Oral Health Tips: कोविड संसर्गाच्या काळात मुखाच्या आरोग्याशी संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांचा व्यवसाय धोकादायक ठरला होता. दंतचिकित्सक कोविड रुग्णाच्या सर्वात जास्त संपर्कात येत असल्याने त्यांना संसर्गाचा मोठा धोका होता. कोविडच्या लाटेत मुख आणि दातांच्या समस्या वाढल्याचे निरीक्षण नायर रुग्णालय दंतचिकित्सा महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि दंतचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. कुलविंदर सिंग बांगा यांनी नोंदविले आहे. कुठल्याही प्रकारचा संसर्ग दूर ठेवायचा असेल तर दात आणि जिभेची नियमित स्वच्छता अन् तपासणी हवीच, असे ते सांगतात.
कोरोनाचे संकट सध्या नियंत्रणात आले असले तरी आरोग्याची काळजी सातत्याने घेणे किती आवश्यक आहे हे या महामारीने जगाला शिकवले. निरोगी आयुष्यासाठी (Health) स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कोरोना संसर्गाचा आजार आहे आणि त्याचे विषाणू नाका-तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे मुख आरोग्याची (Oral Health) काळजी घ्यायलाच हवी. तोंडाची स्वच्छता मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेची आहे. (Oral health should also be strong! )
तोंडातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यासाठी आणि तोंडातून उर्वरित शरीरात जीवाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी स्वच्छता फारच आवश्यक असते. कोरोनाने (Corona) नकारात्मक परिणाम केला. त्यामुळे तोंडाचे विकार होण्याची शक्यता वाढली. कोरोनाच्या संकटकाळात दंत आरोग्य क्लिनिक बंद झाले. काही जणांनी त्यांचा वेळ कमी केला. अत्यंत निकडीच्या वेळेसच त्या उघडल्या गेल्या. साहजिकच दातांची नियमित काळजी किंवा प्रतिबंधात्मक उपचार बंद झाले होते. तेव्हा अशी स्वच्छताच महत्त्वाची ठरली.
मुख स्वच्छता नसेल तर कोविडचा धोका वाढतो का? अशा प्रश्नाचे उत्तर ‘होय'' असे द्यावे लागेल. कोरोनाचे विषाणू नाक आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. ते शरीरात चिकटून राहतात आणि नंतर सशक्त पेशींवर हल्ला चढवतात. त्यामुळे घसा खवखवायला लागतो. नाक, नाकाचा मागचा भाग आणि घसा हे कोरोना विषाणूचे ग्रहणकर्ते आहेत. त्यांना एसीई २ (ACE२) रिसेप्टर्स म्हटले जाते. हे विषाणूसाठी एका जलाशयाचे काम करतात.
टूथब्रश स्वच्छ आणि निर्जंतुक करा-
अनेक जणांना ही जाणीवच नसते की त्यांच्या टूथब्रशवर जीवाणू, रक्त आणि लाळ असते. अयोग्य-अस्वच्छ ब्रशमुळे स्वच्छतेच्या समस्या उद्भवतातच, पण कोरोनासारखे आजारसुद्धा होऊ शकतात. कोविडचा विषाणू कोणत्याही पृष्ठभागावर तीन दिवसांपर्यंत राहू शकतो. अगदी ब्रशवरसुद्धा. त्यामुळे वापरण्याआधी ब्रश नीट धुतला आहे की नाही याची खात्री करा. ब्रश करण्यापूर्वी आणि केल्यानंतर ३० सेकंदांपर्यंत हात नीट धुवा. ज्यामुळे कुठल्याही जीवाणूला प्रतिबंध घातला जाईल. वापरल्यानंतर ब्रश कोरडा होईल असाच ठेवावा. त्यामुळे जीवाणूचा प्रसार आणि वाढीस आळा बसेल.
घरच्या घरी मुख स्वच्छतेची काळजी-
दातांतील फटी, हिरड्यांचे आजार आणि इतर गोष्टी टाळण्यासाठी तोंडाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. कुठलाही संसर्ग टाळण्यासाठी तोंड आणि दातांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
अशी घ्या काळजी-
अँटीसेप्टिक माऊथवॉशचा वापर किंवा कोमट पाण्याने गुळण्या केल्यामुळे तोंडातील जीवजंतू नष्ट होतील.
टंग क्लीनरने जीभ स्वच्छ करावी. कारण जिभेवरसुद्धा जीवाणूंची वाढ होते.
घातक रोग टाळण्यासाठी दिवसातून एकदा दातांना फ्लॉसच्या साह्याने स्वच्छ करा.
हिरड्यांतील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचा मसाज आवश्यक आहे.
दातांवर उपचार करून घेण्याआधी कोविड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. दंत रुग्णांनी क्लिनिकमध्ये मास्क घालणे आवश्यक आहे.
इम्प्लांट ट्रिटमेंट, प्रोस्थेटिक ट्रिटमेंट किंवा रिप्लेसमेंट ट्रिटमेंट शक्यतोवर पुढे ढकलावी.
हे नियमित करा
नियमित स्वच्छता तोंडाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आजारमुक्त राहण्यासाठी आवश्यक आहे. दात आणि जिभेची रोज स्वच्छता हा त्यासाठीचा सोपा उपाय आहे. दिवसातून दोन वेळा तरी हे केले पाहिजे. अँटिसेप्टिक माऊथ वॉशच्या साह्याने मुखशुद्धी करणे फायदेशीर ठरेल. रोज पुरेसे पाणी पिणे हे लाळेच्या निर्मितीसाठी फायद्याचे आहे. त्यामुळे अनेक रोगजंतूंना अटकाव होऊ शकतो. दंतरोग तज्ज्ञांकडून नियमित तपासणी अतिशय आवश्यक आहे. तोंडासंबंधीच्या कुठल्याही आजारावर वेळेतच उपचार करून घ्यावेत, जेणेकरून धोकादायक जीवाणूंची वाढ टाळता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.