Jalgaon Crime News : जिल्ह्यात चारही दिशांनी गुटख्याची बेसुमार आवक सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाने रेल्वेस्थानकातील राहुल पान सेंटर दुकानावर छापा टाकत ४२ हजार८३५ रुपयांचा माल ताब्यात घेतला प्रवीण हिरामण पाटील (वय ४२, रा. फत्तेपूर, ता.जामनेर) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हावासियांना आता तस्करांविरुद्ध कारवाईची प्रतीक्षा आहे.(Gutkha worth 43 thousand rupees seized from pan shop in railway station jalgaon crime news)
चाळीसगाव तालुका, मुक्ताईनगर, पारोळा आदी सीमावर्ती भागात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू या प्रकारातील कोट्यवधी रुपयांचे कंटेनर उतरवले जातात. गुटखा माफियांनी गाव, तालुक्यापर्यंत गुदाम करून ठेवल्याचे माहिती प्रशासनामध्ये आहे.
जिल्ह्यातील पंधरा तालुके आणि साडेतीनशेवर गाव-खेड्यांत गुटखा सर्रास विक्री होतोय. धावत्या रेल्वेत विक्री आणि तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. गुप्त माहितीद्वारे माहिती मिळवत पोलिसांची गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनातर्फे त्याविरुद्ध कारवाई केली जाते.
गुप्त माहितीद्वारे कारवाई
जळगावमधील रेल्वेस्थानक परिसरातील राहुल पान सेंटर येथे गुटखा विक्री केला जात असल्याची गुप्त माहिती अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्त शरद मधुकर पवार यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (ता.२७) सायंकाळी अन्न व औषध विभागाच्या ताफा आणि पंच साक्षीदारासह श्री. पवार इथे धडकले. दुकानात छापा टाकत तपासणी करण्यात आली. तपासणीत त्यांना दुकानात विक्रीसाठी ठेवलेले पान, कोल्ड्रींक्स, चॉकलेटसह राज्य सरकारने प्रतिबंधित केलेले पानमसाला व गुटखा मिळून आला.
पथकाने जप्त केलेल्या पाकिटांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात मालाची किंमत रुपयांमध्ये दर्शवते) : सुगंधित प्रिमीयम पानमसाला-८ (१ हजार ५३६), केशरयुक्त पान मसाला व तंबाखू-प्रत्येकी १ हजार ६८० (३३ हजर ६००), पानमसाला-३४ पाउच (६८०), प्रिमीयम पानमसाला-२३१ पाउच (४हजार ६२०), पानमसाला-६ (२ हजार ४००). हा माल जप्त करून पंचनामा केल्यानंतर श्री. पवार यांनी तक्रार दिली.
मोठे गुटखा माफिया मोकाट
मोठ्या कारवाईसाठी नेहमी मनुष्यबळाचे रडगाणे गाणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाला एकमेव गुटखा विक्रेत्याची गुप्त माहिती मिळाली. कारवाईत जितके अधिकारी-कर्मचारी आणि कागदपत्रांसाठी लागलेला खर्च जप्त मालापेक्षा निम्मा असावा, अशी चर्चा पोलीस दलात आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद, म्हसावद, धरणगाव, पाळधी, बांभोरी, चिंचोली, एमआयडीसी आदी ठिकाणी असलेल्या मोठ्या गुदामाचे मालक अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईपासून दुर्लक्षित राहिले आहे, असे काही जणांचे म्हणणे आहे. जोपर्यंत गुप्त माहिती मिळत नाही, तोपर्यंत शहरातील मोठे गुटखा माफिया मोकाट राहणार काय? असा प्रश्न शहरवासीयांचा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.