यावर असला तरी, सामान्य नागरिकांवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचा आम्ही निषेध करतो,’ असे रशियाने स्पष्ट केले.

नेपाळच्या १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

काठमांडू : हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये इस्राईलमध्ये शिकत असलेले नेपाळचे दहा विद्यार्थी मृत्युमुखी पडले असून चार जण जखमी झाले असल्याचे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज जाहीर केले. हे विद्यार्थी बेपत्ता असल्याचे रविवारी नेपाळ सरकारने सांगितले होते. हे सर्व विद्यार्थी कृषी महाविद्यालयात शिकत होते. इस्राईलमध्ये सध्या एकूण साडे चार हजार नेपाळी नागरिक कामानिमित्त राहात असून २६५ विद्यार्थी शिकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT