zealandia
zealandia 
ग्लोबल

जगामध्ये आणखी एक खंड आहे...झिलांडिया..!

वृत्तसंस्था

वेलिंग्टन - न्यूझीलंड हे खरे तर प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या दक्षिण प्रशांत महासागरामधील एक छोटेसे बेट. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस सुमारे 1500 किमी अंतरावर असलेल्या या बेटाच्या दुर्गमतेमुळे ते मानवतेने अगदी शेवटी वसति केलेल्या भागांपैकी एक असल्याचे मानले जाते. मात्र न्यूझीलंडसंदर्भातील भौगोलिक धारणा आता लवकरच अमूलाग्ररित्या बदलण्याची शक्‍यता आहे... किंबहुना, न्यूझीलंडसहित जगाच्या भूगोलाची पुनर्रचना करणारे संशोधन भूगर्भविषयक संशोधनासंदर्भात अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील "जिओलॉजिकल सोसायटी'च्या अभ्यास नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

या नव्या संशोधनानुसार, न्यूझीलंड, न्यू कॅलेडोनिया आणि या भागामधील इतर बेटे ही एका स्वतंत्र खंडाचा भाग असून या "नव्या खंडा'चे क्षेत्रफळ सुमारे 20 लाख चौरस मैल इतके आहे. या खंडाचा 94% भाग हा अर्थातच पाण्याखाली आहे. मात्र या खंडाचा भाग हा ऑस्ट्रेलियाच्या भूमीपासून भौगोलिकदृष्टया "स्वतंत्र व वेगळा' असल्याचे बहुमूल्य निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे.

याआधी, न्यूझीलंड आणि न्यू कॅलेडोनिया ही बेटे ऑस्ट्रेलिया खंडाचा भाग असल्याचेच मानले जात होते. यामुळे, या भागास "ऑस्ट्रेलेशिया' असे भौगोलिक नाव देण्यात आले होते. मात्र ऑस्ट्रेलिया खंड व न्यूझीलंड बेटास भौगोलिक दृष्टया स्वतंत्र अस्तित्व असल्याचा विचार गेल्या काही वर्षांत रुजू लागला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठामधील भूगर्भशास्त्रज्ञ सांता बार्बरा यांनी 1995 मध्ये न्यूझीलंडचे स्वतंत्र भौगोलिक अस्तित्व दर्शविण्यासाठी या भागाचे नामकरण "झिलांडिया' असे केले होते. या पार्श्‍वभूमीवर प्रकाशित झालेल्या या संशोधनाने या विचारप्रवाहास अधिक पुष्टी मिळाली आहे.

डॉ. निक मॉर्टिमर या न्यूझीलंडमधील मुख्य संशोधकाच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने हा अहवाल प्रकाशित केला आहे. "झिलांडिया' खंड हा मूळ गोंडवाना या "सुपरकॉंटिनंट'चा भाग असल्याचे मॉर्टिमर यांनी म्हटले आहे. झिलांडिया खंडाचे क्षेत्रफळ हे ऑस्ट्रेलिया खंडाच्या दोन तृतीयांश इतके आहे. कोट्यवधी वर्षांपूर्वी गोंडवानामधून फुटून तयार झालेल्या आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्‍टिका या खंडाप्रमाणेच झिलांडियाचीही निर्मिती झाली असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. यावेळी पृथ्वीवर डायनासोरांचे अस्तित्व होते! मात्र या खंडाचा 94% भाग पाण्याखाली असल्याने कालांतराने न्यूझीलंड वा अन्य बेटांवर वसति केलेल्या मानवतेस या खंडाच्या व्याप्तीचा अंदाजच आला नाही.

खंड म्हणून मान्यता देण्यासाठी सर्व मापदंडांची पूर्णता झिलांडियाकडून होत असल्याचेही या संशोधनामधून स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या संशोधनामुळे अनेक युरोपिअन, आशियाई, आफ्रिकन आणि ऑस्ट्रेलियन भूगर्भशास्त्रज्ञांना आश्‍चर्याचा धक्‍का बसेल, अशी भावना मॉर्टिमर यांनी व्यक्‍त केली आहे. किंबहुना, मंगळ व शुक्र या ग्रहांच्या आधी पृथ्वीच्या एकंदर भुपृष्ठाचे (एलेव्हेशन ऑफ सॉलिड सर्फेसेस) नकाशाबद्ध प्रमाणीकरण करण्यात आले असते; तर झिलांडियास पृथ्वीचा एक खंड म्हणून बराच काळ आधी मान्यता मिळाली असती, असे मॉर्टिमर यांनी म्हटले आहे. परंतु, सद्यस्थितीत "खंड' म्हणून औपचारिक मान्यता देण्यासाठी जागतिक पातळीवर कोणतीही वैज्ञानिक संस्था नसल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT