मान-सन्मान होईल
मेष : सप्ताहात वक्री मंगळाचा ग्रहयोगांतून प्रभाव राहील. आर्थिक संमोहन टाळा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना आर्थिक देवाणघेवाणीतून त्रास. ता. ३० व १ हे अष्टमीचं प्रभावक्षेत्र वृद्धांना आजार, व्याधींतून गांभीर्याचं. बाकी अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट वैयक्तिक मानमरातब देईल. शैक्षणिक चिंता जाईल.
स्पर्धात्मक यश मिळेल
वृषभ : राशीच्या वक्री मंगळाचं फिल्ड राहील. तारुण्याच्या उंबरठ्यावरील तरुणांनी जपावं, प्रेमात वेडं होऊ नये. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी कोणतीही मस्ती टाळावी. सप्ताह बुद्धिजीवी मंडळींना छानच. स्पर्धात्मक यश. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ व ३ हे दिवस वैयक्तिक सुवार्तांची शृंखला ठेवतीलच. काहींचा नूतन वास्तुप्रवेश. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती येतील.
नव्या संधी मिळतील
मिथुन : कायदेशीर कटकटी होतील. घरात भावाबहिणींचे प्रश्न सतावतील. सप्ताहात खरेदीत फसू नका. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींनी जास्त काळजी घ्यावी. बाकी सप्ताह मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, नोकरी आणि विवाह या त्रिघटकांतून संधी देणारा. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट जल्लोषाचा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वरपीडा सतावेल.
झंझावाती यश लाभेल
कर्क : सप्ताहातील वक्री मंगळाचा फायदा घेऊ शकता; मात्र जुगारसदृश व्यवहारात नव्हे. तरुणांना सप्ताह नैराश्य घालवणाराच ठरेल. सप्ताहाचा शेवट एखादं झंझावाती यश देईल. नोकरीत परिस्थितिजन्य लाभ. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. २९ नोव्हेंबरचा मंगळवार वादविवादात सांभाळावा. बाकी व्यावसायिक प्राप्ती उत्तम. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग.
नोकरीत उत्तम घडामोडी
सिंह : वक्री मंगळाच्या पार्श्वभूमीवर उसळी घेणारा सप्ताह. तरुणांना स्पर्धा परीक्षांतून सप्ताह उत्तमच. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्ती बाजी मारतील. सप्ताह नोकरीतील घडामोडींतून उत्तमच. मात्र, सप्ताहात सहवासातील स्त्रीवर्गाशी जपूनच. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ चा मंगळवार घरात अशांततेचा.
छंद-उपक्रमांतून चांगला काळ
कन्या : सप्ताहातील तिन्हीसांजा वक्री मंगळाच्या पार्श्वभूमीवर जपा. घरातील लहान मुलं सांभाळा. बाकी सप्ताहात शुभग्रहांची लॉबी उत्तम कार्यरत राहीलच. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मानमरातब देणारा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह छंद, उपक्रमांतून मस्तच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताह प्रेम प्रकरणांतून झोप उडवू शकतो!
नवे प्रस्ताव तपासून घ्या
तूळ : वक्री मंगळाशी होणारे ग्रहयोग ग्रहांचं मैदान ताब्यात घेतील. चौकार, षटकार टाळाच. फक्त हसत हसत जीवनप्रवासातील गुगली गोलंदाजी खेळून काढा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी नोकरी, व्यावसायिक नवे प्रस्ताव तपासून घ्यावेत. प्रवासात सावधच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. २९ चा मंगळवार विचित्र मानवी दहशतीचा.
व्यावसायिक प्रगती होईल
वृश्चिक : सप्ताह अतिशय मजेदार ग्रहमानाचा, मात्र वक्री मंगळाच्या बहकाव्याला दाद देऊ नका. तरुणांनी सहली - करमणुकीतील चाळे जपावेत. बाकी सप्ताह अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक चलतीच ठेवेल. जोरदार उत्सव, समारंभ होतील. सप्ताहाचा शेवट ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठा हृद्य राहील. जीवनाचं सार्थक होईल.
गुरुभ्रमणाची साथ राहील
धनू : सप्ताहात तरुण असलेल्या बुध, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा व्रात्यपणा वाढणारा आहे. अर्थातच तरुणांना हा सप्ताह जीवनातील विचित्र अनुभव देऊ शकतो. कुसंगत टाळा. वैवाहिक जीवन सांभाळा. बाकी मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुभ्रमणाचा जनरेटर राहीलच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ चा मंगळवार एक प्रकारच्या व्हायरसचा ठरू शकतो. सर्व पथ्यं पाळाच. बाकी सप्ताहाचा शेवट घरात प्रसन्न.
बुद्धिचातुर्यातून लाभ होतील.
मकर : सप्ताह ग्रहमालेतील तरुण ग्रहांच्या संदर्भातून संवेदनशील राहील. अर्थातच सप्ताहात बुध, शुक्र, मंगळ ही त्रयी प्रचंड क्रियाशील होणार आहे आणि युनिट सेक्रेटरी मंगळ रुबाब गाजवेल. सप्ताहात श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना बुद्धिचातुर्यातून लाभ होतील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मस्तच. मात्र, ता. २९ आणि ३० या दिवशी अष्टमीच्या प्रभावात सार्वजनिक ठिकाणी अरेरावी टाळा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना त्रास होऊच शकतो.
नोकरीत पगारवाढ होईल
कुंभ : सप्ताहात वक्री मंगळाचा उच्चदाब वाढणार आहे. मानसिक संदर्भातून शॉर्टसर्किट टाळाच. विशेषतः तरुणांनी संयम ठेवावा. बाकी सप्ताह बुध, शुक्राच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना उत्तम साथ देईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे कलागुण प्रदर्शित होतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ चा शुक्रवार आनंदोत्सवाचा. नोकरीत पगारवाढ. धनिष्ठा नक्षत्रास कर्जमंजुरी.
तरुणांना चांगला कालखंड
मीन : सप्ताहात तरुणांना ग्रहयोग उत्तम फलदायी होतील. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान. कोर्ट प्रकरणातून यश. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठे परिस्थितिजन्य लाभ देईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी मित्रांशी वाद टाळावेत. सहली - करमणुकीतून उन्माद टाळावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.