नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरासह राज्यात आणि नाशिक जिल्हा व शहरात संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी शहरासह उपनगरांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर गावागावांत संचारबंदी अधिक कडक करण्यात आली. तसेच शहरातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सिडको, सातपूर, इंदिरानगर, वडळा, उपनगर, नाशिकरोड, जेलरोड, नांदूरनाका, आडगाव, पंचवटी, दिंडोरीरोड, गंगापूररोड, आनंदवल्ली , शिवाजीनगर, श्रमीकनगर परिसरात प्रवेशाचे व बाहेर पडण्याच्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरीकेट्स लावून उपनगरांच्याही सर्व सीमा बंद केल्या आहेत.
नाशिक शहरात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरी ग्रामीण भागात एक रुग्ण आढळून आला असल्याने प्रशासनाने अधिक सतर्क होत संचारबंदी, साथरोग प्रतिबंधक कायद्याची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोना आजार अधिक पसरू नये, यासाठी नागरिकांनी आपापल्या घरांमधून बाहेर पडणे टाळावे, विनाकारण जर कोणी घराबाहेर आल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देताना पोलिसांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनेही तीन महिन्यासाठी जप्त करण्याची कारवाई केली आहे. शहरात कोणीही परदेश दौरा करून आले असेल तर त्याची माहिती तत्काळ शहर पोलीस नियंत्रण कक्ष किंवा आरोग्य विभागाला द्यावी, असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून संचारबंदी कायद्याचे उल्लंघन आता कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
त्यासाठी शहरातील सिडको- उंटवाडी, अंबड- एक्लो पॉईंट-सातपूर-आयटीआय सिग्नल व सातपूर पोलीस ठाणे, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक-वडाळा -पाथर्डीरोड, नांदूरनाका-आडगाव भागात विविध ठिकाणी उपनगरांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे या भागात दूध, भाजीपाला, औषधे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, नाकाबंदीवर तैनात पोलीसांकडून अशा सेवा देणाऱ्यांना सहकार्य करून जवळचा पर्यायी मार्ग दाखवून मदत केली जात आहे. वाहनांची कसून तपासणी संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी सवलत दिली जात असल्याने अनेक नागरिक औषधांची कारणे सांगून शहरातील रस्त्यांवर वाहने घेऊन येत असल्याने शहर पोलीसांकडून मुंबई नाका, द्वारका परिसरात वाहनांची कसुन तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे शहरात प्रवेश करण्यापूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरही पोलीसांकडून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.