How to fight a pregnant woman with corona 
health-fitness-wellness

कसा देताहेत गर्भवती महिला, प्रसूत माता कोरोनाशी लढा, जाणून घ्या... 

अतुल मांगे

नागपूर : 22 जुलै रोजी कोरोना वॉर्डातील गर्भवती स्त्रियांना सेवा देण्याची संधी मिळाली. स्त्री जेव्हा गर्भवती होते तेव्हा अख्ख कुटुंब तिच्याभोवती फिरत असते. तिचे खाणेपिणे, स्वच्छंद जगणे, मुक्तपणे हसणे, कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या व्यक्‍तीची ती सर्वात प्रिय, लाडकी आणि प्रायोरिटीवर असते. अशी फुलपाखराप्रमाणे, स्वच्छंदपणे जगणारी स्त्री जेव्हा कोरोना विषाणूने ग्रस्त होते तेव्हा काय? कल्पनासुद्धा करवत नाही. तिची अख्खी मानसिक स्थिती ढासळते, कुटुंब हादरते. महानगरपालिकेत कळविले जाते आणि फुलपाखराप्रमाणे उडणारे तिचे मन बंद होते कोरोना वॉर्डात. पुढे... 

माझ्या बाळाला कोरोना तर होणार नाही ना? 


नऊ महिन्यांच्या गर्भवती मातेला तपासले. काही त्रास आहे का विचारले, उत्तर नेहमी एकच राहायचे मॅडम माझ्या बाळाला कोरोना तर होणार नाही ना? तीस खाटांच्या त्या वॉर्डात स्वतःच्या बेडवर बंदिस्त राहून तोंडाला मास्क लावलेली ती स्त्री माझ्यापेक्षाही निडर मला जाणवत होती. लक्षणे काहीच नाही, फक्त मनात एकच विचार "त्याला काही होणार तर नाही'. गर्भवती महिला पुढे असेही सांगतात, "डॉक्‍टर साहेब मी पोटातील बाळाला रोज समजवते, तुला बाहेर यायचे नाही आता. तुझ्या आईला कोरोना आहे. वाट बघ जरा. पंधरा दिवसांनी ये', गर्भवतींचे हे धाडसी शब्द प्रत्येकाला जगण्याचे बळ देऊन जातात. 

'वह खुदके हातो से खा नही पायेंगी डॉक्‍टर, मुझे जाने दो...'

 
दुसऱ्या महिला रुग्णाचे दिवस भरायला फक्त पाच दिवस राहिलेत. पती कोरोना पॉझिटिव्ह म्हणून तिची टेस्ट करण्यात आली. तीसुद्धा पॉझिटिव्ह. लागलीच तिला कोरोना वॉर्डात भरती करण्यता आले. दोन दिवस अतिशय आत्मविश्वासाने वावरली आणि तो ढासळला एका बातमीने. रात्री एक वाजता मला फोन आला पेशंट अतिशय अस्वस्थ आणि सतत रडत आहे. तिला तपासल्यावर सारेकाही ठीक जाणवले. नंतर कळलं तिचे चार वर्षांचे पहिले मूल आज कोरोना पॉझिटिव्ह निघाले. ही पेशंट गर्भवतींच्या बोर्डात आणि तिचे चार वर्षांचे मूल दुसऱ्या वॉर्डात. काय अवस्था होत असेल एका आईची! अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग. "वह खुदके हातो से खा नही पायेंगी. मुझे उसके पास जाने दो डॉक्‍टर साहेब. उसको और मुझे अलग अलग वॉर्ड मे मत रखो. उसको मैं चाहिये मैं.' 

प्रसूत मातेच्या जीवाची घालमेल 


आपल्या संस्कृतीत प्रसूत मातेची विशेष काळजी घेतली जाते. घरातील सर्वात मोठी, प्रगल्भ विचार असलेली स्त्री तिची काळजी घेत असते. तिने काय खावे, काय प्यावे, तिचा स्वयंपाक वेगळा व अधिक प्रथिनेयुक्त. सिजर झालेले असल्यास 24 तास एक जबाबदार स्त्री त्या प्रसूत मातेजवळ असते, नवराही असतोच. सिजर झालेल्या मातेला कड बदलताना, उठताना सतत आधाराची गरज असते. हातात मायेने पाण्याचा ग्लास देणारी आई असते, सासू असते, प्रेमाने दोन घास भरणारा नवरा वॉर्डात असतो. नुकतेच आई-वडील झालेल्या दोघांच्या हातात गोंडस बाळ असते आणि असा तो सेल्फी असतो. काय अवस्था असेल त्या स्त्रीची जेव्हा आयुष्यातला सर्वात आनंदी क्षण कोरोनाच्या विळख्याने ग्रासलेला असेल. या क्षणांना ती मुकलेली असते. 
कोरोनाग्रस्त असल्याने तिचे नवजात बाळ तिच्यापासून दूर असते. तिचे कुटुंबीय तिच्या जवळ नसते. डॉक्‍टर, नर्सेस सगळे पांढरा पोशाख वरपासून खालपर्यंत घातलेले येतात काळजी घेतात. तिला काही त्रास आहे का बघतात. गोळ्या, इंजेक्‍शन सगळे देतात. सारेकाही असूनही त्या प्रसूत मातेला जी पोकळी मनात वाटते त्याचे काय? 

पती, कुटुंबीयांची प्रचंड ओढाताण 


कोरोनाचा काळ नसताना एखाद्या स्त्रीचे सिजर झाल्यानंतर बाळ आईच्या दूर असते. पण, किमान त्या बाळाला त्याचे कुटुंबीय, त्याचे वडील काचेतून तरी बघू शकतात, पण या कोरोनाच्या काळात सगळ्यांनाच एकमेकांपासून दूर राहावे लागते. आपले दोन जीव कोरोना वॉर्डात अडकलेले पाहून त्या पतीची व भावी पित्याची काय ओढाताण होत असेल हे शब्दात सांगता येत नाही. जो डॉक्‍टर दिसेल त्याला पत्नी आणि बाळाबद्दल विचारणा करायची, असेच कावरेबावरे होतात ते. 

तहान, भूक विसरून डॉक्‍टरांचे प्रयत्न 


या सर्वांना मानसिक आधार देण्याचा मी आणि माझ्या टीमने भरपूर प्रयत्न केला. परंतु, त्यांची अस्वस्थता पाहून आणि त्यांच्या मनात निर्माण झालेली ती पोकळी आम्हालाही हळवं करत होती. पण कर्तव्यापुढे आम्ही हतबल होतो. मी आणि माझे तीन सहकारी रेसिडेंट. गेल्या सहा महिन्यांपासून ते तिघे घरी गेलेले नाहीत. चोवीस, पंचवीस वर्षांची ही मुले कर्तव्यापोटी सतत कोरोना वॉर्डात असायचे. पेशंटच्या बारीकसारीख तक्रारीचे निवारण करणे, त्यांचे कौन्सिलिंग, त्यांना धीर द्यायचे. सहकारी डॉक्‍टरांचे आई-वडील काळजीपोटी अस्वस्थ राहायचे. 

कुटुंब आणि कर्तव्य दोन्हीही... 

कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती स्त्रियांचे सिजर किंवा नॉर्मल डिलिव्हरीसाठी रात्री-अपरात्री मी ऑपरेशन थिएटरमध्ये असायची. कोरोना वॉर्डात ड्युटी आणि त्यानंतर विलगीकरण, असे सलग पंधरा दिवस मी माझी दोन्ही मुले, नवरा, सासू-सासरे यांच्यापासून दुसरीकडे हॉटेलमध्ये राहात होते. रात्री-अपरात्री ऑपरेशन करून जोपर्यंत मी हॉटेलपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत माझे पती डॉक्‍टर समीर गोलावार माझ्यासाठी रात्री तीन तर कधी पहाटे पहाटे चारपर्यंत जागेच राहायचे. माझ्या मुलांनी हट्ट न करता मला भरपूर साथ दिली. माझ्या आई-वडिलांचा, सासू-सासऱ्यांचा मला नेहमीच आशीर्वाद आहे. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहून देवा या सर्व वेढ्यातून आम्हाला काढ, अशी एकच मागणी करावीशी वाटते. 

डॉ. कांचन समीर गोलावार 

(शब्दांकन : अतुल मांगे)  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT