बहुतेक प्रमुख धर्मांच्या शिकवणुकीशी चांगल्या प्रकारे परिचित असलेले श्री एम यांची शिकवण सर्व धर्मांच्या वरवरच्या अर्थापलीकडे जात धर्माचा गाभा किंवा सार शोधणारी आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे आयुष्य विलक्षण आहे. बहुतेक प्रमुख धर्मांच्या शिकवणुकीशी चांगल्या प्रकारे परिचित असलेले श्री एम यांची शिकवण सर्व धर्मांच्या वरवरच्या अर्थापलीकडे जात धर्माचा गाभा किंवा सार शोधणारी आहे. ती प्रत्येक मनुष्यातील जन्मजात चांगुलपणाचे पोषण करणारी आहे. त्यांचे जीवन, शिकवण आणि कार्य यांच्याविषयी...
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आध्यात्मिक गुरू श्री एम यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९४९ रोजी केरळची राजधानी तिरुअनंतपूरम येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांना वयाच्या नवव्या वर्षीच गुरू दर्शन झाले होते. त्यांचा एक सर्वसाधारण व्यक्ती ते आध्यात्मिक गुरू हा प्रवास अद्भुत होय. सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा अध्यात्माकडे होता. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ते खऱ्या गुरूच्या शोधार्थ हिमालयाच्या दिशेने निघाले. हा प्रवास सोपा नव्हता. हिमालयात गेल्यानंतर वाटेत त्यांना सर्वच प्रकारचे अनुभव आले. काही खरे साधू भेटले, तर काही भोंदू; परंतु कुणीही त्यांना आपल्या निश्चयापासून परावृत्त करू शकले नाही. उंच उंच हिमशिखरांकडे ते मार्गक्रमण करीत राहिले. असाच प्रवास करीत असताना त्यांना एक गुफा दिसली; परंतु तेथे कुणीही वास्तव्यास नसल्याचे त्यांना वाटले. ते पुढे गेले व काही वाटल्याने परत त्या गुफेकडे आले. त्यावेळी त्यांना तेथे अग्नी पेटलेला दिसला. त्यामुळे येथे मनुष्यप्राण्याचे अस्तित्व असल्याचा विश्वास बसला आणि ते गुफेत शिरले. त्यावेळी त्यांना लहान असताना दर्शन दिलेल्या गुरूंचे दर्शन घडले. तेथे श्री गुरू बाबाजी यांचे ज्येष्ठ शिष्य असलेले महेश्वरनाथ बाबाजी यांनी त्यांना आश्रय दिला व नाथ परंपरेची दीक्षा दिली. त्यानंतर साडेतीन वर्षे श्री एम यांनी माहेश्वरनाथ बाबाजी यांच्यासह हिमालयात मोठ्या प्रमाणावर भटकंती केली. त्यांच्या शिकवणुकीमुळे श्री एम यांच्या जाणीवेमध्ये कायापालट झाला. त्यानंतर, आपल्या गुरूच्या आदेशानुसार हिमालयातून परतत त्यांनी शांत, कौटुंबिक जीवनास प्रारंभ केला. त्याचवेळी ते गुरूच्या शिकवणुकीचा व हिमालयातील अनुभवाचा प्रसार करण्याचीही तयारी करत होते.
शिकवणुकीचा प्रसार
काही वर्षांनंतर गुरूचे निधन झाल्यानंतर श्री एम यांना आपल्या शिकवणुकीचा प्रसार सुरू करण्याचे संकेत मिळाले. त्यांनी २० वर्षांपूर्वी ‘द सत्संग फाउंडेशन’ची स्थापना केली. अनुयायी असणाऱ्या सर्व आध्यात्मिक साधकांना भेटण्याचे व्यासपीठ मिळावे, म्हणून या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. बहुतेक प्रमुख धर्मांच्या शिकवणुकीशी चांगल्या प्रकारे परिचित असलेले श्री एम यांची शिकवण सर्व धर्मांच्या वरवरच्या अर्थापलीकडे जात धर्माचा गाभा किंवा सार शोधणारी आहे. ती प्रत्येक मनुष्यातील जन्मजात चांगुलपणाचे पोषण करणारी आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘गाभ्यापर्यंत जा, सिद्धांत काहीही उपयोगाचे नाहीत.’ ‘धार्मिक, वांशिक, भौगोलिक, सांस्कृतिक व वैचारिक भेदांच्या पलीकडे जाऊन मानवता ही सर्वत्र एकच आहे,’ अशी द सत्संग फाउंडेशनची शिकवण आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे त्यांनी शांतता व सौहार्दाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी श्री एम यांनी २०१५-१६ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर ही साडेसात हजार किलोमीटरची ‘वॉक फॉर होप’ पदयात्रा काढली. देशातील ११ राज्यांतून या १५ महिन्यांची ही यात्रा सुमारे एक कोटी लोकांपर्यंत पोचली.
समाजकार्य आणि लेखन
सत्संग फाउंडेशनच्या बॅनरखाली श्री एम यांनी शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास आणि पर्यावरणाच्या क्षेत्रांत विविध प्रकल्प राबविले. फाउंडेशनकडून आंध्र प्रदेशातील मदनपल्लेत व उत्तर प्रदेशमधील लाथिरामध्ये विनामूल्य शाळा आणि कौशल्य विकास केंद्र चालविले जाते. त्याचप्रमाणे, सामुदायिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मदनपल्लेत दर्जेदार विनामूल्य उपचार दिले जातात. मदनपल्लेजवळच ‘स्वास्थ्य’ हे रूग्णालयही पूर्णत्वास येत आहे. त्याचप्रमाणे, ‘माय ट्री’ या उपक्रमातून वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले जाते. मदनपल्लेजवळील चौडेपल्ले या छोट्याशा गावात स्वजाणीव शोधण्यासाठी ‘सेक्रेड ग्रोव्ह’ सुरू करण्यात आले. येथे आयुर्वेदिक उपचार व योगशास्त्रावरील आरोग्य केंद्रही आहे.
आत्मचरित्र व पुस्तके
श्री एम यांचे ‘अप्रेंटिस्ड टू ए हिमालयन मास्टर - ए योगीज ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्र २०११मध्ये प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक लगेच सर्वोत्तम खपाचे ठरले. त्यानंतर, त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग ‘द जर्नी कंटिन्यूज’ २०१७मध्ये प्रकाशित झाला. आत्मचरित्राबरोबरच श्री एम यांनी उपनिषदे, ध्यानावरील अनेक पुस्तके; तसेच ‘शून्य’ ही कादंबरीही प्रसिद्ध झाली. त्यांचे ‘ऑन मेडिटेशन-फाइंडिंग इनफिनिट ब्लिस अँड पॉवर विदिन’ पेंग्विन इंडियाने प्रकाशित केले. त्यांची दोन पुस्तके २०२०मध्ये प्रकाशित झाली. त्यात लघुकथांचे ‘होमकमिंग अँड अदर शॉर्ट स्टोरीज’ व पतंजली योगसूत्रावर आधारित ‘योगा अल्सो फॉर द गॉडलेस’ या पुस्तकांचा समावेश आहे. याच वर्षी लेडी मोहिनी केंट यांच्याबरोबरचे ‘द फ्रेंड : माइंड, बॉडी ॲँड सोल, वेल-बिइंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले. श्री एम यांच्या पुस्तकांचा अनेक भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.
जागतिक संस्थांकडून आमंत्रण
कसदार लेखकाबरोबर प्रभावी वक्ते असलेले श्री एम यांना बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थेबरोबर जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रे, जागतिक बॅंकसारख्या जागतिक संस्थांनीही व्याख्यानासाठी आमंत्रित केले. त्यांनी अनेक नामवंत भारतीय तसेच परदेशी कंपन्यांनीही मार्गदर्शन केले आहे. त्यात गुगल, याहूसारख्या अमेरिकी कंपन्यांबरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या भारतीय शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे, श्री एम हे मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाचे कुलपती व दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतही प्राध्यापक म्हणून अध्यापन करतात. समाजासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल श्री एम यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांना जानेवारी २०२० मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले. श्री एम विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. आंध्र प्रदेशमधील मदनपल्लेत ते सहजसाधे जीवन जगतात. संगीताचा आस्वाद घेत ते फावल्या वेळेत चित्रेही काढतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.