precautions to be taken during rainy season
precautions to be taken during rainy season 
health-fitness-wellness

पावसाळा या ऋतूला आहे जीवघेण्या आजारांचा शाप ! पण 'ही' काळजी घेऊन पावसाळा करा सुसह्य...

सकाळवृत्तसेवा

पावसाला सुरुवात झाली, की वातावरणातला बदल मे महिन्यातील रखरखाटाने त्रस्त झालेल्या प्रत्येकालाच सुखावतो; पण हा बदल किती काळ सुखावणारा राहणार हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून असते. कारण पावसाळा सुरू झाला, की चाहूल लागते ती त्याच्या जोडीने अवतरणाऱ्या अनाहूत पाहुण्यांची. हे पाहुणे असतात पावसाळ्यातील आजार. सर्दी, पडसे, ताप, खोकला, आमांश यासारख्या छोट्या छोट्या आणि किरकोळ वाटणाऱ्या आजारांसोबत कावीळ, मलेरिया, न्यूमोनिया, लेप्टो आदी. 'दादा' आजारही दर पावसाळ्यात हमखास उपस्थिती लावतात आणि या छान पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्यापासून आपल्याला वंचित राहावे लागते.

या आजारांचा प्रादुर्भाव

पावसाला सुरुवात झाली, की विविध आजारांच्या साथी फैलावतात. दवाखान्यात, रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढू लागते आणि शाळा कार्यालयांतील ('सीक लीव्ह'मुळे) अनुपस्थिती! वर्षाच्या सर्वात प्रसन्न, तजेलदार आणि हिरव्यागार ऋतूला या जीवघेण्या आजारांचा शाप कोणी दिला आहे कोण जाणे! पण त्यामुळे सोसावा लागणारा त्रास मात्र प्रत्येकाच्याच अनुभवाचा आहे. त्यामुळेच अनेकांना पावसाळा म्हणजे नसती कटकट वाटते.
पावसाळ्यातील दमट, ऊबदार वातावरण आणि ओलावा ही परिस्थिती बहुतेक सर्वच प्रकारच्या रोगजंतूंची पैदास वाढण्यास अनुकूल असते. पावसाच्या पहिल्या सरीसह सुरुवात होते ती सर्दी, पडसे, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, आमांश आदींची. किरकोळ आजार समजून अनेकदा त्याकडे दुर्लक्षही केले जाते, पण मुळात हे आजार नसून मोठ्या आजारांची प्राथमिक लक्षणे असतात. त्यांच्याकडे एकदा का दुर्लक्ष झाले अथवा योग्य उपचार वेळेवर झाले नाहीत, की मग मोठ्या स्वरूपाचे आजार हळूहळू आपले रागरंग दाखवायला सुरुवात करतात. पावसाळ्यात प्रामुख्याने हिवताप (मलेरिया), डेंग्यू, कावीळ, चिकनगुण्या, विषमज्वर, कॉलरा, हिपॅटायटीस 'ए', अतिसार या आजारांचा प्रादुर्भाव होतो.

दूषित पाण्यामुळे संक्रमण

या काळात सदर साथीच्या आजारांच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळते. या रोगांच्या संक्रमणामागची आणि प्रसारामागे महत्त्वाचे कारण एकच असते, ते म्हणजे पावसाळा. पावसाळ्यामुळे बदललेल्या वातावरणाबरोबरच पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे फैलावलेली अस्वच्छता, प्रदूषण आणि आजारांविषयीच्या जागृतीचा अभाव, या बाबीही त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. दूषित पाण्यामुळे संक्रमित होणाऱ्या रोगांचे प्रमाण या ऋतूत मोठे असते. तसेच डासांच्या वाढीस हे वातावरण अनुकूल असल्याने त्याद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारांचा धोकाही अधिकच वाढतो. पावसाळ्यात 10 पैकी चारपाच जण साथीच्या आजारांनी ग्रस्त असल्याचे प्रशासकीय व खासगी रुग्णालयातील नोंदींवरून लक्षात येते.

साथीच्या आजारांबरोबरच दूषित पाण्याच्या संपर्कामुळे त्वचारोग होण्याची भीतीही असते. अर्थातच मुंबईसारख्या शहरामध्ये दूषित पाण्यातून प्रवास करण्याशिवाय नोकरदार, विद्यार्थी अथवा अन्य सामान्य नागरिकांना पर्याय नसतो. त्यामुळे खास करून पायांची काळजी घेण्याच्या दृष्टीने योग्य पादत्राणे तसेच पावसाळ्यासाठी अनुकूल कपडे परिधान करणे आवश्‍यक असते. लेप्टोसारख्या प्राणघातक रोगाचा प्रादुर्भावही दूषित पाण्याच्या संपर्कामुळे होतो.

दम्यासारखे श्‍वसनविकार बळावतात

जमिनीवर पावसाचे थेंब पडण्यापूर्वी ते शरीरावर झेलण्याची मजा प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेली असते, पण पावसाचे हे पाणी पूर्णपणे शुद्ध व निर्दोष असते हा एक मोठा गैरसमज आहे. पृथ्वीवरील जलसाठ्यांमधील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते व त्या वाफेचे ढगात रूपांतर होते. जलचक्रातील हा टप्पा सर्वांनाच परिचयाचा आहे, पण सध्या वातावरणातील प्रदूषण इतके वाढले आहे, की पावसाच्या ढगांबरोबरच वातावरणातील हे घातक घटक हवेच्या खालच्या आवरणात साचतात व पावसाच्या पाण्यात मिसळतात. त्यामुळेच या मोसमात दम्यासारखे श्‍वसनविकार बळावतात.

प्रतिबंध हाच उपाय

आजार, मग तो कोणत्याही ऋतूत होणारा असो, त्यावर प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय असतो. सध्या हिपॅटायटससारख्या काही आजारांवर प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. मलेरिया, डेंगी, लेप्टोस्पायरोसिस आदी आजारांच्या निदानचाचण्या विज्ञान-तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनाच्या योगे अधिक सुलभ झाल्या आहेत.

रोगप्रतिकार शक्ती वाढविली पाहिजे

औषधे आणि लसीकरणाच्या जोडीने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे अधिक आवश्‍यक असते; कारण जेवढी रोगप्रतिकार शक्ती जास्त, तेवढाच आजाराचा धोका कमी. प्रामुख्याने साथीच्या आजारांची लागण होऊ नये यासाठी योग्य, सकस आहार आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने रोगप्रतिकार शक्ती वाढविली पाहिजे. आजारी पडल्यानंतर इलाज करून बरं होता येईल, पण त्यातून येणाऱ्या अशक्तपणामुळे शरीर अन्य आजारांना निमंत्रण देऊ शकते, त्यामुळे पावसाळ्याचा आनंद तर घेता येणार नाही, उलट दरवर्षी "नको तो पावसाळा' असे पालुपद आळवत बसावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT