कोकणात किंवा गोव्यात जेव्हा जेव्हा माझे सुट्टीसाठी जाणे होते तेव्हा मुख्य छंद म्हणजे काही औषधी वनस्पती दिसतात का ते पाहणे व दुसरा छंद म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर वाळूत फिरणे. वाळूतून चालताना एक गंमतीदार खेळ नेहमीच खेळता येतो. आणि हा खेळ असतो वाळूत धावणाऱ्या खेकड्याबरोबर !
खेकडे मोठे मजेशीर असतात. त्यांना जरा चाहूल लागली की सैरभैर पळत सुटतात. त्यांच्या मागे जाण्याचा, अडवण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न जरूर करून पाहावा. ते डाव्या बाजूला जातील असे वाटले व आपण मोर्चा तिकडे वळवला की ते झटकन उजव्या बाजूला जातील व आपण उजव्या बाजूला जाण्याचा विचार करण्यापूर्वी ते काही कारण नसताना पुन्हा दिशा बदलून भलतीकडेच धावत सुटतील. त्यांचे चालणे मोठे गंमतीदार असते.
त्यांचा संबंध पृथ्वीतत्त्वाशी असून त्यांचे पाय टेकतात की ते आकाशतत्त्वाशी संबंध ठेवून जमिनीपासून वर तरंगतात हेच कळू शकत नाही. एका बाजूने पृथ्वीतत्त्वाशी संबंध म्हणावा तर आकारमानाच्या तुलनेत त्यांचे वजन अगदी कमी असते आणि आकाशतत्त्वाशी संबंध म्हणावा तर ते जमिनीत गडप होतात. त्यांचे मूळ घर कुठे हे कधीच लक्षात येत नाही.
संकट आले की ते मूळ घराकडे न पळता दुसरीकडेच कुठेतरी जेथे चान्स मिळेल तेथे आत गडप होतात आणि सगळं शांत व स्थिरस्थावर झाले असे वाटतंय तोच पुन्हा प्रकट होतात. रात्रीच्या वेळी मशाल पेटवून उभे राहिले तर तिकडे त्यांना आकर्षित करता येते कारण उष्णतेकडे, उजेडाकडे त्यांना आकर्षण असते. पावसाळ्याबरोबर हवेत गारवा, वातवृद्धी होऊन एकूणच वातावरणातील शक्ति कमी झाली की खेकडे अचानक बाहेर येतात.
मध्यंतरीचे आठ महिने ते कोठे गडप होतात हेच कळत नाही. पृथ्वीतून निर्माण होणाऱ्या हिरव्यागार नवीन फुटणाऱ्या अंकुरांचे, झाडपाल्याचे, अन्नधान्याचे म्हणजे जीवनाचा मुख्य आधार असणाऱ्या वनस्पतींचे हे शत्रू! लक्ष ठेवले नाही तर ते सगळं गट्ट करून टाकतील आणि कितीही लक्ष ठेवले तरीही यांचा पूर्ण नायनाट करणे अशक्यच ! हे वर्णन खेकड्याचे आहे की सध्या आधुनिक युगात वाढत असलेल्या ‘कॅन्सर – कर्करोग’ या रोगाचे आहे हे ठरवणे अवघड जाईल.
कॅन्सर या रोगासाठी काय चपखल नाव शोधलेले आहे! शरीराशी जरा थोडीशी अनैसर्गिक वागणूक केली किंवा रोगप्रतिकारशक्ति कमी झाली की कॅन्सर हा रोग प्रकट होतो. कुठेही, कधीही, कारण नसताना, कुठलेही लक्षण दिसत नसताना कॅन्सर अचानक प्रकट होतो, कसाही धावतो, पसरतो, निराकरणाचा केलेला प्रयत्न सफळ होतोच असे नाही व तो सफळ झालाच तर पुन्हा काही दिवसांनी कुठेतरीच तो प्रकट होतो.
गाठ होणे, आग होणे, दुःख-पीडा करणे आणि पसरण्यासाठी संपर्क किंवा तर्कसंगती न ठेवता कोठेही पसरणे असा हा कफ-पित्त-वात असा त्रिदोष असंतुलन असणारा व आकाशतत्त्वप्रधान असणारा हा रोग बऱ्याच वेळा रोगाचे कारण आनुवंशिकता किंवा मागच्या जन्मात असण्याचा संभव वाढवतो.
आयुर्वेदात रोगाचे कारण ‘प्रज्ञापराध’ म्हणजेच ‘आत्मप्रतारणा’ असे म्हटलेले आहे. ही आत्मप्रतारणा केवळ वागणुकीसंबंधित किंवा मानसिक एवढीच नसून, प्रत्येक व्यक्तीसाठी असलेल्या नियोजित कार्यसंकल्पनेत ढवळाढवळ, हाही असू शकतो. म्हणजेच प्रत्येक जिवाचा एक कार्यक्रम (प्रोग्रॅम) ठरलेला असतो व तो गुणसूत्रांमध्ये बांधलेला असतो.
चुकीच्या आहारविहारामुळे आणि विशेषतः चुकीच्या प्राण्यांचे मांस सेवन केल्यामुळे मोठा प्रज्ञापराध घडत असावा. कॅन्सर म्हणजे कर्करोग का व कसा होतो आणि त्याच्यावरचा पक्का इलाज याचे संशोधन आजमितीपर्यंत चालूच आहे.
आधुनिक वैद्यकात शल्यक्रिया, अग्निकर्म व किरणोत्सर्ग (रेडिएशन), केमोथेरपी वगैरे इलाज केले जातात. आयुर्वेदात गुळवेल सत्व, अश्र्वगंधा, शतावरी, गोक्षुर, सुवर्णभस्म, हीरकभस्म यांचा चांगला उपयोग होताना दिसतो. त्याचबरोबर प्रवाळ, मोती, मंडूर, सुवर्णमाक्षिक व पचनास सोपी व ताकद वाढवणारी ‘रसायने’ उपयोगी पडतात. आहारातून जडान्न, वातूळ पदार्थ, तेल व तळलेले पदार्थ, मांसाहार वर्ज्य करण्याने कॅन्सरवर मात करणे सोपे होते.
त्वचेचे, स्तनाचे वगैरे कॅन्सर सहसा बरे होऊ शकतात आणि जे असाध्य आहेत त्यांना पण काबूत ठेवता येते. आधुनिक उपचार पद्धतीबरोबर आयुर्वेदिक इलाज केला असता बरे होण्याची शक्यता खूप वाढते. आयुर्वेदिक उपचारांमुळे रोग पसरू न देणे, काही काळापर्यंत तरी रोगाला मागे परतवून आयुर्मर्यादा वाढवणे, रोग्याला रोगाचा त्रास होऊ न देणे, कॅन्सरवर केलेल्या थेरपी व रेडिएशनमुळे होणारे वाईट परिणाम कमी करणे हे नक्कीच साध्य झालेले आहे.
मुख्य म्हणजे गर्भाशयातील प्रत्येक गाठ किंवा इतर गाठी कॅन्सरच्याच असतीलच असे मुळीच नाही. तेव्हा एकदम घाबरून जाऊन, पुढे धोका नको म्हणून गर्भाशय काढून टाकणे अजिबात योग्य नाही. आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे रक्ताची तपासणी करून कॅन्सरची शक्यता वर्तवता येणे शक्य असले तरी इतर अंदाज हे अंदाजच आहेत. कॅन्सर कसा होतो; एकदा इलाज केल्यावर पुन्हा त्याचा प्रादुर्भाव, तोही शरीरात दुसऱ्याच ठिकाणी, कसा होतो; हे एक गूढच आहे.
तेव्हा बऱ्याच वेळा साप सोडून भुईला धोपटण्यासारखे पण होऊ शकते. तेव्हा एकंदरीत भलत्याच शक्यता मनात बाळगून घाबरून जाऊ नये. कॅन्सरमुळे शरीरात होणारी आग आणि दुःख तसेच कॅन्सरवर केमोथेरपी सारखा इलाज केल्यानंतर शरीरावर होणारे दुष्परिणाम नक्कीच दूर ठेवता येतात. बऱ्याच वेळी चिंतेमुळे छोटासा रोग चितेपर्यंत पोचवतो. तेव्हा मनात भीती ठेवू नये.
कॅन्सर किंवा कर्करोग आणि खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्रातील कर्करास ह्यांचे नामसाधर्म्य उगाच नसावे. कर्कराशीच्या स्वामीचे म्हणजे चंद्राचे मनाशी संबंध सर्वपरिचित आहेत. मनाच्या सकारात्मक बदलाने, जीवन व जीवित कार्यावरील श्रद्धेने म्हणजेच मनात बदल घडवून व मानसिक शक्तीने कॅन्सरवर मात करता येईल असा विश्र्वास संशोधकांना वाटत आहे.
पंचकर्माद्वारे शरीरशुद्धीबरोबर मानसिक बदल व आत्मविश्र्वास वाढवण्याने व ग्रहचिकित्सेप्रमाणे आधिदैविक पद्धतीतील धूप, ध्यान, संगीत वगैरे उपचाराद्वारे कॅन्सर या रोगात बराच फायदा होतो हा आजवरचा उनुभव आहे.
(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.