sneeze
sneeze sakal
आरोग्य

शिंकू की नको?

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मालविका तांबे

गेले ३-४ महिने सगळीकडे सर्दी-खोकला यांनी धुमाकूळ घातला आहे. कोविड गेल्यानंतर लोकांनी जरा सुटकेचा श्र्वास घेतला होता. आताचा त्रास बॅक्टेरियल आहे की व्हायरल आहे, याचे रूपांतर न्यूमोनियात तर होणार नाही ना, अशा प्रकारच्या नाना शंका लोकांच्या मनात येतात. बाहेर गेल्यावर आपल्या बाजूचे कोणी शिंकले तर मात्र ताण-तणाव अजूनच वाढतो.

शिंका केवळ रोगामुळेच येतात असे नाही. आपल्या नाकामार्फत हवा, जीव-जंतू शरीराच्या आत-बाहेर करत असतात. शरीराच्या तापमानाच्या नियंत्रणासाठीही नाक व नाकाच्या आत असलेल्या पोकळ्या (सायनसेस्) महत्त्वाचे असतात. शरीरात जाणारी धूळ, अनावश्यक जीवजंतू वगैरे शरीराला नको असणारे घटक जेव्हा नाकामार्फत आत जाऊ लागतात तेव्हा शिंक येके.

शिंकेतून बाहेर पडणाऱ्या वायूचा वेग १५० किमी. प्रति तास असू शकतो. याला स्पीड लिमिट नसते. यात हवा, थुंकी, धुळीचे कण, जीव-जंतू हे स्प्रेसारखे बाहेर पसरतात. शिंक ही शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स ॲक्शन) असल्यामुळे यावर आपले नियंत्रण नसते. शिंक येत असताना डोळे नेहमी बंद होतात. ‘डोळे उघडे ठेवून शिंकून दाखव’ या स्पर्धेत अनेक स्पर्धक लहानपणी हरलेले आपण पाहिले आहेत.

नर्सरीमध्ये शाळेत जाताना सेफ्टी पिन लावून रूमाल देण्याची पद्धत असायची. पहिलीत गेल्यावर ही पद्धतही बंद होत. पण खरे तर, आपल्याबरोबर एक रूमाल नक्की ठेवावा. शिंक आली तर रूमाल, टिशू पेपर, मास्क किंवा हाताच्या कोपराच्या साहाय्याने किंवा काहीच नाही तर आपले दोन्ही हात नाकावर ठेवून शिंक चाहूबाजूला पसरणार नाही याची काळजी घेणे इष्ट.

शिंक देऊन झाल्यावर हात साबणाच्या पाण्याने धूवून टाकता येतात. शिंक जर रोगाचे लक्षण म्हणून असली तर शिंकू की नको हा एक मोठा प्रश्र्न पडतो आहे. कोविडच्या काळात तर अनेक लोक शिंक दाबून टाकायचा प्रयत्न करत. हे उचित आहे का?

आयुर्वेदामध्ये शिंकेला क्षवथु असे म्हटले जाते. ही १३ अधारणीय वेगांपैकी एक आहे. अधारणीय म्हणजे ज्यांना थांबवले जाऊ नये व वेग म्हणजे नैसर्गिक क्रिया जिच्याद्वारे मल, द्रव्य, इत्यादी वस्तू शरीराबाहेर टाकल्या जातात. जेव्हा कुठल्याही वेगाचे धारण केले जाते अर्थात त्याला बळजबरीने थांबवले जाते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होतात असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे.

वेगान्धारयेत् धीमाञ्जातान्मूत्रपुरीषयोः।

न रेतसो न वातस्य न छर्द्याः क्षवथोर्न च ।।

नोद्गारस्य न जृम्भाया न वेगान्क्षुत्पिपासयोः ।

न बाष्पस्य न निद्राया निःश्र्वासस्य श्रमेण च ।।..चरक सूत्रस्थान

हे तेरा वेग आहेत मूत्र, पुरीष (मल), शुक्र, अपान वायू (गॅसेस), छर्दी (उलटी), क्षवथु (शिंक), जृंभा (जांभई), क्षुधा (भूक), तृष्णा (तहान), बाष्प (अश्रू), निद्रा, श्रमश्र्वास (काम केल्यावर लागणारा दम), उद्गार (ढेकर). काही आचार्य कास (खोकला) ही अधारणीय वेगांत घेतात. यांच्यापैकी कुठल्याही वेगाला थांबविल्यामुळे शरीरातील स्रोतसांमध्ये अवरोध निर्माण होतात.

शिंकेचा वेग थांबविल्याने निम्नलिखित त्रास होतात.

१. शिरःशूल : डोके दुखणे

२. इंद्रियदौबल्य : सर्व इंद्रियांमध्ये दुर्बलता जाणवणे

३. मन्यास्तंभ : मान जखडणे

४. अर्दित : चेहऱ्याचा लकवा

५. अर्ध्यावभेदक : अर्धशिशी

आधुनिक रित्या विचार केला तर नाकात कुठलेही हानिकारक पदार्थ व जंतू जात असतील तर ते आत जाऊ नयेत याचा प्रतिबंध करण्यासाठी शिंक येते. यात फुप्फुसे, गळा, सायनस, नाकातील पोकळ्या यात प्रेशर तयार होते व त्यामुळे श्र्वास जोरात बाहेर फेकला जातो. यावेळी तयार झालेला दाब श्र्वासाच्या वेळी असलेल्या दाबापेक्षा ३३ पट असतो. त्यामुळे शिंकले नाही तर हा दाब आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर चुकीचा परिणाम करू शकतो.

यामुळे घशाला इजा होणे, कानात इन्फेक्शन होणे, रक्ताच्या बारीक वाहिन्यांना इजा होणे, कानाचा पडदा फाटणे, डायफ्रॅमला इजा होणे वगैरे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शिंकेचा वेग न थांबवणे हेच आरोग्यासाठी इष्ट असते.

शिंक थांबवल्यामुळे होणाऱ्या विकारांच्या उपचारासाठी आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सुचवल्या आहेत.

मन्यास्तम्भः शिरशूलं अर्दित अर्धावभेदकौ ।

इन्द्रियाणां च दौर्बल्यं क्षवथोः स्यात् विधारणात् ।।

तत्र ऊर्ध्वजत्रुकेऽभ्यङ्गः स्वेदो धूमः सनावनः ।

हितं वातघ्नं आद्यं च घृतं चौत्तरभक्तिकम् ।।

१. अभ्यंग

कुठल्याही वेगाचे धारण केले तर शरीरातील वातदोष असंतुलित होतो. याला संतुलित करण्यासाठी अभ्यंग करणे, मुख्यत्वे नाक व चेहरा, गाल यांवर शास्त्रोक्त पद्धतीने बनविलेले तेल लावणे जास्त उत्तम ठरते. यासाठी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल किंवा संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलाचा वापर केला जाऊ शकतो.

२. स्वेदन

कुठल्याही वातशामक वनस्पतीने किंवा साध्या वाफेने स्वेदन करणे उत्तम ठरेल. यासाठी बाजारात मिळणारी फेशियलचे मशिन वापरता येऊ शकते किंवा वैद्याने सुचविल्यानुसार एखाद्या वनस्पतीचे स्वेदन घेता येऊ शकते. ही वाफ ऊर्ध्वजत्रुवर म्हणजे कॉलर बोनच्या वरच्या भागात घ्यायची असते.

३. धूमपान

वैद्यांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट वनस्पतींचा धूमपान करण्याने वाताचे शमन व्हायला मदत होऊ शकते. यासाठी वैद्यांच्या सल्ल्यानुसार संतुलन टेंडरनेस धूप, प्युरिफायर धूप वगैरेंचा वापर करता येऊ शकतो.

४. नस्य

नाकात रोज न चुकता आयुर्वेदिक पाठानुसार सिद्ध केलेले तूप वा तेल वैद्यांच्या सल्ल्यानुसार घालावे. यासाठी नस्यसॅन घृताचा वापर करता येतो.

५. आहार

वातशामक आहार घेणे इष्ट. दूध, तूप, लोणी, खडीसाखर वगैरेंसारखा वातशामक आहार ठेवावा. बरोबरीने जमत असल्यास जेवणानंतर एक वा दोन चमचे तूप खाणे उत्तम.

शिंक येणे वाईट असते असा गैरसमज आपल्याकडे आढळतो. काही गोष्ट चुकली की आपण म्हणतो ‘कुठे माशी शिंकली?’ पण शिंक आरोग्यासाठी महत्त्वाची असते. या वेगाला कधीही थांबवू नये. सभ्यता वा सामाजिक आचरणाचा विचार करून आपण या तेरा वेगांतील बरेच वेग थांबवत असतो. असे करणे आपल्या आरोग्यासाठी चुकीचे ठरू शकेल. त्यामुळे शिंकू वा नको या प्रश्र्नाचे साधे व सोपे उत्तर आहे, शिंका, पण स्वच्छतेची काळजी घेऊन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT