Libya Flood : पूर आणि चक्रीवादळाच्या तडाख्याने लिबियात दाणादाण उडवली आहे. E sakal
ग्लोबल

Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर पडणारा लिबिया आता पूराच्या फुफाट्यात

जवळपास त्सुनामीइतकाच मोठा आणि धोकादायक पूर लिबियात येऊन सुमारे आठवडा उलटला आहे, पण जगापर्यंत त्याची माहिती पोहोचायला थोडा वेळच लागला. ही आपत्ती नैसर्गिक असली तरी तिचा धोका वाढण्यात मानवनिर्मित घटक कारणीभूत आहेत.

स्वाती केतकर-पंडित

लिबियात मागच्या रविवारी (10 सप्टेंबर 2023) पूर आलाय आणि तिथलं वातावरण संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. जवळपास त्सुनामीच्या वेळी जेवढं नुकसान झालं होतं. तसंच काहीसं लिबीयाच्या बाबतीत झालं आहे.

पूराच्या जोडीला चक्रीवादळही आल्याने इथल्या नागरिकांचे हाल कुत्रा खाणार नाही, अशी परिस्थिती ओ़ढवली आहे. मुळात हे चक्रीवादळ आणि पूर असं जीवघेणं समीकरण कसं जुळून आलं?

कधी आणि कसं झालं हे?

रविवारी १० सप्टेंबरच्या मध्यरात्री आणि सोमवारच्या पहाटे ३च्या सुमारास एकदम डेरना शहराला जाग आली ती पाण्याच्या लोंढ्याने.

लोकांना कळायच्या आत त्यांच्या घरादारात पाणी घुसलं. डेरनाजवळची दोन धरणं एकामागोमाग एक फुटली आणि त्यातल्या साठलेल्या पाण्याचा लोंढा जणू डेरना शहरावर चाल करून आला.

ही दोन्ही धरणं ७०च्या दशकात युगोस्लाव्हियातील एका कंपनीने बांधली होती. विसंगती म्हणजे त्यावेळी (1970) डेरनाला असलेला पूराचा धोका टाळण्यासाठी ही धरणं बांधण्यात आली होती.

मग आत्ताच धरण का फुटलं?

डेरनावर ओढवलेली ही आपत्ती नैसर्गिक आहेच पण मानवनिर्मितसुद्धा आहेच.

डॅनियल चक्रीवादळ सगळीकडे धुमाकूळ घालत होतं. या वादळाने लिबियासह तीन देशांवर परिणाम केला आहे. युरोपातही या चक्रीवादळाने बळी घेतले होते.

तर डेरनाची ही दुर्घटना घडण्याआधी पाच दिवस लिबियात तुफान पाऊस पडत होता. एवढ्या पावसाची सवय नाही, शिवाय त्यासाठी आवश्यक यंत्रणाही नाहीत.

लिबियातील यादवी आणि नागरी युद्धामुळे आधीच तिथली सगळी व्यवस्था खिळखिळी झालेली आहे. प्रशासन आणि सरकारचाच नीटसा पत्ता नसल्याने आपत्तीनिवारक यंत्रणा वगैरे तर फारच लांबच्या गोष्टी म्हणायला हव्यात.

डेरनाजवळची ही दोन्ही धरणं १९७० साली बांधलेली. त्यांची देखभालही नीटशी झालेली नव्हती. त्यांची उंची होती २३० फूट.

डॅनियल वादळाच्या तडाख्याला तोंड देण्याएवढी ताकद या धरणांमध्ये उरलीच नव्हती. या धरणांचा पाया कमकुवत झाला होता. त्यातून पाण्याचा उपसा किंवा निचरा होण्यासाठीची यंत्रणा चांगली नव्हती. बांधकाम दोषकारक होते.

10 सप्टेंबर 2023 रोजी भूमध्यसागरीय वादळी प्रणालीमुळे मुसळधार पाऊस आणि वारे आले. आणि वरचे धरण कोसळले. त्यातलं पाणी आणि पावसाचा तडाखा यामुळे खालचे धरणही फुटले... आता या पाण्याला वाट होती ती केवळ डेरनाकडे जाणारी.

डेरना किनाऱ्याजवळ आहे त्यामुळे पाणी सहजच तिथे आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आले की डेरनाकडे बुडून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

जवळपास 23फुटांच्या लाटा किंवा पाण्याचा प्रवाह आल्याची माहिती आहे.

डेरनामधील तीन पूलसुद्धा या पाण्याच्या हल्ल्यात तुटून पडले आहेत.

libya floods

डेरना बुडवण्यात पाण्याइतकाच वाटा तिथल्या राजकीय परिस्थितीचा आहे

गेली अनेक वर्ष लिबिया म्हणजे दहशतवादाचा अड्डा झालेला आहे. इथलं वातावरण अत्यंत गढूळ झालेलं आहे.

भौगोलिक वातावरण गढूळ आहेच पण सामाजिक आणि राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे.

मुळात पूर्व लिबिया आणि उरलेला भाग यांच्यात दोन सरकारं चालतात असं म्हटलं जातं.

पूर्वेला असलेल्या सरकारला रशियाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, पण जगाची मान्यता नाहीत. दुसरीकडे जे सरकार आहे ते यूएनने मान्यता दिलेलं पंतप्रधान अब्दुल हमीद डबेबा यांचं. या दोघांतील वाद आणि सत्तेच्या साठमारीत मरण इथल्या जनतेचं होत आहे.

Derna destroyed by flood

अगदी काहीच वर्षांपूर्वी म्हणजे १९६०च्या आसपास लिबियात मोठा तेलसाठा मिळाला आणि हा देश अचानक जगाच्या पटलावर चमकू लागला.

तेलाच्या जोरावर बरं चाललेलं असतानाच १९६९-७०च्या आसपास गद्दाफी राजवट आली. आधी इथे राजांचं राज्य होतं मग गद्दाफीच्या रुपात लोकशाहीतला राजा आला.

सुरूवातीला काही वर्ष बरी गेली आणि मग कोणत्याही हुकुमशहाचं होतं तेच झालं. गद्दाफीने दिलेली सगळी आश्वासनं, दिलासे खोटे पडू लागले.

आंतरराष्ट्रीय समुदायानेही लिबिया आणि गद्दाफींच्या अनेक धोरणांबद्दल नाराजी जाहीर केली. अनेक निर्बंध घातले गेले. २०११मध्ये गद्दाफीना ठार मारले गेले.

पण गद्दाफी बरे म्हणावे अशी परिस्थिती त्यानंतर आली.

कारण क्रांतीनंतर आलेल्या या अराजकतेने इस्लामिक कट्टरवाद्यांना लिबिया जणू आंदण मिळाल्यासारखं झालं. एकदा कट्टरतावाद्यांच्या हातात गेल्यानंतर लिबियाची धूळधाण उडणं साहजिक होतं.

आता लिबियात दोन सरकारं आहेत, पण खरोखरच लोकांना सुविधा देईल, चांगलं प्रशासन देईल, असं एकही नाही... अशी परिस्थिती आहे, त्यातच या आपत्तीमुळे लिबियाची अवस्था दारुण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT