Mother Baby
Mother Baby esakal
health-fitness-wellness

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात; बालमानस शास्त्राची जाण नसल्यामुळं उद्भवू शकतात समस्या!

सकाळ डिजिटल टीम

लहान मुलांचा मेंदू ओल्या मातीसारखा किंवा कणकेसारखा बदलता असतो.

-डॉ. श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण (sajagclinic@gmail.com)

समुपदेशनासाठी पालक आपल्या पाल्याला घेऊन येतात तेव्हा लक्षात येते की, समस्या टाळण्याच्या अनेक संधी हुकलेल्या असतात. बालमानस शास्त्राची जाण नसल्यामुळे व मोठ्यांच्या अनावधानाने समस्या निर्माण झालेल्या असतात. पुढील आयुष्यात येऊ घातलेल्या समस्यांची चिन्हे बालवयात दिसू लागलेली असतात.

मात्र, ज्या वातावरणात बाळाची आई (Mother) वावरत असते तिथे प्रेम आधार असेल, तिचा आहार सकस असेल तर बाळाच्या मेंदूची वाढ परिपूर्ण होते. बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी, मूल गर्भात असताना माता काय खाते, पिते हे महत्त्वाचे असते. मेंदूच्या वाढीसाठी नऊ महिने गर्भातील वास्तव्य निर्धोक असणे गरजेचे असते. मुलाच्या मेंदूला इजा पोचणे या वयात धोकादायक असते. मातेला पुरेशी झोप, सकस आहार, व्यसन नसणे हे महत्त्वाचं.

मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य काहीअंशी त्यांच्या जन्माच्या आधीपासून निर्धारित होत असते. जे सुजाण पालक बाळाच्या जन्माचे नियोजन करून स्वतःची तयारी करून मुलाला जन्म देतात, त्यांच्यावर संस्कार करतात, त्यांची मुले शरीराने व मनाने जास्त सुदृढ असण्याची शक्यता असते. उलटपक्षी अनियोजित गर्भारपण, अभावात, हिंसेच्या छायेत, छळछावणीत, विस्थापित परिस्थितीत जन्माला आलेल्या मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात असण्याची शक्यता वाढते. व्यसनी व मानसिकरित्या अस्थिर मातांच्या मुलांना भावनिक व वर्तन समस्या असण्याची शक्यता जास्त असते.

जन्माला आल्यानंतर मेंदूच्या पेशी झपाट्याने एकमेकांशी बोलू लागतात. विविध अनुभव घेत स्पर्श, आवाज, वास अशा संवेदनाच्या आधारे मेंदूच्या पेशी संदेशवहन करून ज्ञानार्जनाचे काम सुरू करतात. या वयात मुलं अक्षरशः स्पंजासारखी माहितीसाठी हापापलेली असतात. या पहिल्या २ वर्षांतील अनुभव पुढील आयुष्याचा पाया ठरतात. माणसाच्या मेंदूची वाढ पहिल्या पाच वर्षांत ५० टक्के व उर्वरित ५० टक्के वाढ वयाच्या दहा ते बारा वर्षांपर्यंत होते. या वयात पोषक आहार, पुरेशी झोप, खेळ, जिज्ञासापूर्वक व सुरक्षित, प्रेमळ वातावरण मिळाल्यास मेंदूची वाढ निकोप होते. पुढल्या आयुष्यात आकार घेणाऱ्या व्यक्तित्त्वाची नांदी ठरते. लहान मुलांचा मेंदू ओल्या मातीसारखा किंवा कणकेसारखा बदलता असतो.

नव्या गोष्टीची सवय होणे, वेगळ्या वातावरणाशी जुळून घेणे या वयात सहज शक्य असते. जर विविध अनुभव देण्याची सुरुवात या वयात नाही तर मुलांना नंतर नवीन गोष्टींशी जुळवून घेणं जड जाते. या वयात प्रेमाचा स्पर्श, मोठ्यांच्या वागण्यात एकवाक्यता, अयोग्य वागण्यास विरोध केल्यास वर्तनसमस्या उद्भवत नाही. या कोवळ्या वयात विविध खाण्याच्या सवयी, भाषा, भावना, रंग, कला यांची समज वाढत जाते. घरात छोटे-मोठे वाद असले तरी सौम्य वातावरणात मुलांना त्याबद्दल समज देऊन सामावून घेतलं तर त्यांचे मानसिक स्थैर्य वाढते. चांगले अनुभव मिळाल्यास मुले इतरांवर विश्वास ठेवायला, प्रेम करायला शिकतात. त्याच्या उलट प्रेमहीन, अभावात, भीतीच्या छायेत वाढलेल्या मुलांमध्ये भावनिक समस्या जास्त प्रमाणात उद्भवतात.

जे मूल स्वतःकडे निकोपदृष्टीने पाहू शकते ते मूल नव्या उमेदीने जीवनाकडे बघायला लागते. मूल जन्माला येते तेव्हा ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. बाळ व मातेचा स्वभाव एकमेकांना पूरक असल्यास मातेला त्यास आधार देणे सुकर होते. त्याच्या विपरित जर मूल रडके, चिडके असल्यास आईच्या प्रयत्नांची पराकाष्टा होते. अशावेळी आईला योग्य तो आधार मिळणे गरजेचे असते अन्यथा ती त्या मुलाचा दुस्वास करू लागते व समस्या आणखीन बिकट होत जाते.

पाच वर्षांचा होईसतोवर मूल नाती समजू लागलेले असते. शाळेसाठी घरापासून, आईपासून दूर राहणे हे या वयातील नवीन आव्हान ठरते. शाळेचा वर्ग हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक असतो. इथे मुलाचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडणार असते. खेळायला, मैत्री करायला, इतरांशी जुळवून घ्यायला शिकते. घराबाहेर पडल्यावर कसं वागायचं, कुठे किती ताणायचे, कधी सोडून द्यायचं इत्यादी सॉफ्ट स्किल्स मुले या निमित्ताने शिकतात. एक चांगली शाळा, प्रेमळ शिक्षक व भरपूर मित्रमैत्रिणी भेटले तर सॉफ्ट स्किल्स त्यांना सहज शिकता येतात. आज काल समाज अभ्यासाचे भूत मुलांच्या मानगुटीवर बालवाडीतच चढवल्यामुळे मूल या महत्त्वाच्या सामाजिक कौशल्य शिकण्यात मागे पडते, तणावग्रस्त होते.

घोकंपट्टी आणि मार्कांच्या रेसमध्ये मुलं रेसचे घोडे बनत जातात. अनेक निरागस कळ्या उमलायच्या आधीच कॉमेजून जातात. मुलांच्या वाढीत त्रुटीमुळे, भावनिक गरजांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा लाडावल्यामुळे, अतिचंचलता, स्वमग्नता, हट्टीपणा, भित्रेपणा, एक्कलकोंडेपणा, नैराश्य अश्या वर्तणूक किंवा भावनिक समस्या दिसू लागतात. समस्या दिसल्या तरी घरातील मोठे एकमेकांवर दोषारोप करत राहतात आणि वेळीच निवारण शोधत नाही आणि समस्या आणखीन जटिल होत जाते. या समस्या टाळता येतात, लवकर ओळखता आणि सोडवताही येतात.

(लेखिका मनोविकारतज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT