Aniket Vishwasrao, Sneha Chavan Instagram
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावविरोधात त्याची पत्नी स्नेहा चव्हाणने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.
स्नेहाने अनिकेतसोबत त्याच्या आईवडिलांविरोधातही तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात स्नेहाने कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. अनिकेत आणि स्नेहाने ५ ऑगस्ट २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. कोणताही गाजावाजा न करता मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं. 'हृदयात समथिंग समथिंग' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या भेटीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. त्याचवेळी स्नेहाच्या घरी तिच्या लग्नासाठी स्थळ शोधणं सुरू होतं. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकाच इमारतीत राहतात. त्या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अनिकेतच्या मावशीनेच स्नेहाचं स्थळ सुचवलं होतं. स्नेहाच्या कुटुंबीयांनाही अनिकेत पसंत पडला. त्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. 'हृदयात समथिंग समथिंग' या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी या दोघांचा साखरपुडा पार पडला. आता लग्नाच्या तीन वर्षांत स्नेहा आणि अनिकेतमध्ये खटके उडत असल्याने ही जोडी चर्चेत आली आहे. 'अनिकेतने नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली आणि गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नदेखील केला. सासू- सासरे यांनी माझ्यावर होणार्या अत्याचाराला न रोखता अनिकेतला दुजोरा दिला,' असं स्नेहाने तक्रारीत नमूद केलं. गेल्या काही दिवसांपासून स्नेहा आणि अनिकेत यांच्यात वाद सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.