Summer Holiday Plans Sakal
परीक्षा संपली की, उन्हाळी शिबिरांचे वेध लागतात. सध्या अशा शिबिरांच्या जाहिराती सर्वत्र पाहायला मिळतात. सुट्टीमध्ये मुलांचा वेळ सत्कारणी लागावा म्हणून अनेक पालक आपल्या पाल्यांना अशा शिबिरांमध्ये टाकतात. मात्र, विरंगुळा म्हणून उन्हाळी शिबिरांकडे पाहू नका. शिबिराचे महत्त्व लक्षात घ्या. (The art camp will make your Summer holidays memorable)
पालकांचे शिबिरासाठी नियोजन-
उन्हाळी सुट्टीचे नियोजन एव्हाना प्रत्येक पालकांनी केले असेल. उन्हाळी शिबिरांच्या फलकवजा जाहिराती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. त्यात विविध प्रकारच्या छंदवर्गासह पेंटिंग्ज, बालनाट्य, हँडरायटिंग, संस्कार, नृत्य आणि गायन कार्यशाळा आदींचा समावेश असतो. मुलांना खूप वेळ असल्याने अशा शिबिरांना मोठा प्रतिसाद लाभतो.सुट्टी आणि शिबिर एक समीकरण- सुट्टी आणि शिबिर हे जणू एक समीकरणच आहे. दिवाळी सुट्टी असो की उन्हाळी सुट्टी. काही मुले नियमित अशा शिबिरांना जातात तर काही जण वेळ सत्कारणी लावण्यासाठी अशा शिबिरांना जातात. सुट्टीत विरंगुळा म्हणूनही मुलांना पाठवणारे पालक आहेत. या शिबिरांतून मुले अनेक गोष्टी शिकतात. मात्र, या एका महिन्याच्या किंवा काही आठवड्यांच्या शिबिरामधून सर्वच गोष्टी शिकायला मिळतात, असे नाही. याउलट वर्षभर चालणाऱ्या शिबिरांतून मुले अनेक गोष्टी शिकतात. अभिनय आणि संगीत या कला काही आठवड्यांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये अवगत होत नाही. त्यासाठी अनेक वर्षाची साधना लागते.
सुरक्षेच्या दृष्टीने घ्या काळजी- शिबिरादरम्यान मुलांना शहराबाहेर घेऊन जाणार असतील, तर त्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेची पुरेशी खात्री करून घ्या. शिबिर आयोजित करणारी संस्था, त्यातील प्रशिक्षक, प्रमुख यांच्याबाबतची योग्य ती माहिती आपल्याला असायला हवी. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शिबिरांच्या जाहिराती येतात. मात्र त्याला बळी न पडता योग्य ती खातरजमा केल्याशिवाय मुलांना अशा शिबिरामध्ये घालू नका. शिबिराचा भौगोलिक परिसर, शिबिराला येणारी इतर मुले, शिबिरातील नेमक्या अॅक्टिव्हिटीज यांची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. मूल शिबिरात गेलेले असताना त्याच्या संपर्कात राहा. तेथील गोष्टी त्याला आवडत आहेत ना, जमत आहेत ना याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा.
मुलांची आवड ओळखा- रोज तालीम घेणे, त्यांचे संवाद सुधारणे, आवाजाची फेक, चेह-यांवरील अभिनय, मूक अभिनय, एकपात्री अभिनय या गोष्टी शिकण्यासाठी मोठा कालावधी लागतो. तसेच त्यासाठी परिश्रम आणि इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. मात्र उन्हाळी शिबिरांतील सहभागामुळे तुमच्या मुलाची किंवा मुलीची आवड कशात आहे, याची चाचपणी घेता येऊ शकते. ती आवड कायम जपण्याच्या दृष्टीने पावले उचलली जाऊ शकतात. परंतु, उन्हाळी शिबिरांमध्ये आपल्या मुलांना टाकताना त्यांची आवड-निवड जाणून घ्या. त्यामुळे तुमच्या पाल्याच्या अंगभूत गुणांना वाव मिळेल. तसेच सुट्टीतील वेळ ख-या अर्थाने सार्थकी लागेल. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे हे विरंगुळ्याचे ठिकाण नसून शिक्षणा व्यतिरिक्त तुमच्या मुलांचे कलागुण तपासण्याची प्रयोगशाळा आहे, असे समजा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.