Goa Assembly Election

बदलत्या गोव्याचा निर्णायक कौल

सकाळ वृत्तसेवा

मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात त्यांचे राजकारण नाकारीत वेगळ्याच व्यूहरचनेनिशी निवडणुकीला सामोरे गेलेल्या भारतीय जनता पक्षाचे अनपेक्षित यशाबद्दल अभिनंदन करावेच लागेल. अनेक राजकीय निरिक्षकांना या निकालाने बुचकळ्यात पाडलेले आहे. गेले वर्षभर स्थानिक वस्तुस्थिती समजून घेत भाजपच्या केंद्रीय आणि स्थानिक नेतृत्वाने निश्चित केलेली रणनीती, आवडलेला मतदार निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान मुक्त झाला. त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता कौल दिला.

प्रामुख्याने नावेली मतदारसंघाचा उल्लेख करावा लागेल, राज्यातले एक मोठे पॅरीश आणि मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या या मतदारसंघातून अन्य प्रभावी अल्पसंख्याक मतदारांतून वाट काढत भाजपचा उमेदवार विजयी झाला. यामागे थंड डोक्याने केलेली गणिते होती. त्याचे श्रेय निर्विवादपणे प्रदेशाध्यक्ष सदानंद सेठ तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, संघटनमंत्री सतीश धोंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांना द्यावेच लागेल. मनोहर पर्रीकरांसारखे करिश्मा असलेले नेतृत्व नाही, कोविडकालीन हाताळणीमुळे जनतेचा रोष पदरी आलेला, तीन समांतर प्रकल्पांच्या आग्रहामुळे सासष्टीतले लोकमत प्रतिकूल झालेले, लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांच्या बंडामुळे वातावरण कुलषित झालेले, संघाचा पाठिंबाही अनिश्चित झालेला इतकी सगळी प्रतिकूलता असताना संपादन केलेले हे यश आहे.

केंद्रीय नेतृत्वानेही भाजपच्या स्थानिकांना पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे पक्षाच्या प्रगतीवर लक्ष होतेच. पण नितीन गडकरींपासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आणि अनेक मतदारसंघाची जबाबदारी घेण्यासाठी अन्य राज्यांतून आलेल्या खासदार-आमदारांपर्यंत अनेकांचे योगदान हे माध्यमे आणि विचारवंतांच्याही लक्षात येणार नाही. भाजप ही आता केवळ एक राजकीय संघटना राहिलेली नसून ती विजय मिळवणारी यंत्रणा होते आहे. या निष्कर्षावर निकालाने शिक्कामोर्तब केले. भाजपने या विजयासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले. अन्य पक्षातील सक्षम नेत्यांना आणले, प्रसंगी त्यांच्यासाठी मातब्बर स्वपक्षीय नेत्यांनाही संधी नाकारली. एका बाजूने आपल्या मतदारसंघाबाहेर जात अन्य मतदारसंघावर प्रभाव पाडणारे विश्वजीत राणे, बाबुश मोन्सेरात आणि रोहन खंवटे अशा नेत्यांवर टाकलेला विश्वास तर दुसऱ्या बाजूने बहुजन समाजाचा टक्का मजबूत करण्यावर दिलेला भर ही दोन कारणेही भाजपच्या यशामागे आहेत. या पार्श्र्वभूमीवर कॉँग्रेसचे एकूणच अपयश डोळ्यात भरते. गोवा फॉरवर्डशी युती करण्याविषयीची चालढकल आणि नंतर युती करतानाही तीन जागांवर झालेली त्या प्रादेशिक पक्षाची बोळवण यांच्यामुळे किमान दोन मतदारसंघ काँग्रेसला गमवावे लागले. आंदोलने, चळवळी यातून पक्षाची पत वाढवायची असते याची जाणीव कॉँग्रेसला आम आदमी पक्षाने करून दिली. कॉँग्रेसच्या अपयशातून आपचे यश उमटले आहे. याची जाणीव यापुढे त्या राष्ट्रीय पक्षाला ठेवावी लागेल. इतके सगळे असले तरी भारतीय जनता पक्षाला धोक्याचा इशारा देणाराही हा निकाल आहे. पर्रीकरांमुळे भाजपकडे असलेला उच्चवर्णीय मतदार तर यावेळी पक्षापासून बहुतेक मतदारसंघात दूर गेली.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे आगमन ही मगो पक्ष व गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. मगोप किंगमेकर ठरेल, हा अंदाजही मतदाराने खोटा ठरवला. सुदिन ढवळीकर यांना चलनात राहाण्यासाठी आता भगीरथ प्रयत्न करावे लागतील. या निकालातून एक नवा गोवा आकार घेत असल्याची ही चिन्हे आहेत. प्रस्थापित चौकटीला आव्हान देणाऱ्या तरुण मतदारांचेही प्रस्थ वाढले. विशेष म्हणजे मतदानावेळी आमिषांचा विसर पडणाऱ्या मतदारांची संख्या निर्णायक ठरते आहे. गोवा कसा पालटतो आहे हे गोवा हे मुक्तीची साठ वर्षे साजरे करणाऱ्या या छोट्याशा भूमी विषयीचे खरे व निर्णायक सत्य आहे.

- राजू नायक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT