बदलती जीवनशैली आणि राहणीमान यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे सध्याच्या काळात अनेक जणांना विविध आजारांनी त्रस्त आहेत. यामध्येच गेल्या काही काळात कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. साधारणपणे, ब्रेस्ट कॅन्सर, फुफ्फुसाचा कर्करोग, ब्रेन ट्युमर असे कर्करोगाचे अनेक प्रकार आपण ऐकले आहेत. मात्र, मूत्रपिंडाच्या कर्करोगाविषयी फार कमी जणांना माहित आहे. मूत्रपिंडाचा कर्करोग (किडनी कॅन्सर) हा संथगतीने वाढतो. हा आजार कधीही आणि कोणालाही होऊ शकतो. सध्या अनेक रूग्ण मूत्रपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. या आजाराची सहसा कुठलीही लक्षणं पटकन दिसून येत नसल्याने या आजाराचे निदान करणं खूपच अवघड असते. याकरता मूत्रपिंडाचा कर्करोगाबद्दल पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे. जेणेकरून आजाराचे वेळीच निदान झाल्यास उपचार करणं सहज सोपं होत. त्यामुळे मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती ती पाहुयात.
रिनल सेल कॅन्सर – मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. परंतु, यातील बहुतेकांना मूत्रपिंडातील पेशींचा कर्करोग (रिनल सेल कॅन्सर) असतो. मूत्रपिंडातच या कर्करोगाची वाढ होते. कर्करोगाची वाढ होत त्याची मूत्रपिंडातच गाठ तयार होते. गाठ मोठी झाल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होऊन त्याचाही आकार वाढू शकतो. मूत्रपिंडाच्या बाहेर पडून आजूबाजूचे स्नायू, मणका, यकृत आणि रक्तवाहिन्यांमध्येही तो प्रवेश करू शकतो. जवळच्या लसिकांमध्ये प्रवेश केल्यास हा कर्करोग शरीरभर पसरून इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. प्राथमिक अवस्थेत या गाठीचे निदान झाल्यास उपचार करणं सोपं होतं.
धुम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा सर्वांधिक असतो. परंतु, त्याचप्रमाणे धुम्रपानाच्या सेवनामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो. याशिवाय धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्यास निरोगी व्यक्तीलाही कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. मूत्रपिंडाचा कर्करोग हा महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये जास्त आढळून येतो. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा एखाद्याच्या कुटुंबामध्ये मूत्रपिंडासंदर्भात आजारांचा इतिहास असेल, तर त्यांच्यामध्ये मूत्रपिंडविषयक आजारांचा धोका अधिक संभवतो. म्हणून आपल्या मूत्रपिंडाचे आरोग्य कायम चांगले ठेवण्याचे प्रयत्न करावे.
मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे –
• भूक कमी होणे
• लघवीतून रक्त जाणे
• वजनात घट होणं
• थकवा आणि अशक्तपणा जाणवणं
• गुडघे आणि पायाला सूज येणे
• पाठीत किंवा कमरेजवळ वेदना
• श्वास घेण्यास अडचणी जाणवणे
अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी लघवी आणि रक्त तपासणी करावी लागते. याशिवाय अल्ट्रासाऊंड, एमआरआय आणि सीटी स्कॅनद्वारे कर्करोगाचे निदान केले जाते. अनेकदा कर्करोगाचे निदान करण्यासाठी बायोप्सी देखील केली जाते. या व्यतिरिक्त कर्करोगाचा प्रसार शरीरातील अन्य भागात झालेला आहे की नाही, हे तपासून पाहण्यासाठी पेट स्कॅन आणि हाडांचे स्कॅनिंग केले जाते.
उपचार –
मूत्रपिंडाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया हा उत्तम पर्य़ाय आहे. परंतु, कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे रूग्ण पटकन बर होऊ शकतो. मात्र, बऱ्याचदा रूग्णांच्या वैद्यकीय स्थितीनुसार काय उपचार द्यायचे हे डॉक्टर ठरवतात. कधी गाठ काढून टाकली जाते. तर कधी किडनीच काढून कर्करोगातून रूग्णांची सुटका केली जाते. याशिवाय, तोंडावाटे औषधोपचार आणि इम्युनोथेरपीही रूग्णांना देण्यात येत आहे.
इम्यूनोथेरपी औषधे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीची आणि शरीराच्या इतर भागापर्यंत त्यांची काळजी घेते. त्यांचे साइड इफेक्ट्स पूर्णपणे भिन्न आहेत. म्हणूनच हे उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या ऑन्कोलॉजिस्टशी चर्चा करणं गरजेचं आहे. जेणेकरून उपचार दरम्यान होणारे साइड इफेक्टस कमी करता येऊ शकतात. याशिवाय कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण लवकर बरा होऊ शकतो.
दरम्यान, मानवी शरीरात किडनी हा महत्त्वाचा अवयव आहे. किडनी शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्याचं कार्य करते. या व्यतिरिक्त किडनी शरीरातील पाण्याचे नियंत्रण, आम्ल आणि क्षारांचे संतुलन, संप्रेरकाची निर्मिती, रक्तदाब नियंत्रण, हाडांचे आरोग्य अशी अनेक कार्ये पार पाडत असते. म्हणूनच आपल्या शरीरामध्ये मूत्रपिंडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या मोठ्या आजारांपासून दूर राहायचे असेल, तर मूत्रपिंडाची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु, ती नीट न घेतल्यास संपूर्ण शरीरावर आणि जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
(लेखक डॉ. भरत भोसले हे बॉम्बे आणि हॉली स्पिरीट हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.