- डॉ. मालविका तांबे
आयुर्वेदाचे अ.ब.क.ड.
आयुर्वेद हे जीवनाचे शस्त्र आहे. ते खूप प्रगत, खूप प्रगल्भ, अतिशय वैज्ञानिक आणि व्यवस्थित लिहून ठेवलेले आहे. हे शास्त्र प्राचीन म्हणजे काही हजार वर्षांपूर्वीचे असले तरी त्यात प्रत्येक काळाला अनुकूल असे मार्गदर्शन आपल्याला सापडते. आयुर्वेद म्हणजे जीवनाबद्दलचे शास्त्र. आयुर्वेदातील चरकसंहितेत म्हटले आहे,
हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितम् ।
मानं च तच्च यत्रोक्तं आयुर्वेदः स उच्यते ॥
याच्यात आपल्या आयुष्यात असलेले हित, अहित, सुख, दुःख, जीवनाचा उगम, जीवनाबद्दलच्या सर्व पैलूंचे आकलन, स्वास्थ्य, आजारपण वगैरे सगळ्यांबद्दल माहिती मिळते. स्वास्थ्य म्हटले की, लोकांच्या मनात एकच कल्पना येते की, मला आजारपण येणार व त्यासाठी इलाज मला कुठे सापडू शकेल? आयुर्वेद यातही एक पाऊल पुढे आहे.
आयुर्वेदाच्या प्रयोजनाचा विचार केल्यास आयुर्वेदाचे पहिले प्रयोजन आहे ‘स्वस्थ्यस्य स्वास्थ्यरक्षणम्’ म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल याचा विचार आयुर्वेदात आधी केला जातो. नंतर म्हटले आहे ‘आतुरस्य विकारप्रशमनं च’ म्हणजे स्वास्थ्य टिकविण्याचा प्रयत्न करूनही आजार झालाच तर त्यावर काय उपचार करता येऊ शकतील याचा विचार केला जातो.
या प्राचीन शास्त्रात दिलेली स्वास्थ्याची परिभाषा पाहिली तरी लक्षात येते की, स्वास्थ्याचा किती सखोल विचार केलेला आहे. सुश्रुतसंहितेत म्हटले आहे,
समदोषः समाग्निश्र्च समधातुमलक्रियः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थमित्यभिधीयते ॥
स्वस्थ मनुष्याचे वात, पित्त, कफ हे सगळे दोष संतुलनात असले पाहिजे. त्याच्या शरीरातील पचनाग्नी बरोबर शरीरातील सर्व धातू व मलसुद्धा संतुलित असले पाहिजेत. याबरोबरच शरीरातील इंद्रिये म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स व मोटर ऑर्गन्स तसेच मन व आत्मा हे प्रसन्न म्हणजे सुस्थितीत असले पाहिजे. दोष व अग्नी यांचा विचार केला तर शरीरात चालत असलेल्या जैविक प्रक्रियांच्या मुळाशी दोष व अग्नीचे कार्य असते.
धातूंचा विचार कदाचित सध्याच्या काळात केलाही जात असेल, परंतु शरीरातील मलही संतुलित असले पाहिजे हा आयुर्वेदातील एक खास विचार आहे. स्वास्थ्याची परिभाषा करताना ज्या शास्त्रात मन, शरीर व आत्मा यांचा विचार केला आहे त्या शास्त्राला प्राचीनता ही ज्ञानाची म्हटली जाऊ जाते, तथापि त्या शास्त्राचा विचार कालातीत होता हे आपल्याला समजू शकते. संपूर्ण स्वास्थासाठी मन व आत्मा यांची संतुलित स्थिती आवश्यक आहे हे ओळखणारे शास्त्र जुनाट असूच शकत नाही.
आता आयुर्वेदातील काही संकल्पना बघू या.
नैसर्गिक औषधे - आयुर्वेदिक औषधांचा विचार केल्यास ती बनवत असताना नैसर्गिक गोष्टींचा वापर केलेला असतो. नैसर्गिक गोष्टी शरीरात सामावणे सोपे असते. आयुर्वेदिक औषधांत मुख्यत्वे वनस्पतींचा वापर केला जातो, त्याचबरोबरीने खनिजे, धातू व प्राणिज पदार्थ यांच्याही वापर केलेला दिसतो. सर्व औषधप्रक्रियांचे पाठ आपल्या ग्रंथांमध्ये सापडतात, औषधे बनविण्याची कृती सापडते. एवढेच नव्हे तर तयार झालेल्या औषधांचे गुणवत्ता कशी ओळखायची हेही सांगितलेले आढळते.
पंचकर्म - आयुर्वेदिक पंचकर्म ही शरीरशुद्धीची खूपच अद्वितीय पद्धत आहे. शरीराच्या चयापचय क्रियांमध्ये मल तयार होतो. हा मल बहुतांशी मल-मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकला जातो, पण तो काही प्रमाणात शरीरात संचित होत राहतो, जो स्वतः शरीर बाहेर काढू शकत नाही व त्यातूनच वेगवेगळ्या आजारांचा आमंत्रण मिळते. याला आयुर्वेदात आम म्हटले जाते. हा आम शरीराबाहेर टाकला गेल्यास रोग होण्याची शक्यता कमी होते, तसेच त्रास झाल्यास त्याचे प्रमाण कमी असते, रोग टाळताही येऊ शकतो. हा विचार अन्य कोणत्याही पॅथीमध्ये सापडत नाही. कार्ला येथील आत्मसंतुलनमध्ये गेली ४० वर्षे श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे शास्त्रोक्त पंचकर्म लोकांना देत आहेत व त्याचे खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत.
आयुर्वेदाचा वेगळेपणा - सर्व नैसर्गिक गोष्टींचा वापर केलेला असतो त्यामुळे आयुर्वेदिक औषधे शरीरात सामावणे सोपे असते, शरीरात त्यांचे दुष्परिणाम फारसे होत नाहीत. काही व्यक्तींमध्ये नैसर्गिक वस्तूंचे दुष्परिणाम होताना दिसू शकतात. माझ्याकडे एक केस आली होती. औषधे घेतल्यावर त्या स्त्रीला चक्कर यायला लागली. औषधाने असे होऊ शकत नाही, असे मी त्यांना सांगितले. जास्त खोदून विचारल्यावर कळले की, लहानपणी एकदा एरंडेल घेतले होते.
तेव्हाही त्यांना अशाच प्रकारे चक्कर आली होती. आता औषधांमध्ये एरंडेल असल्यामुळे त्यांना परत चक्कर आली. ती चक्कर फार त्रासदायक नव्हती, तसेच औषध बंद केल्यावर चक्कर येणे बंद झाले. आयुर्वेदिक औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत, असे सांगितले जाते.
या औषधांचे मोठे दुष्परिणाम नसतात, परंतु पित्त प्रकृती असणाऱ्याला आले, मिरी वगैरे असलेले औषध दिले गेले तर पोटात जळजळ, शौचाच्या जागी जळजळ होणे अशासारखे त्रास होऊ शकतात, परंतु औषध घेणे बंद केले तर कुठलाही त्रास कायमस्वरूपी होत नाही असा अनुभव आहे.
नैसर्गिक गोष्टीची ॲलर्जी असणे किंवा नैसर्गिक गोष्टी घेतल्यावर त्रास होणे हे शरीरात खूप मोठा विकार तयार करत नाही. याच जागी रासायनिक औषधे किंवा आधुनिक शास्त्रातील औषधे घेतल्यावर होणारे जे दुष्परिणाम असतात त्यामुळे शरीरात क्वचित मोठा विकार उत्पन्न होताना दिसतो.
आयुर्वेदिक उपचारांची संकल्पना - आयुर्वेदात रोगाच्या मुळावर काम केले जाते. शरीरात होणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये कुठल्याही प्रकारे अडथळे निर्माण झाल्यास आजार होऊ शकतो. आयुर्वेदात प्रत्येक रोगाची परिभाषा, प्रत्येक रोगाची लक्षणे दिलेले नसले तरी कुठल्याही रोगाला वात-पित्त-कफ या कसोट्यांवर तपासून पाहिले की त्यावर हमखास आयुर्वेदिक औषध सुचवता येऊ शकते.
त्यामुळेच असे म्हटले जाते की आयुर्वेदात रोग्यावर दिसणाऱ्या लक्षणांवर काम न करता आजाराच्या मुळावर काम केले जाते. बऱ्याच वेळा लोक विचारतात, हा आजार मुळातून आला कुठून? मूळ असंतुलित झालेल्या चयापचय क्रियांमध्ये असते, ते नेहमीच बाहेरच्या कारणांमध्ये असेल असे नाही.
आयुर्वेद क्लिष्ट, खरे की खोटे? - आयुर्वेदिक औषधे खूप हळू काम करतात, असा अनेकदा लोकांच्या मनात गैरसमज असतो. परंतु काम कोणते करायचे आहे यावरून आपल्याला गती ठरवावी लागते. संधिवाताचा त्रास असणारे रोगी वेदनाशामक व सूज कमी करणाऱ्या गोळ्या जन्मभर घेत राहतात.
अशा औषधे हळू काम करणारी आहेत असे म्हणावे का? त्याच्याच हिशोबाने आयुर्वेदातील तेले, उपचार, पंचकर्म, वातशामक औषधे घेतली तर काही वर्षांमध्ये हा त्रास पूर्णपणे बंद होतो व व्यक्ती परत बऱ्यापैकी पूर्वस्थितीत जायला मदत होते.
अनुकूलता - आयुर्वेदामध्ये कुठलेही औषध द्यायचे असले तर रोग्याची वय, त्याची प्रकृती, आजार शरीरात कुठे झालेला आहे, तसेच वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधनिर्मितीच्या कल्पना म्हणजे फक्त गोळ्या न देता चूर्ण, कल्प, तेल, अरिष्ट, आसव, लेह वगैरे प्रकारात देता येतात. त्याचप्रमाणे औषधाची मात्राही रोग्याच्या गरजेनुसार बदलता येते. त्यामुळे जेवढे कस्टमायझेशन आयुर्वेदात शक्य आहे तेवढे सहसा कुठल्याच शास्त्रात नसते.
नियम पाळणे - आयुर्वेदिक औषधे घेताना विशिष्ट वेळा पाळाव्या लागतात, काही औषधांमध्ये काही गोष्टी मिसळून घ्याव्या लागतात, त्यामुळे औषधे घ्यायला क्लिष्ट असतात असे लोकांचे म्हणणे असते. आपल्या शरीरातील चयापचय क्रिया पाहिल्या तर त्यात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे बदल होत असतात. औषध आपल्याला नक्की कुठे व कशा वेळी द्यायचे आहे, याचे खूप गूढ चिंतन आयुर्वेदाची औषधे देताना करावे लागते.
काही प्रकारची पचनासंबंधित औषधे आहाराच्या मधोमध घेतली जातात, म्हणजे अर्धे जेवण झाल्यावर औषधे घेऊन उरलेले अर्धे जेवण करावे, असे सांगितले जाते. अशा प्रकारे औषध घेण्याचा संबंध संप्रेरक शरीरात कोणत्या वेळी स्रवतात याच्याशी लावू शकतो. आसव, अरिष्ट वगैरे संधान केलेली काही औषधे ही जेवल्यानंतर घ्यायला सांगितली जातात, जेणेकरून त्यांचे शरीरात शोषण त्वरित होते.
च्यवनप्राशसारखी रसायने सकाळी अनाशेपोटी घ्यायला सांगितली जातात, जेणेकरून त्या रसायनांचा पचन व्यवस्थित व्हायला मदत होऊ शकेल. त्यामुळे वेळा पाळल्यास त्यांचा अधिक उपयोग होताना दिसतो. वेळा पाळल्या नाहीत तरी औषधांचा फायदा होतोच, कदाचित कमी प्रमाणात. आपल्याला येथे नोंद घ्यायला हवी की, शरीरात चाललेल्या चयापचय क्रियांवर कोठे, कधी व कसे काम करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आयुर्वेदशास्त्र देते.
कशाबरोबर औषध घ्यावे याला आयुर्वेदात अनुपान म्हटले जाते. अनुपान म्हणजे औषधांचे गुण वाढविणाऱ्या किंवा साहाय्य करणाऱ्या गोष्टी. उदा. दूध, मध, तूप, आल्याचा रस, कडूनिंबाच्या पानांचा रस वगैरे.
आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना चरकसंहिता, सुश्रितसंहिता, अष्टांगहृदय, माधवनिदान, काश्यपसंहिता वगैरे अनेक ग्रंथ वाचताना कळते की, केवढे मोठे ज्ञानाचे भांडार या ग्रंथांमध्ये लपलेले आहे. प्रत्येक वेळी वाचताना कुठली ना कुठली नवीन गोष्ट शिकायला मिळते. प्रत्येक गोष्टीची विस्तृत चर्चा करणे शक्य नसते म्हणून त्यातल्या त्यात काही साध्यासोप्या गोष्टी आजच्या लेखाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक शास्त्राचे काही नियम व निकष असतात. ते ते शास्त्र त्या त्या नियमांवर व निकषांवर पडताळून पाहायला पाहिजे, अन्यथा सेंटीमीटरवर मोजून कागदावर लिहिताना इंच व फूट वापरले तर ज्या प्रकारचा घोळ होईल. तसा घोळ सध्याचे आधुनिक शास्त्र व आयुर्वेदशास्त्र यांची तुलना करताना होऊ शकेल.
प्रत्येक शास्त्राची काही सकारात्मकता असते तर काही निर्बंध असतात, हे लक्षात घेऊन त्या शास्त्राबद्दल विचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाने आजच नव्हे तर गेली हजारो वर्षे त्याची सामयिकता लोकांपर्यंत पोचवलेली आहे, त्यामुळेच स्वास्थ्याच्या क्षेत्रात आयुर्वेद आपला ठसा असाच उमटवत राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.